Priya Marathe passes away: देव चांगल्या माणसांना का नेतो? अभिनेत्री प्रिया मराठेच्या निधनानंतर प्राजक्ता माळी काय म्हणाली?
Priya Marathe passes away: प्रिया मराठे या दुर्धर आजारातून बरीही झाली होती. मात्र, अलीकडेच तिच्या शरीरात कर्करोग पुन्हा पसरु लागला. अखेर शनिवारी सकाळी तिची प्राणज्योत मालवली.

Priya Marathe Death: छोट्या पडद्यावरील मराठी आणि हिंदी मालिकांमधून घराघरात पोहचलेली अभिनेत्री प्रिया मराठे हिचे शनिवारी पहाटे निधन झाले. ती अवघ्या 38 वर्षांची होती. प्रिया मराठे (Priya Marathe) हिला कर्करोग होता. गेल्या काही दिवसांपासून तिच्यावर उपचार सुरु होते. मात्र, तिचे शरीर या उपचारांना प्रतिसाद देत नव्हते. अखेर शनिवारी पहाटे मुंबईच्या (Mumbai news) पश्चिम उपनगरातील मीरारोड येथील निवासस्थानी तिची प्राणज्योत मालवली. प्रिया मराठे ही अभिनेता शंतून मोघे याची पत्नी आणि दिवंगत अभिनेते श्रीकांत मोघे यांची सून होती. प्रिया मराठे हिच्या अकाली निधनाने मराठी प्रेक्षकांना मोठा धक्का बसला आहे.
प्रिया मराठे हिच्या निधनाबद्दल मराठी अभिनेत्री आणि सूत्रसंचालक प्राजक्ता माळी हिनेही शोक व्यक्त केला. आम्ही दोघींनी 'एकापेक्षा एक' आणि अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र काम केले होते. प्रिया मराठे ही एक गुणी, शांत, नम्र आणि सोज्वळ मुलगी होती. ती आपल्या कामाशी काम ठेवायची. तिने कधीच दुसऱ्यांना त्रास दिला नाही. तिच्या कामावर तिचं नितांत प्रेम होतं. तिला कोणी काही बोललं तरी ती उलट उत्तरही द्यायची नाही. देव अशी चांगली माणसं का नेतो, असा प्रश्न मला पडला आहे, असे प्राजक्ता माळी हिने म्हटले.
प्रिया मराठे हिने मराठी रंगभूमी, मराठी आणि हिंदी मालिकाविश्वात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता. 'या सुखांनो या' या मालिकेतील प्रियाच्या नकारात्मक भूमिकेतील कामाची चांगलीच प्रशंसा झाली होती. यानंतर तिने 'चार दिवस सासू'चे, 'तू तिथे मी', 'तुझेच मी गीत गात आहे' या मराठी मालिकांमध्येही काम केले होते. याशिवाय, हिंदीत तिने 'कसम से' (Kasamh Se) या मालिकेतून पदार्पण केले होते. नंतर 'पवित्र रिश्ता'मध्ये वर्षा आणि 'बडे अच्छे लगते हैं'मध्ये ज्योती मल्होत्रा ही भूमिका प्रियाने साकारली होती. पवित्र रिश्तामधील तिच्या अभिनयाचे कौतुकही झाले होते. ‘साथ निभाना साथिया’ मालिकेत त्यांनी ‘भावनी राठोड’ ही नकारात्मक पण ठसठशीत भूमिका साकारली होती. मराठी इतिहासावर आधारित 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत त्यांनी 'गोदावरी'ची भूमिका अतिशय समरसून साकारली. ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेतील 'मोनिका' ह्या भूमिकेने त्यांची लोकप्रियता अधिकच वाढवली.
आणखी वाचा

























