Drug Case | भारती-हर्षला जॉनी लिव्हर यांचा मोलाचा सल्ला
राजू श्रीवास्तव तर या दोघांवरही भडकला होता. आता विनोदाचे अनुभवी बादशाह जॉनी लिव्हर यांनी भारती आणि हर्षला मोलाचा सल्ला दिला आहे.
मुंबई : कॉमेडियन भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया या दोघांची नावं एनसीबीच्या रडारवर आली आणि एकच गहजब उडाला. पैसा आणि प्रसिद्धी हाती आली की अनेकांचा पाय घसरतो हेच पुन्हा एकदा समोर आलं. काही दिवसांपूर्वी विनोदवीर राजू श्रीवास्तवने भारती आणि हर्षचं नाव एनसीबीमध्ये आल्यानंतर आपलं मत व्यक्त केलं होतं. राजू श्रीवास्तव तर या दोघांवरही भडकला होता. आता विनोदाचे अनुभवी बादशाह जॉनी लिव्हर यांनी भारती आणि हर्षला मोलाचा सल्ला दिला आहे.
जॉनी लिव्हर यांनी अत्यंत मेहनतीने आपलं स्थान इंडस्ट्रीमध्ये स्थापन केलं. मिमिक्री, टायमिंग आदी गोष्टीत काळानुसार बदल करत जॉनी भाई जवळपास 30 पेक्षा जास्त वर्षं इंडस्ट्रीत टिकून आहेत. आता जॉनीभाई यांनी भारती आणि हर्षला साधा पण मोलाचा सल्ला दिला आहे. 'चुका आपल्या सगळ्यांकडून होतात. पण त्यावर पांघरूण घालण्यापेक्षा त्या मान्य करायला हव्यात. तुम्ही एकदा त्याला कारणं देऊ लागला की मग त्याला अंत उरत नाही. म्हणून चूक झाली असेल तर ती मान्य करा आणि पुन्हा कधीच अमली पदार्थ न घेण्याबद्दल शपथ घ्या', असं जॉनी लिव्हर यांनी म्हटलं.
जॉनी लिव्हर यांनी हा सल्ला देताना अभिनेता संजय दत्त यांचं उदाहरण दिलं आहे. जॉनी लिव्हर म्हणतात, हर्ष आणि भारती एकदा बाहेर आल्यानंतर त्यांनी शपथ घ्यायला हवी. अमली पदार्थाचं सेवन सोडायला हवं. आपल्या सहकाऱ्यांशी बोलायला हवं. अशानेच या गोष्टीपासून आपण दूर राहू शकतो. गोष्टी मान्य केल्या की त्या सोडणं सोपं होतं. याला उत्तम उदाहरण म्हणजे संजय दत्त आहे. संजय यांनी आपण अमली पदार्थ घेत असल्याचं सांगितलं. जगाला सांगितलं आणि त्यातून ते विविध पर्याय वापरून बाहेरही आले.
संबंधित बातम्या
- आता मला कळलं भारती-हर्ष लग्नात इतकी कॉमेडी कशी करत होते; राजू श्रीवास्तव भडकला!
- कधीकाळी दोन वेळच्या भाकरीची भ्रांत असणारी भारती आता कोट्यवधींची मालकीन