(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Gadar 2: सनी देओलच्या 'गदर 2'वर सेन्सॉर बोर्डाची कात्री; चित्रपटात 'हे' बदल करण्याचे दिले निर्देश
'गदर 2' हा चित्रपट रिलीज होण्याआधी सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटात काही बदल करण्याचे निर्देश चित्रपट निर्मात्यांना दिले आहेत.
Gadar 2: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सनी देओलचा (Sunny Deol) 'गदर 2' (Gadar 2) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. गदर: एक प्रेम कथा या 2001 मध्ये रिलीज झालेल्या चित्रपटाचा 'गदर 2' हा रिमेक आहे. गदर: एक प्रेम कथा या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. आता गदर: एक प्रेम कथा प्रमाणेच 'गदर 2' या चित्रपटाला देखील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो का? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. पण 'गदर 2' हा चित्रपट रिलीज होण्याआधी सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटात काही बदल करण्याचे निर्देश चित्रपट निर्मात्यांना दिले आहेत. सेन्सॉर बोर्डाने 'गदर 2' मध्ये कोणते बदल करण्याची सूचना दिली आहे? याबद्दल जाणून घेऊयात...
सेन्सॉर बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने 'गदर 2' मध्ये काही बदल करण्याचे निर्देश दिले आहेत. सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्या'गदर 2' या चित्रपटात पुढील बदल करण्याच्या सूचना सेन्सॉर बोर्डाने फिल्म मेकर्सला दिल्या आहेत-
- 'गदर 2' मधील दंगलीच्या सीनदरम्यान दंगलखोरांनी दिलेल्या 'हर हर महादेव'च्या घोषणा चित्रपटातून काढून टाकण्यात आल्या असून चित्रपटाच्या सबटायटलमध्ये देखील या घोषणांना स्थान देण्यात आलेले नाही.
- 'गदर 2' चित्रपटात 'तिरंगा' ऐवजी 'झंडे' हा शब्द वापरण्यास सेन्सॉर बोर्डानं चित्रपटात निर्मात्यांना सांगितलं आहे. 'हर झंडे को... में रंग देंगे'. असा डायलॉग या चित्रपटामध्ये ऐकू येणार आहे.
- 'गदर 2' चित्रपटाच्या एका सीनमध्ये ठुमरी गायलेली दाखवण्यात आली आहे, ज्याचे बोल असे आहेत - 'बता दे सखी... गये शाम'... जे आता 'बता दे पिया कहां बिताई शाम...' असे करण्यात आले आहेत.
- कुराण आणि गीतेच्या संदर्भात चित्रपटात एक डायलॉग आहे जो पुढीलप्रमाणे आहे - 'दोनों एक ही तो हैं, बाबा नानक जी ने भी यही कहा है'. सेन्सॉर बोर्डाच्या सूचनेनुसार आता हा डायलॉग बदलून 'एक नूर ते सब उपाजे, बाबा नानक जी ने भी यही कहा है' असा करण्यात आला आहे.
- सेन्सॉर बोर्डाने 'गदर 2' च्या शेवटी हिंसाचार आणि रक्तपाताच्या दृश्यांदरम्यान 'शिव तांडव' मधील श्लोक आणि शिव मंत्रांचा जप बदलला आहे. या सीन्सच्या बॅकग्राउंडला संगीत वाजण्यास परवानगी दिली आहे.
- सेन्सॉर बोर्डाने निर्मात्यांना चित्रपटात वापरण्यात आलेल्या सर्व श्लोक आणि मंत्रांच्या अनुवादाच्या प्रती जमा करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.
- 'गदर 2' मध्ये 1971 मध्ये भारत-पाकिस्तानमधील युद्धाच्या संदर्भात अनेक गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत, ज्याबाबत सेन्सॉर बोर्डाने निर्मात्यांना कागदोपत्री पुरावे सादर करण्यास सांगितले आहे.
- एबीपी न्यूजकडे असलेल्या सेन्सॉर बोर्डाच्या कट्सच्या यादीनुसार, चित्रपटात 'बास्टर्ड' शब्दाच्या जागी 'इडियट' हा शब्द टाकण्यात आला आहे.
- चित्रपट सुरू होण्यापूर्वी स्क्रीनवर दाखवण्यात येणारे डिस्क्लेमर बदलण्याच्या सूचना सेन्सॉर बोर्डाने दिल्या आहेत.
- 'गदर 2' या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने U/A प्रमाणपत्र दिले आहे.
कधी रिलीज होणार 'गदर 2'?
'गदर 2' हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाची 'ओह माय गॉड 2' या चित्रपटासोबत बॉक्स ऑफिसवर टक्कर होणार आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Gadar 2 Trailer: 'गदर-2' च्या ट्रेलरनं वेधलं लक्ष; नेटकरी म्हणाले, 'अंगावर शहारे आले'