(Source: ECI/ABP News/ABP Majha)
दिलीपकुमारांचं शूटिंग पाहायला सायकलवरुन गेले होते शरद पवार, पवारांनी सांगितले किस्से!
Dilip Kumar Passes Away : राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार यांनी दिलीपकुमार यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे. तसेच त्यांच्यासोबत असलेल्या काही आठवणींना उजाळा दिला आहे.
Dilip Kumar Passes Away : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन झालं असून ते 98 वर्षांचे होते. आज सकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज सायंकाळी पाच वाजता अभिनेते दिलीपकुमार यांचे अंत्यसंस्कार शासकीय इतमामात होणार आहेत. दरम्यान राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार यांनी दिलीपकुमार यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे. तसेच त्यांच्यासोबत असलेल्या काही आठवणींना उजाळा दिला आहे.
Dilip Kumar : 'लखलखता तारा निखळला', दिलीप कुमारांच्या निधनानंतर पंतप्रधान मोदींसह दिग्गज नेते भावूक
शरद पवार म्हणाले की, दिलीप कुमार यांनी मोलाची कामगिरी केली. दिलीप कुमार आज आपल्यात राहिले नाहीत. माझ्या नजरेसमोर अनेक आठवणी आहेत. माध्यमिक शिक्षण घेत असताना पुणे जिल्ह्यात जेजुरीमध्ये नया दौरचं शूटिंग सुरू आहे असं आम्हाला कळलं. ते पाहायला आम्ही लोकं सायकल वरून तिथे गेलो. तेव्हा पहिल्यांदा दिलीप कुमार यांना लांबून पाहायची संधी मिळाली. नंतर राज्य सरकार विधिमंडळाच्या क्षेत्रात काम करताना दिलीप कुमार आणि माझं एक वेगळं नात निर्माण झालं, असं पवार म्हणाले.
Dilip Kumar : बॉलिवूडच्या 'ट्रॅजेडी किंग'चा मोहम्मद युसूफ खान ते दिलीप कुमारपर्यंतचा प्रवास!
पवारांनी सांगितलं की, माझ्या प्रत्येक निवडणुकीत ते एक सभा करत. मुंबईच्या सार्वजनिक जीवनात राजकारण सोडून त्यांचा सहभाग होता. मुंबईच्या प्रश्नांबाबत त्यांनी अनेकदा लक्ष घातले होते. सगळ्या घटकांशी संबंध वाढतील याची खबरदारी घेत असत. इजिप्त ,सीरिया देशात दिलीप कुमार आणि मी सहकाऱ्यांसोबत गेलेलो. इजिप्त सारख्या देशात पण आम्ही बाहेर पडल्यावर स्थानिक नागरिक तरुण त्यांना पाहायला गर्दी करायचे. त्यांची लोकप्रियता भारत बाहेर देखील होती, असं पवार म्हणाले. पवार म्हणाले की, मी वडीलधाऱ्या स्नेही व्यक्तिला मुकलो. अखंड सेवा करण्याचे काम त्यांनी केलं. त्यांना मृत्यूनंतर आत्म्याला शांती मिळो अशी प्रार्थना करतो. कुटुंबियांना धीर देण्यासाठी साथ देऊ, असंही पवारांनी म्हटलं आहे.
शरद पवार अंत्यसंस्काराला उपस्थित राहणार
आज सायंकाळी पाच वाजता अभिनेते दिलीपकुमार यांचे अंत्यसंस्कार शासकीय इतमामात होणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तशा सूचना दिल्या आहेत. दिलीप कुमार यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी पाच वाजता कब्रस्तानमध्ये अंत्यसंस्कार केले जातील. याच कब्रस्तानमध्ये मोहम्मद रफी,मधुबाला, मजरूह सुल्तानपुरी अन्य अनेक सेलिब्रिटींवर अंतिम संस्कार करण्यात आले आहेत. दरम्यान दिलीप कुमार यांचं चित्रपट सृष्टीतील योगदान पाहता त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तशा सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. दिलीप कुमार यांच्या अंत्यसंस्काराला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार हे उपस्थित राहणार आहेत.