Bell Bottom Film | बेलबॉटम येणार ओटीटीवर?
महाराष्ट्रात वाढवलेला लॉकडाऊन पाहता अक्षयकुमारचा बेलबॉटम चित्रपट आता ओटीटीवर येण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात वाढवलेला लॉकडाऊन पाहता आता सिनेमावाल्यांनी आपले नवे मार्ग शोधायला सुरुवात केली आहे. अर्थात यासाठी त्यांच्याकडे एकच मार्ग उरला आहे तो म्हणजे ओटीटीचा. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कोरोनाचा संसर्ग होतो आहे. महाराष्ट्राने तर आता ब्रेक द चेन अंतर्गत लॉकडाऊन वाढवला आहे. या लॉकडाऊन वाढवत असल्याची कुणकुण लागल्यानंतर अक्षयकुमार, वाणी कपूर यांची मुख्य भूमिका असलेल्या बेलबॉटम या सिनेमाच्या टीमने चित्रपट आता ओटीटीवर आणायचं ठरवलं आहे.
अक्षयकुमारची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाचं शूट गेल्या लॉकडाऊनमध्ये पार पडलं. अक्षयकुमारने यासाठी खूप मेहनत घेतली होती. त्यावेळच्या बातम्याही आल्या होत्या. आता हा सिनेमा बनून तयार आहे. अनलॉकिंग सुरूवात झाल्यानंतर या चित्रपटाने आपली रिलीज डेट जाहीर केली होती. 28 मे रोजी हा सिनेमा येणार होता. पण आता संपूर्ण भारतभरात वाढलेला कोरोनाचा संसर्ग पाहता आणि राज्यात लागलेला लॉकडाऊन पाहता हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज न करता थेट ओटीटीवर आणायच्या चर्चेला उधाण आलं आहे. या चित्रपटाचे निर्माते निखिल आडवानी यांनी सूचक विधान करत हा चित्रपट कदाचित ओटीटीवर जाण्याबद्दल सांगितलं आहे.
एकिकडे सलमान खानच्या राधे-युवर मोस्टवॉंटेड भाई या चित्रपटाने हायब्रीड रिलीज करायचं ठरवलं आहे. त्यावरून बराच वादंग उठला. पण अखेर राधे हा चित्रपट सिनेमा आणि ओटीटी अशा दोन्ही माध्यमांमध्ये रिलीज होणार आहे. याचीच री ओढत आता बेलबॉटम हा चित्रपटही ओटीटीवर येतो आहे. बेलबॉटमनंतर सगळ्यात मोठा सिनेमा थिएटरवर येणार आहे तो नागराज मंजुळे दिग्दर्शित झुंड. या सिनेमाने आपली तारीख 18 जून ठरवली आहे. त्या सिनेमाने मात्र अद्याप आपलं नियोजन जाहीर केलेलं नाही.
बॉलिवूड हंगामाने दिलेल्या वृत्तानुसार बेलबॉटम हा चित्रपट डिस्ने हॉटस्टारवर येण्याचं निश्चित करण्यात आलं आहे. पण अद्याप याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.