Tabassum Death: अभिनेत्री तबस्सुम यांचं निधन, 78 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Actress Tabassum Passed Away: ज्येष्ठ अभिनेत्री तबस्सुम गोविल यांचे निधन झालेय. वयाच्या 78 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय.
Actress Tabassum Passed Away: ज्येष्ठ अभिनेत्री तबस्सुम गोविल (Tabassum Govil) यांचे निधन झालेय. वयाच्या 78 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. तबस्सुम गोविल यांना शुक्रवारी रात्री हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारावेळी त्यांचं निधन झालं. तबस्सुम यांनी बाल कलाकार म्हणून चित्रपटात पदार्पण केले होते. 1947 मध्ये मेरा सुहाग या चित्रपटात त्यांनी बालकलाकाराची भूमिका केली होती. त्यांनी त्यांनी अनेक चित्रपटात आणि टीव्ही शोमध्ये सहभाग नोंदवला होता. तबस्सुम यांचा जन्म मुंबईमध्ये झाला होता. त्यांच्या वडिलांचं नाव अयोध्यानाथ सचदेव आणि आईचं नाव असगरी बेगम होतं. तबस्सुम यांचा विवाह विजय गोविल यांच्याशी झाला होता. विजय गोविल रामायण मालिकेत रामाची भूमिका साकारमारे अरुण गोविल यांचे बंधू आहेत.
Veteran actor Tabassum dies due to cardiac arrest. She is known for her work as a child artiste and also as host of popular Doordarshan talk show "Phool Khile Hain Gulshan Gulshan"
— Press Trust of India (@PTI_News) November 19, 2022
हृदयविकारामुळे निधन -
शुक्रवारी रात्री तबस्सुम यांना दोन वेळा हृदयविकाराचे झटके आले होते. रात्री 8.40 वाजता तबस्सुम यांना पहिला हृदयविकाराचा झटका आला होता, त्यानंतर 8.42 वाजता दुसरा झटका आला. त्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. आजच मुंबईमध्ये त्यांच्यावर अंतिम संस्कार होणार आहेत. एबीपी न्यूजसोबत बोलताना त्यांचा मुलगा होशांग गोविल म्हणाला की, आईची इच्छा होती की अंत्यसंस्काराआधी तिच्या मृत्यूबद्दल कुणालाही सांगू नये.
बालकलाकार म्हणून अभिनयाची सुरुवात करणाऱ्या तबस्सुम यांची ओळख फक्त अभिनेत्री म्हणून नव्हती. त्यांनी एक 'टॉक शो'ही होस्ट केला होता. दूरदर्शनवरील पहिला टॉक शो 'फूल खिले हैं गुलशन गुलशन' तबस्सुम यांनी होस्ट केला होता. 'फूल खिले हैं गुलशन गुलशन' या शोला त्यावेळी प्रचंड प्रसिद्धी मिळाली होती. 1972 ते 1993 अशा दोन दशकाहून अधिक काळ त्यांनी 'फूल खिले हैं गुलशन गुलशन' हा शो होस्ट केला होता. या शोमध्ये त्यांनी अनेक दिग्गजांच्या मुलाखती घेतल्या होत्या.
तबस्सुम यांना गेल्या वर्षी कोरोनाची लागण -
तबस्सुम यांना गेल्यावर्षी कोरोनाची लागण झाली होती. 1 0 दिवस रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर त्यांनी कोरोनावर मात केली होती. त्यावेळी त्यांच्या निधनाची अफवाही उडाली होती.