(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Dharmaveer : 'गुरुपौर्णिमा' या गाण्यातून उलगडणार गुरू-शिष्याच्या नात्याचा महिमा; 'धर्मवीर : मु.पो.ठाणे' चित्रपटातील गाणं प्रेक्षकांच्या भेटीला
'गुरुपौर्णिमा' हे गाणं आज प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे.
Dharmaveer : गुरुविण कोण दाखवील वाट ! गुरुमहिमेचं महात्म्य सांगणारी ही ओळ ! आपल्याकडे गुरूला केवळ ब्रह्म, विष्णू, महेश नाही तर साक्षात परब्रम्ह म्हटलं जाण्याची परंपरा आहे. महाराष्ट्राला गुरू-शिष्य परंपरेचा मोठा इतिहास आहे. सामाजिक-राजकिय क्षेत्रातही असे अनेक नेते होऊन गेलेत ज्यांचं शिष्यत्व पत्करून आजही अनेकजण त्यांच्या विचारांच्या वाटेवर चालतात. राजकीय क्षेत्रातील गुरू-शिष्याची आदर्शवत ठरावी अशीच एक जोडी या महाराष्ट्राने बघितली आहे. ही जोडी म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे ! त्यांच्या आयुष्यात जे स्थान छत्रपती शिवाजी महाराजांचं होतं, जी भक्ती दुर्गामतेसाठी होती अगदी तशीच श्रद्धा बाळासाहेबांवर होती. त्यांच्या याच गुरुभक्तीचं दर्शन 'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे' या चित्रपटातही होणार आहे आणि याच धर्तीवरचं 'गुरुपौर्णिमा' हे गाणं आज प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. 'गुरुपौर्णिमा हा गुरूचा नाही तर शिष्याचा दिवस आहे' असे आनंद दिघे मानायचे. या दिवशी गुरुची सेवा केली की पदरी पुण्य पडतं अशी त्यांची श्रद्धा होती. आपल्या गुरूंचे चरणकमल धुण्याचा आणि पाद्यपूजा करण्याचा प्रसंग या गाण्यातून रेखाटला आहे. आनंद दिघे यांची जी श्रद्धा बाळासाहेबांप्रति होती अगदी तशीच श्रद्धा आनंद दिघे साहेबांबद्दल ठेवणारे शिष्य म्हणजे एकनाथ शिंदे. त्यांच्या या गुरू शिष्य नात्याची अनोखी गोष्ट या चित्रपटातून आणि या गाण्यातून उलगडणार आहे.
संगीता बर्वे यांचे शब्द असलेल्या या गाण्याला संगीत आहे अविनाश-विश्वजीत यांचं तर ते गायलं आहे मनिष राजगिरे यांनी. भिंतीवर छत्रपतीं शिवाजी महाराजांची मोठी तस्वीर, त्या पुढ्यात खुर्चीवर बसलेले बाळासाहेब आणि त्यांच्या चरणी बसलेले आनंद दिघे आणि हा सर्व नजरा आपल्या भरल्या डोळ्यांत साठवणारे एकनाथ शिंदे असं सहज सुंदर पण तितकंच रोमहर्षक दृश्य या गाण्यात रेखाटण्यात आलं आहे.
धर्मवीर आनंद दिघे यांनी निस्वार्थीपणे , कोणताही लोभ न ठेवता केवळ आणि केवळ सामान्यांच्या भल्यासाठी आपलं आयुष्य वेचलं. यामधून आनंद दिघे यांचा करारी बाणा तर दिसणारच आहे पण त्यांच्या आत असलेला एक हळवा शिष्य, गुरुंपुढे निस्सिम श्रद्धेने, आदराने नतमस्तक होणारा शिष्य अशी त्यांची एक दुसरी बाजू प्रेक्षकांना 'गुरुपौर्णिमा' या गाण्यातून बघायला मिळणार आहे. धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे चित्रपटात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका मकरंद पाध्ये या अभिनेत्याने साकारली आहे. या गाण्यातून प्रथमच बाळासाहेबांच्या या महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखेची झलक प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. प्रसाद ओक, क्षितिश दाते यांच्याप्रमाणेच बाळासाहेब ठाकरे यांची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या मकरंद पाध्ये यांच्या लुकवरही रंगभूषाकार विद्याधर बट्टे यांनी घेतलेली मेहनत दिसून येते.
झी स्टुडिओज, मंगेश देसाई यांच्या साहिल मोशन आर्ट्सची निर्मिती असलेला, आणि प्रविण तरडे यांच्या लेखन दिग्दर्शनाने सजलेला धर्मवीर मु.पो. ठाणे हा चित्रपट येत्या १३ मे रोजी महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा :
- Laal Singh Chaddha : आमिर खानच्या 'लाल सिंह चड्ढा'वर बंदी घालण्याची मागणी, नेमकी कारणं तरी काय?
- Ankit Tiwari : ‘...त्यांच्यामुळे माझ्या 3 वर्षांच्या मुलीला उपाशी राहावं लागलं’, पंचतारांकित हॉटेलवर संतापला गायक अंकित तिवारी
- Rocky Aur Rani Ki Prem Kahani Release Date : आलिया-रणवीरच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'ची रिलीज डेट जाहीर