(Source: ECI/ABP News/ABP Majha)
The Kashmir Files : 'द कश्मीर फाइल्स'ने केला जागतिक विक्रम; भारतीय सांकेतिक भाषेत ओटीटीवर प्रदर्शित होणारा ठरला पहिला सिनेमा
The Kashmir Files : 'द कश्मीर फाइल्स' हा सिनेमा झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे.
Kashmir Files Sign Language : मार्चमध्ये प्रदर्शित झालेला 'द कश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. 'द कश्मीर फाइल्स' हा सिनेमा आता 13 मे रोजी झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हिंदी, तमिळ, तेलुगु आणि कन्नडमध्ये प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाची खासियत म्हणजे हा सिनेमाचा भारतीय सांकेतिक भाषेत ओटीटीवर प्रीमिअरदेखील होत आहे.
झी 5 ने नुकतेच मुंबईत 'द कश्मीर फाइल्स' या सिनेमाचे भारतीय सांकेतिक भाषेत खास स्क्रीनिंग आयोजित केले होते. कमी ऐकू येणाऱ्या 500 प्रेक्षकांच्या उपस्थितीत हे स्क्रीनिंग पार पडले. या विशेष स्क्रीनिंगला विवेक अग्निहोत्री, अभिनेत्री पल्लवी जोशी आणि अभिनेता दर्शन कुमार यांनी हजेरी लावली होती.
भारतीय सांकेतिक भाषेत बॉलिवूड सिनेमा प्रदर्शित करणारे झी 5 हे पहिले ओटीटी प्लॅटफॉर्म आहे. यामुळे कर्णबधिरांना सिनेमा पाहणे आणि समजणे सोपे झाले आहे. सिनेमा सर्वांपर्यंत पोहोचावा हा त्यामागचा उद्देश आहे.
दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री म्हणाले,"द कश्मीर फाइल्स' हा सिनेमा जगभरातील सिनेप्रेक्षकांपर्यंत पोहोचला आहे. आता हा सिनेमा हिंदी, तमिळ, तेलुगु आणि कन्नड भाषेतसह भारतीय सांकेतिक भाषेतदेखील प्रदर्शित झाला आहे".
'द कश्मीर फाइल्स' हा सिनेमा नव्वदच्या दशकात काश्मीर खोऱ्यातील पंडितांच्या हत्येच्या आणि अमानुष अत्याचारांच्या घटनांचे वर्णन करतो. या सिनेमात पल्लवी जोशी, दर्शन कुमार, मिथुन चक्रवर्ती, चिन्मय मांडलेकर आणि अनुपम खेर मुख्य भूमिकेत आहेत.
सिंगापूरमध्ये ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटावर बंदी
सिंगापूरमध्ये 'द कश्मीर फाइल्स'वर बंदी घालण्यात येणार आहे. याचे कारण चित्रपटात दाखवण्यात आलेली तोडफोड असल्याचे म्हटले जात आहे. ‘द काश्मीर फाइल्स' शहर-राज्य मार्गदर्शक तत्त्वांच्या कक्षेबाहेर आहे. अहवालात अधिकाऱ्यांनी सांगितले की, चित्रपटात मुस्लिमांचे चिथावणीखोर आणि एकतर्फी चित्रण आहे. यासोबतच काश्मीरमध्ये सुरू असलेल्या हिंदू-मुस्लिम संघर्षात हिंदूंचा होणारा छळही एकतर्फी आहे, या गोष्टी नियमांविरुद्ध आहेत. 'द कश्मीर फाइल्स' सिंगापूरच्या चित्रपट वर्गीकरण मार्गदर्शक तत्त्वांच्या पलीकडे असल्याचे म्हटले आहे.
संबंधित बातम्या