सुपरस्टार संजू बाबाचा पापाराझींना दारूचा हट्ट! दराराच एवढा की निर्व्यसनीही दारुचा ग्लास तोंडाला लावायचे, प्रसिद्ध फोटोग्राफरचा धक्कादायक खुलासा
नुकताच संजय दत्तशी संबंधित एक जुना किस्सा समोर आला असून, तो ऐकून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

Sanjay Dutt: हिंदी चित्रपटसृष्टीत संजय दत्त यांनी ‘संजू बाबा’ म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. दमदार व्यक्तिमत्त्व, सुपरहिट चित्रपट आणि प्रचंड फॅन फॉलोइंग आणि अनेक वादांमुळे तो कायम चर्चेत राहिलाय. मात्र नुकताच संजय दत्तशी संबंधित एक जुना किस्सा समोर आला असून, तो ऐकून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. हा किस्सा प्रसिद्ध सेलिब्रिटी फोटोग्राफर वरिंदर चावला यांनी उघड केला आहे.
संजय दत्त दिग्गज कलाकार सुनील दत्त आणि नरगिस यांचा मुलगा आहे. चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वीच तो आपल्या पालकांमुळे आणि स्टाईलमुळे प्रसिद्ध झालेला. मात्र जितकी लोकप्रियता त्याला पडद्यावर मिळाली, तितक्याच अडचणींचा सामना त्याला वैयक्तिक आयुष्यात करावा लागला. तरीही अनेक संकटांवर तोंड देत त्याने आपली सुपरस्टार प्रतिमा कायम ठेवली आणि आलिशान जीवनशैलीत कधीही तडजोड केली नाही.
फोटोग्राफर्सना दारू पिण्याचा आग्रह
फोटोग्राफर वरिंदर चावलांनी सांगितलेल्या आठवणीनुसार, संजय दत्त अनेकदा शूटिंगदरम्यान फोटोग्राफर्सना आपल्या सोबत दारू पिण्याचा आग्रह करायचा. त्याच्या सुपरस्टार प्रतिमेमुळे कोणीही त्याला नकार देण्याची हिंमत करत नसे. जे लोक दारू पित नसत, तेही संजय दत्तसोबत बसून दारू पित असल्याचं त्यांनी सांगितलं.
फोटोग्राफरने सांगितलं की, “अनेकदा बाबा आम्हाला शूटिंगदरम्यान बोलवायचा आणि विचारायचा, ‘इकडे ये… तुम्ही लोक दारू पिता का?’ आम्ही कामाचं कारण देऊन नकार दिला, तरी तो हट्ट करायचा. आजूबाजूचे लोकही त्यांच्याच बाजूने उभे राहायचे आणि शेवटी आम्हालाही त्याच्या सोबत बसावं लागायचं. ते इतके मोठे स्टार होता की दारू न पिणारेही त्याच्या सोबत पित.”
वॅनिटी व्हॅनचा किस्सा
यातच वरिंदर चावलांनी आणखी एक प्रसंग सांगितला. आपल्या करिअरच्या सुरुवातीला त्यांनी सेकंड हँड मारुती झेन कार घेतली होती. एकदा फिल्मिस्तान स्टुडिओमध्ये संजय दत्तचं शूट सुरू असताना फोटो काढून निघताना, चुकून त्याची कार संजय दत्तच्या वॅनिटी व्हॅनला धडकली. लगेचच संजय दत्तचे लोक त्यांच्या भोवती जमले आणि नुकसानभरपाईची मागणी करू लागले.
त्या वेळी संजय दत्त तिथे आलं आणि नेमकं काय झालं ते विचारलं. सगळं ऐकल्यानंतर त्यांनी आपल्या लोकांना थेट सांगितलं, “त्याला जाऊ द्या.” त्या क्षणी संजय दत्त आपल्यासाठी देवदूतासारखे वाटल्याचं फोटोग्राफरने सांगितलं. त्यांनी संजय दत्त यांचं स्वभावाने शांत आणि समजूतदार व्यक्तिमत्त्व असल्याचंही ते म्हणाले.
‘धुरंधर’च्या यशाचा आनंद
दरम्यान, संजय दत्त सध्या त्यांच्या ‘धुरंधर’ या चित्रपटाच्या प्रचंड यशाचा आनंद घेत आहेत. 2025 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी करत 1,200 कोटींचा टप्पा पार केला आहे. या मल्टीस्टारर चित्रपटाच्या दुसऱ्या भागासाठी प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता असून, पुढील भाग मार्च महिन्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.























