Meena, Vidyasagar : फुफ्फुसाच्या आजाराशी झुंज अयशस्वी, साऊथ अभिनेत्री मीनाचे पती विद्यासागर यांचे निधन
Meena Husband Vidyasagar : साऊथ अभिनेत्री मीनाचे (Meena) पती विद्यासागर (Vidyasagar) यांचे सोमवारी चेन्नईतील एका खासगी रुग्णालयात निधन झाले आहे.
Meena Husband Vidyasagar : साऊथ अभिनेत्री मीनाचे (Meena) पती विद्यासागर (Vidyasagar) यांचे सोमवारी चेन्नईतील एका खासगी रुग्णालयात निधन झाले आहे. विद्यासागर यांच्या फुफ्फुसात संसर्ग झाला होता. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ते मागील काही वर्षांपासून फुफ्फुसाच्या आजाराने त्रस्त होते. यावर्षी जानेवारी महिन्यात संपूर्ण कुटुंबाला कोरोना झाला होता. मात्र, कुटुंबासोबत विद्यासागर यांनीही कोरोनावर मात केली होती. परंतु, त्यानंतरही त्यांची प्रकृती बिघडली होती.
मीडिया रिपोर्टनुसार, डॉक्टरांनी काही आठवड्यांपूर्वी विद्यासागर यांच्या फुफ्फुसांचे प्रत्यारोपण करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, ब्रेन डेड रुग्णांकडूनच हे शक्य असल्याने डोनर मिळण्यात अडचणी येत होत्या. तोपर्यंत डॉक्टरांनी औषधोपचार करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांची ही झुंज अयशस्वी ठरली आहे. अभिनेता सरथकुमारने ट्विट करून त्यांच्या निधनाची माहिती दिली आणि मीना आणि त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.
साऊथ इंडस्ट्रीत शोककळा
मीना यांचे पती विद्यासागर यांच्या निधनामुळे साऊथ इंडस्ट्रीत शोककळा पसरली असून, त्यांच्यावर आज (29 जून) रोजी अंत्यसंस्कार होणार आहेत. विद्यासागर यांच्या निधनावर अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त केला आहे.
अभिनेत्री मीना यांनी 2009 मध्ये बंगळुरूचे उद्योगपती विद्यासागर यांच्याशी लग्नगाठ बांधली होती. या जोडप्याला नैनिका नावाची एक मुलगी आहे. निकानेही तिच्या आईच्या पावलावर पाऊल ठेवत 'थेरी' चित्रपटातून बालकलाकार म्हणून करिअरला सुरुवात केली आहे. मीना यांनीही बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. नंतर त्यांनी मुख्य अभिनेत्री म्हणून चित्रपटांमध्ये पदार्पण केले. 1990 ते 2000च्या दशकापर्यंत त्यांनी इंडस्ट्रीमध्ये भरपूर नाव कमावले होते. साऊथमधील जवळपास प्रत्येक मोठ्या स्टारसोबत त्यांनी स्क्रीन शेअर केली आहे. मात्र, नंतर त्यांनी वयानुसार चित्रपटांमध्ये भूमिका साकारण्यास सुरुवात केली. अलीकडेच त्या ‘दृश्यम 1’ आणि ‘दृश्यम 2’ या चित्रपटात दिसल्या होती. त्या शेवटची तेलुगु चित्रपट ‘सन ऑफ इंडिया’मध्ये झळकल्या होत्या.
हेही वाचा :