सोनाली कुलकर्णी म्हणते, नाचेन.. पण मराठी गाण्यांवरच
अनेक कार्यक्रमांमध्ये मराठी कलाकार हिंदी गाण्यांवर नृत्य करताना दिसतात. त्यावरून अनेकदा प्रश्न उपस्थित केले जातात. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने मात्र एक निश्चय केला आहे.

मुंबई : मराठी सिनेसृष्टीची आपली अशी एक चाल आहे. भले आपल्या सिनेमात हिंदी सिनेमात असते तशी रोशणाई नसेल.. भले आपले सिनेमे त्यांच्यासारखे ग्लॅमरस नसतील. पण आपल्या सिनेमात आशय असतो. आपले सिनेमे हे जास्त जगण्याजवळचे असतात. आपले सिनेमे रंजन करतात पण त्याचसोबत ते डोळ्यात अंजनही घालतात. मराठी सिनेमाची बात न्यारी असते. पण बऱ्याचदा काही बाबतीत मराठी चित्रपटाला हिंदीची कास धरताना सिनेरसिकांनी पाहिलं आहे. बऱ्याचदा हिंदीतला गाण्याचा ट्रेंड मराठीत येतो. हिंदीतला ताल मराठी गाण्यात आलेला दिसतो. हिंदी गाण्यात असलेली भाषेची सरमिसळ मराठीतही येते. इतकं कशाला.. बऱ्याचदा मराठी चित्रपटांची गाणीही पूर्णपणे हिंदी असतात.
असाच काहीसा भाग आहे या गाण्यावर नाचणाऱ्या कलाकारांचा. पुरस्कार सोहळे असोत.. किंवा इव्हेंट्स असोत.. बऱ्याचदा मराठी तारकांना हिंदी गाण्यांवर नृत्य करावं लागतं. मराठी तारका हे नृत्य तितकंच उठावदार करतात या वाद नाही. पण त्यानंतर मग नायिका मराठी असेल तर हिंदी गाण्यांवर नृत्य का? असा सवाल सोशल मीडियावर वारंवार विचारला जातो. अशा प्रश्नांना आता अभिनेत्री, अप्सरा सोनाली कुलकर्णीने उत्तर दिलं आहे.
नटरंग, पोस्टर गर्ल, अजिंठा, हिरकणी अशा चित्रपटांमधून झळकलेली अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने मात्र आता एक नवा निश्चय केला आहे. तो असा की ती यापुढे कोणत्याही पुरस्कार सोहळ्यांमध्ये किंवा कोणत्याही कार्यक्रमात हिंदी गाण्यांवर नृत्य करणार नाहीय. सोनाली कुलकर्णी सध्या एका डान्स रियाालिटी शोची परीक्षक होती. त्याच्या अंतिम सोहळ्यावेळी सोनालीने हा मनोदय जाहीर केला. तिच्या या निर्णयाचं सर्वच स्तरातून कौतुक होतं आहे.
सोनाली कुलकर्णी ही अभिनेत्री नृत्यांगना म्हणून जरी सिनेसृष्टीत आली असली तरी हळूहळू तिने तिची इमेज बदलून वेगवेगळ्या विषयांवर बेतलेले चित्रपट दिले. आता मराठीमधली एक उत्तम नायिका म्हणून ती नावाारुपाला आली आहे. सध्या सोनाली कुलकर्णी लगीनघाईत आहे. ती येत्या काही दिवसात दुबईस्थित तिचा मित्र कुणाल याच्याशी विवाहबद्ध होणार आहे. आपलं व्यक्तिगत आयुष्य आनंदाने जगतानाच सोनालीने आपली कारकिर्दही तितकीच बहारदार बनवली आहे. सोनालीच्या या निर्णयाने मात्र तिच्यात असलेला मराठीबाणा तिने दाखवून दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
