Smriti Mandhana Palash Muchhal: वर्ल्डकपची मोहीम फत्ते, आता लगीनघाई; स्मृती मानधनावर होणाऱ्या 'अहों'कडून कौतुकाची उधळण
Smriti Mandhana Palash Muchhal: स्मृती मानधनाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छलनं इन्स्टाग्रामवर दोन पोस्ट शेअर केल्यात. ज्यामध्ये त्यानं गर्लफ्रेंड स्मृती मानधनाचे फोटो शेअर केलेत आणि वर्ल्डकप 2025 जिंकल्याबद्दल आभार मानले आहेत.

Smriti Mandhana Palash Muchhal: आयसीसी महिला वनडे वर्ल्डकपच्या (ICC Women's ODI World Cup) फायनल्समध्ये टीम इंडियानं (Team India) धडाकेबाज कामगिरी करत इतिहास रचला. 49 वर्षांत पहिल्यांदाच भारताच्या महिला क्रिकेट संघानं देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. 2 नोव्हेंबर रोजी टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिकेविरोधात (South Africa) फायनलचा सामना रंगला. अत्यंत चुरशीच्या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघानं वर्ल्डकपवर आपलं नाव कोरलं. यंदाच्या वर्ल्डकपमध्ये संघातील सर्वच खेळाडूंनी धडाकेबाज कामगिरी केली. अशातच अंतिम सामन्यात स्मृती मानधनानं 58 बॉल्समध्ये रचलेली 45 धावांची खेळी महत्त्वाची ठरली. विजयानंतर टीम इंडियावर सगळीकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अशातच, या शुभेच्छांच्या पोस्टमध्ये सोशल मीडियावरची एक पोस्ट सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. ती पोस्ट म्हणजे, स्मृती मानधनाचा होणारा नवरा पलाश मुच्छलची पोस्ट. स्मृती मानधनाचा (Smriti Mandhana) बॉयफ्रेंड पलाश मुच्छलनं (Palash Muchhal) इन्स्टाग्रामवर दोन पोस्ट शेअर केल्यात. ज्यामध्ये त्यानं गर्लफ्रेंड स्मृती मानधनाचे फोटो शेअर केलेत आणि वर्ल्डकप 2025 जिंकल्याबद्दल आभार मानले आहेत.
पलाश मुच्छलनं इन्स्याग्रामवर पहिला फोटो शेअर केलाय, त्याच्या हातात ट्रॉफी दिसतेय, ज्यामध्ये त्याचा चेहरा दिसत नाहीय, पण स्मृती मानधना दिसते. त्यासोबत त्यानं कॅप्शन लिहिलंय की, "सबसे आगे है हम हिंदुस्तानी..."

दुसऱ्या फोटोमध्ये पलाश मुच्छल क्रिकेटच्या मैदानात निळी जर्सी घातलेल्या स्मृती मानधनासोबत ट्रॉफी हातात घेऊन पोज देत असल्याचं पाहायला मिळालं. या पोस्टसह त्यांनी लिहिलंय की, 'मी स्वप्न तर पाहत नाही ना...' या फोटोंवर चाहत्यांनी फायर आणि हॉर्ट इमोजी शेअर केले आहेत.
महिला विश्वचषक फायनल दरम्यान पलाश मुच्छल त्याची भावी पत्नी स्मृती मानधना हिला सपोर्ट करण्यासाठी उपस्थित होता. विश्वचषक विजयानंतर पलाशनं ट्रॉफी हातात धरलेला स्वतःचा फोटो शेअर केला, ज्यामध्ये स्मृती मानधना देखील आहे. फोटोमध्ये पलाश मुच्छलच्या हातावर SM18 चा टॅटू दिसतो. SM म्हणजे, स्मृती मानधना आणि 18 हा तिचा जर्सी नंबर आहे.

स्मृती मानधना, पलाश मुच्छलचं लग्न कधी?
स्मृती मानधना आणि पलाश मु्च्छल यांच्या रिलेशनशिपबाबत बोलायचं झालं तर, दोघेही 2019 पासून एकमेकांच्या संपर्कात आहेत. त्यांनी जुलै 2024 मध्ये त्यांच्या नात्याला इंस्टाग्रामवर अधिकृत केलेलं. काही दिवसांपूर्वीच एका मुलाखतीत बोलताना पलाश मुच्छलनं लवकरच स्मृती इंदूरची सून होणार असल्याचं जाहीर केलेलं. त्यामुळे सध्या त्यांच्या लग्नाबाबत चर्चा रंगल्या आहेत. गेल्या बऱ्याच दिवसापासून दोघांच्या लग्नाच्या चर्चाही जोरात सुरू आहेत. पण, वर्ल्डकपनंतर दोघेही लग्नाचा बार उडवणार असून तशी तयारीही सुरू झाली आहे. दोघांच्याही घरी लग्नसराई सुरू आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, वर्ल्डकप स्पर्धा संपल्यानंतर नोव्हेंबर महिन्यात स्मृती मानधना आणि पलाश मु्च्छल यांचा लग्नसोहळा पार पडणार आहे. तसेच, 20 नोव्हेंबरपासून दोघांच्या लग्नसमारंभांना सुरुवात होईल आणि हा विवाह स्मृतीच्या घरी म्हणजेच, सांगलीत होणार आहे. आता सांगलीत का? असा प्रश्न सर्वांना पडलाय. तर, स्मृती मानधना दोन वर्षांची असल्यापासून सांगलीत राहतेय. सांगलीतील माधवनगर या उपनगरात स्मृती राहातेय. तिचं शालेय शिक्षणंही तिथंच पार पडलंय.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
तारीख ठरली, मुहूर्त काढला; सांगलीत धुमधडाक्यात पार पडणार स्मृती मानधना-पलाश मुच्छलचा लग्नसोहळा
























