देशात वेगळं वातावरण करण्याचं काम काही शक्ती करत आहेत; 'द काश्मीर फाईल्स'चा संदर्भ देत शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
Sharad Pawar : भोंगा आणि हनुमान चालीसावरून सुरू असलेल्या राजकारणावर पिंपरीमध्ये आज ईद ए मिलन या स्नेह मेळाव्याचे आयोजन केलं होतं.
पुणे: देशात सध्या वेगळं वातावरण निर्माण करण्याचं काम काही शक्ती करत आहेत, पण आपल्याला धार्मिक तेढ नको, एकात्मता हवीय असं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी केलं. पिंपरी येथे आयोजित ईद ए मिलन या स्नेह मेळाव्यासाठी शरद पवार उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते.
शरद पवारांसोबत मंचावर सर्व धर्मीय धर्मगुरू होते. भोंगा आणि हनुमान चालीसावरून सुरू असलेल्या राजकारणावर आजच्या या स्नेह मेळाव्याचे आयोजन केलं गेल्याचं दिसून येतंय. पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसने याचं आयोजन केलं होतं.
शरद पवार म्हणाले की, "ईद होऊन गेली, पण ईद चा विचार काही संपलेला नाही. तो विचार जतन करणे, एकवाक्यता निर्माण करणं, भाईचारा वाढवणं, संकटाच्या काळात मदतीला धावणे अशा अनेक समस्यावेळी आपण एकतेचा संदेश देतो. धर्म हा बंधुभाव, इतिहास सांगतो. कोणताही धर्म समाजात तेढ निर्माण करा असं म्हणत नाही. ईदच्या निमित्ताने एकवाक्यता तयार करणं हे आपलं कर्तव्य आहे. त्याच अनुषंगाने हा कार्यक्रम महत्वाचा आहे"
शरद पवार पुढे म्हणाले की, "देशात वेगळं वातावरण तयार करण्याचं काम काही शक्ती करत आहेत. आताच सांगितलं की 'द काश्मीर फाईल्स' काय आहे हे. तर देशाचा हा एक भाग आहे. पण जवळच्या देशाने काही हल्ले केले. तेव्हा हिंदू-मुस्लिमांवर जे हल्ले झाले, त्यावेळी भाजप विचारी सत्ता होते आणि आज तेच काश्मीर फाईल मधून वेगळं दाखवलं.
देशाती सद्य स्थितीवर भाष्य करताना शरद पवार म्हणाले की, "शिवाजी महाराजांनी काय सांगितलं, समाजात बंधुभाव राखा. दिल्लीत मोघलांचं, औरंगाबाद, राजस्थानमध्ये काही राज्यंआली. पण महाराष्ट्रात रयतेचे, हिंदवी स्वराज्याचे राज्य आलं. कधीही आपल्या राज्यात भोसल्यांचे राज्य म्हटलं गेलं नाही. पण काही लोक आपल्या राज्यात तेढ निर्माण करू पाहत आहेत. पण आम्हाला नको ही तेढ. आम्हाला एकता हवी, विकास हवा. हीच एकता निर्माण करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले, समाजासमोर एक आदर्श उभा करणारा हा संदेश दिला."
राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले की, "राष्ट्रीय एकात्मता हा विषय देश पातळीवर नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरचा झालाय. जर्मनी, अफगाणिस्तान, श्रीलेंकेवर काय परिस्थिती उद्भवली हे आपण पाहतोय. तिथं ही वेगेवेगळे विषय पुढं आणले जायचे. मात्र मुख्य प्रश्न समोर आले की मग काय होतं, हे आज श्रीलंकेत आपण पाहतोय. अख्खा देश रस्त्यावर उतरू लागलाय, कशासाठी धर्मासाठी नव्हे तर तिथं उद्भवलेल्या परिस्थितीमुळं."