Gaurav More : गौरव मोरेने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' का सोडली? पहिल्यांदाच सांगितलं कारण, म्हणाला...
Gaurav More : गौरव मोरेने महाराष्ट्राची हास्यजत्रा सोडण्याचं नेमकं कारण एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं आहे.
Gaurav More : महाराष्ट्राची हास्यजत्रेमधून (Maharashtra HasyaJatra) घराघरांत पोहचलेला गौरव मोरे (Gaurav More) सध्या हिंदी कार्यक्रमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय. सोनी टिव्हीवरील मॅडनेस मचाऐंगे या कार्यक्रमातून तो भेटीला येतोय. पण तरीही हास्यजत्रेमधील फिल्टरपाड्याचा गौरव मोरे काही केल्या प्रेक्षकांना विसरता येत नाहीये. जेव्हा गौरवने हास्यजत्रा सोडण्याचा निर्णय घेतला, तेव्हा त्याच्या चाहत्यांना धक्का बसला होता. पण त्याने हास्यजत्रा सोडण्याचा निर्णय का घेतला? याविषयी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये भाष्य केलं आहे.
एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये गौरवने अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. तसेच कार्यक्रम सोडणार हे हास्यजत्रेच्या सेटवर पहिल्यांदा कोणाला सांगितलं याविषयी देखील गौरवने खुलासा केलाय. पण त्याच्या हास्यजत्रा सोडण्यामागे नेमकं कारण काय होतं हे जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता होती. कामात तोच तोचपणा येत असल्याचं सांगत गौरव मोरेने हास्यजत्रा सोडण्याचं कारण सांगितलं आहे.
गौरव मोरेने हास्यजत्रा का सोडली?
गौरवने महाराष्ट्राची हास्यजत्रा का सोडली? या प्रश्नाचं उत्तर देताना गौरव मोरेने म्हटलं की, माझ्यामध्ये तोच तोचपणा जास्त येत होता. माझ्या रिऍक्शनही बोलायच्या आधी त्याच त्याच येत होत्या. पाच वर्ष सलग तो कार्यक्रम केल्यामुळे मला ती सवय लागली होती. त्यामुळे थोडं थांबायला हवं असं मला वाटलं. त्याचवेळी हिंदीतून काम आलं आणि लिमिटेड एपिसोड्सच होते. नंतर म्हटलं की चला लिमिटेड जूनपर्यंत आहे ना मग करुया आपण. मग हे जरा वेगळं काम आहे, तिथे आपल्या सारख्या रिऍक्शन येणार नाहीत. म्हणून मी निर्णय घेतला.
सेटवरती सगळ्यांना अंदाज दिला - गौरव मोरे
महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम सोडताना सगळ्यात आधी कोणाला सांगितलं? यावर गौरवने म्हटलं की, सेटवरतीही मी सगळ्यांना अंदाज दिला होता की असं असं आहे, तर मी जरा थांबेन. कारण कान्ट्रॅक्टही संपलं होतं. गोस्वामी सर म्हणाले की, ब्रेक घे, ब्रेक नंतर परत ये. मी त्यांना म्हटलं की, सर नाही होणार, कारण तोच तोच पणा यायला लागला आहेत. त्याच रिऍक्शन्स यायला लागल्या आहेत. पाच वर्ष इकडे काम करतोय म्हटल्यानंतर मी पण जरा आता थांबतो.