Krishnakumar Kunnath Died : गायक केके यांचे निधन, कोलकाता येथील लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान हृदयविकाराचा झटका
Krishnakumar Kunnath Died : गायक केके यांचे लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान निधन झाले आहे. पंतप्रधानांसह देशातील अनेकांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
Krishnakumar Kunnath Died : गायक केके (Krishnakumar Kunnath) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. कोलकाता येथील लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान हृदय विकाराचा झटका आल्याने त्यांना CMRI रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. केके यांच्या निधनानंतर बॉलिवूडवर शोककळा पसरली असून अनेकांनी त्यांच्या निधनावर हळहळ व्यक्त केली आहे.
कार्यक्रमादरम्यान मंचावरच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. बॉलिवूडमधील 200 हून अधिक सुपरहिट गाणी त्यांनी गायली आहेत. 'हम दिल दे चुके सनम' या सिनेमातील 'तडप तडप के इस दिल से' हे त्यांचं गाणं लोकप्रिय झालं होतं. केके यांचा कोलकाता येथील विवेकानंद कॉलेजमध्ये कार्यक्रम होता. केके यांनी स्वत: या कार्यक्रमासंदर्भात माहिती दिली होती.
View this post on Instagram
सेलिब्रिटींनी केला शोक व्यक्त
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार, गायक अरमान मलिक, अभिनेत्री सोनल चौहान आणि मुनमुन दत्तासह अनेक सेलिब्रिटींनी केके यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. केके सर या जगात आता नाहीत, यावर आमचा विश्वासच बसत नाही, असे म्हणत अरमानने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. भारताच्या हिंदी चित्रपटसृष्टीच्या ख्यातनाम गायक-गायकांपैकी केके एक आहेत. त्यांच्या निधनानंतर संगीत क्षेत्रासह विविध क्षेत्रातून हळहळ व्यक्त होताना दिसत आहे.
केके बॉलीवूडमधील प्रसिद्ध गायक होते. त्यांनी अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. केके यांची गाणी आजही लोकप्रिय आहेत. 'खुदा जाने' सारखे रोमँटिक गाणे, 'इट्स द टाइम टू डिस्को' आणि 'कोई कहे कहता रहे' सारखे डान्स नंबर्स तसेच 'तडप तडप के इस दिल से' सारखे सॅड सॉन्गस आजही लोकांच्या मनावर राज्य करत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांनी केके यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधानांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय की, "केके यांच्या अकाली निधनाने धक्का बसला आहे. त्यांच्या गाण्यांमधून अपार भावना प्रदर्शित व्हायच्या. सर्व वयोगटातील लोकांमध्ये त्यांची गाणी लोकप्रिय आहेत. त्यांच्या गाण्याच्या माध्यमातून ते नेहमी आपल्यामध्येच असतील, त्यांच्या आठवणी आपल्यासोबत राहतील. केके यांच्या कुटुंबाप्रति आणि त्यांच्या चाहत्यांच्या दु:खात मी सामील आहे."