Chatrapati Tararani : औरंगजेबाच्या स्वप्नांना धुळीस मिळवणारी 'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी'; सोनाली कुलकर्णी पुन्हा एकदा ऐतिहासिक भूमिकेत
Chatrapati Tararani : सोनाली कुलकर्णीचा आगामी 'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Chatrapati Tararani : महाराणी छत्रपती ताराबाई यांच्या जीवनावर आधारीत 'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी' (Chatrapati Tararani) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या शूटिंगला आजपासून दिमाखात सुरुवात झाली आहे. 'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी' सिनेमासाठी चित्रनगरीत भव्य सेट उभारला असून संपूर्ण सेट इतिहासातील पराक्रमांमध्ये न्हाऊन निघाला आहे.
अक्षय बर्दापूरकर आणि 'मंत्रा व्हिजन' निर्मित 'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी' हा सिनेमा येत्या दिवाळीमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या 'मोगलमर्दीनी महाराणी ताराबाई' या ग्रंथावर आधारीत असून, 'मोगलमर्दीनी छत्रपती ताराराणी' या सिनेमाची कथा, पटकथा आणि संवाद डॉ. सुधीर कोंडीराम निकम यांचे आहेत आणि राहुल जनार्दन जाधव यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.
मराठी साम्राज्याचा औरंगजेबाच्या मनात पुन्हा दबदबा निर्माण करणाऱ्या छत्रपती ताराराणींची व्यक्तिरेखा मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णी साकारत आहे. शिवाय सिनेमाला अवधूत गुप्ते यांनी संगीत दिलं आहे.
View this post on Instagram
'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी' या सिनेमाचे दिग्दर्शक राहुल जनार्दन जाधव म्हणतात,"छत्रपती ताराराणींची शौर्यगाथा प्रत्येकाला माहिती असणे गरजेचे आहे आणि म्हणूनच या सिनेमाद्वारे आपला लखलखीत इतिहास आम्ही प्रेक्षकांच्या समोर आणत आहोत. प्रेक्षकांना हा अनोखा सिनेमा नक्की आवडेल अशी माझी खात्री आहेठ".
'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी' या सिनेमाबद्दल अक्षय बर्दापूरकर म्हणाले,"जेव्हा पासून हा सिनेमा येतोय अशी घोषणा केली तेव्हा पासूनच तांत्रिक टीम पासून ते कलाकारांपर्यंत सर्वांनीच या सिनेमासाठी स्वतःला झोकून दिले आहे. इतक्या दिवसाचा अभ्यास, वर्कशॉप, प्री वर्क, ही सर्व तयारी केल्यानंतर अखेर हा सिनेमा चित्रीकरणासाठी सज्ज झाला आहे. सेटवर येण्याआधी सगळ्याच टीमने आपापल्या विभागामध्ये प्रत्येक गोष्टीचा बारकाईने अभ्यास करून, हा सिनेमा सर्वोत्तम कसा करता येईल, याची खबरदारी घेतली आहे. त्यामुळे संपूर्ण टीम या विषयाला आणि सिनेमाला योग्य न्याय देतील, यात शंका नाही. मला आनंद आहे की, सोनाली सारखी गुणी अभिनेत्री ही मुख्य भूमिका साकारणार आहे. धाडस आणि शौर्य यांचे असामान्य असे मिश्रण असणाऱ्या छत्रपती ताराराणींचा अज्ञात प्रवास प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्याचा हा आमच्या संपूर्ण टीमचा उद्देश आहे."
संबंधित बातम्या