Sonu Sood Birthday: खिशात 5000 रूपये घेऊन आला होता मुंबईत, आज कोट्यवधींचा मालक; जाणून घ्या 'रिअल लाईफ हिरो' सोनू सूदबाबत
सोनू सूदचा (Sonu Sood) आज 49 वा वाढदिवस आहे. जाणून घेऊयात सोनूबाबत काही खास गोष्टी....
Sonu Sood Birthday : अभिनेता सोनू सूदचा (Sonu Sood) आज 49 वा वाढदिवस आहे. सोनू हा रिल लाईफबरोबरच रिअल लाईफ हिरो आहे, असं त्याच्या चाहत्यांचे मत आहे. सोनूनं कोरोनाकाळात अनेकांची मदत केली. 30 जुलै 1973 रोजी पंजाबमधील मोगा येथे सोनूचा जन्म झाला. सोनूनं नागपूरमध्ये इंजिनीअरिंगचं शिक्षण घेतलं. इंजिनीअरिंग करत असताना त्याच्यामध्ये अभिनय आणि मॉडेलिंगची आवड निर्माण झाली. त्यानंतर तो मुंबईमध्ये आला. जाणून घेऊयात सोनूबाबत काही खास गोष्टी....
हिट चित्रपटांमध्ये केलं काम
सोनूनं तमिळ चित्रपटसृष्टीमधून करिअरला सुरुवात केली. त्यानं ‘कल्लाझागर’ या तमिळ चित्रपटामध्ये काम केलं. 2002 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘शहीद ए आजम’ या हिंदी चित्रपटामधून त्यानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. चित्रपटांबरोबरच तो जाहिरातींमध्ये देखील काम करतो. सोनूनं आत्तापर्यंत 70 चित्रपटांमध्ये काम केले आहे. हिंदी चित्रपटसृष्टीसोबतच तमिळ, तेलगू, कन्नड आणि पंजबी या भाषांमधील चित्रपटांमध्ये देखील सोनूनं काम केले आहे. दबंग या चित्रपटामध्ये सोनूनं खलनायकाची भूमिका साकारली. काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या 'पृथ्वीराज' या चित्रपटामधील सोनूच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. जोधा अकबर, सिंह इज किंग, एक विवाह ऐसा भी,मिशन मुंबई या चित्रपटांमध्ये सोनूनं महत्वाची भूमिका साकारली.
खिशात 5000 रूपये घेऊन सोनू सूद आला होता मुंबईत आज कोट्यवधींचा मालक
मुंबईमध्ये अभिनय क्षेत्रात काम करण्यासाठी जेव्हा सोनू आला होता तेव्हा त्याच्याकडे 5500 रूपये होते. पण आता सोनूकडे 130 कोटी रूपये संपत्ती आहे. रिपोर्टनुसार, सोनू एका चित्रपटामध्ये काम करण्यासाठी दोन कोटी रूपये मानधन घेतो. तसेच सोनूचे एक प्रोडक्शन हाऊस देखील आहे. या प्रोडक्शन हाऊसचं नाव हे शक्ती सागर असं आहे. तसेच मुंबईमध्ये सोनूचे तीन फ्लॅट आहे. लोखंडवालामध्ये सोनूचं 4BHK अपार्टमेंट आहे. मुंबईमधील जुहू येथे सोनूचे एक हॉटेल आहे. 2 कोटीच्या लग्झरी कारपासून ते 25 हजाराच्या स्कूटरपर्यंत अनेक गाड्या सोनूकडे आहे.
कोरोना काळात केली लोकांची मदत
सोनूनं करोना काळात अनेकांची मदत केली. त्यामुळे लोक त्याला रिअल लाईफ हिरो म्हणतात. सोनूनं कोरोनाकाळात केलेल्या कार्याचं अनेकांनी कौतुक केलं. त्यानं मुंबईत अडकलेल्या लोकांना त्यांच्या गावी परत पाठवण्यास मदत केली. गरजूंच्या मदतीला सोनू नेहमी धावून जातो.
हेही वाचा:
Sonu Sood : कोमातून बाहेर यायला सोनू सूदनं केली मदत, बरं झाल्यावर घेतली अभिनेत्याकडे धाव!