एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
शरद पोंक्षेंनी लढाई जिंकली, कर्करोगाशी झुंज दिल्यानंतर रंगमंचावर पुनरागमन
मला सहानुभूतीही नको होती. म्हणून मी अलिप्त राहिलो. सहा महिने ओषधोपचार, किमो थेरेपी घेतल्यानंतर या आजारातून मी पूर्ण बरा झालो आणि आता तुमच्यासमोर उभा राहिलो आहे
मुंबई : बोरिवलीच्या प्रबोधनकार ठाकरे थिएटरचं आवार. नाटकाच्या तालमीसाठी काही मंडळी एकत्र आली होती. यात राजेश देशपांडे, जयंत घाटे, विघ्नेश जोशी आदी मंडळींचा समावेश होता. ही सगळी मंडळी बाहेर थांबून कुणाची तरी वाट पाहात होती. तालमीचा हॉल तर मिळाला होता पण कुणी आत जात नव्हतं. सगळे जण वाट पाहात होते. कुणाची काही कळायला मार्ग नाही. पैकी एकाने गुलाबाचा गुच्छ आणला होता. स्वागताची तयारी सुरू होती. आणि प्रबोधन ठाकरेच्या प्रवेशद्वारातून एक गृहस्थ अवतरले.
डोक्यावर टोपी. बांधा सडपातळ. डोळ्यावर चष्मा.. डोक्यावर पूर्ण टक्कल, चेहऱ्यावरचे केस गेलेले.. पण अत्यंत शांत पण आश्वासक पावलं टाकत हा गृहस्थ जवळ आला तसा नाटकमंडळींमध्ये उत्साह संचारला. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. ते जवळ आल्या आल्या दिग्दर्शक राजेश देशपांडे यांनी हातातला बुके त्याच्या हवाली केला आणि कडकडून मिठी मारली. कारण त्यांच्या नाटकातला मुख्य कलाकार परत आला होता. या कलाकाराचं नाव होतं शरद पोंक्षे. तब्बल सहा महिने कर्करोगाशी झुंज दिल्यानंतर पोंक्षे पुन्हा एकदा नाटकाच्या तालमीला हजर झाले. या नाटकाचं नाव आहे हिमालयाची सावली.
अनेकांना माहिती नसेल पण गेल्या डिसेंबरपासून पोंक्षे कर्करोगाशी लढा देत आहेत. याबद्दल बोलताना पोंक्षे म्हणाले, डिसेंबरमध्ये मला ताप येऊ लागला. रोज संध्याकाळी ताप यायचा. मग निदान झालं ते कॅन्सरचं. कंबरेच्या भागात गाठी तयार होऊन हा कॅन्सर होतो. याच दरम्यान मी सोनाली बेंद्रे, इरफान खान यांच्या बातम्या वाचत होतो. त्यांच्या सोशल मीडियावरच्या पोस्ट पाहात होतो. पण मला माझा आजार कॅश करायचा नव्हता. मला सहानुभूतीही नको होती. म्हणून मी अलिप्त राहिलो. सहा महिने ओषधोपचार, किमो थेरेपी घेतल्यानंतर या आजारातून मी पूर्ण बरा झालो आणि आता तुमच्यासमोर उभा राहिलो आहे.'
या आजारातून बाहेर येण्यासाठी मला सावरकरांची मदत झाली. त्यांनी अकरा वर्षं एका छोट्या खोलीत काढली होती. आणि मला तर काही महिने काढायचे होते. मी सावरकर भक्त आहे. त्याचा मोठा उपयोग मला झाला. या दरम्यान मी खूप गोष्टी, पुस्तकं वाचली. मला राजेशने हिमालयाची सावली नाटक दिलं तेही मी वाचून काढलं. माझ्यासाठी राजेश, निर्माते गोविंद चव्हाण हे थांबले होते. याचा मला विशेष आनंद आहे. म्हणून मी दुप्पट ऊर्जेने बाहेर आलो, असं म्हणत शरद पोक्षे यांनी सर्वांना धन्यवादही दिले.
अभिनेते शरद यांना कर्करोग आहे याची माहिती इंडस्ट्रीत फारशी कुणाला नव्हती. ती मुद्दामच दाबून ठेवण्यात आली होती. शरद यांनी आपला इंडस्ट्रीतला वावरही थांबवला होता. अत्यंत संघर्ष करून त्यांनी या रोगाला परतवून लावलं आहे. आता ते नाटक करत आहेतच. शिवाय आगामी अग्निहोत्र 2 या मालिकेतूनही ते दिसणार आहेत. रसिकांनी जे प्रेम दिलं त्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
राजकारण
बुलढाणा
Advertisement