एक्स्प्लोर
जळगावातील चिमुरडीवर उपचारांसाठी सलमान खानची मदत

जळगाव : जळगावात रक्तवाहिनीच्या विकाराने त्रस्त असलेल्या चिमुरडीसाठी बॉलिवूडच्या सुपरस्टारने मदतीचा हात दिला आहे. सहा महिन्यांच्या ओवी सुर्यवंशीवरील उपचारासाठी लागणाऱ्या साडेसहा लाखांचा खर्च उचलण्याची तयारी सलमान खानने दाखवली.
ओवी सुर्यवंशी ही सहा महिन्यांची बालिका गेल्या काही महिन्यांपासून मृत्यूशी झुंज देत होती. तिच्यावरील उपचारांसाठी साडेसहा लाख रुपये खर्च लागणार होता. मात्र शेतकरी असलेल्या सुर्यवंशी कुटुंबाकडे इतकी मोठी रक्कम नसल्यानं त्यांनी तिच्या उपचारासाठी शेत गहाण ठेवलं.
मुंबईत ओवीवर उपचार करण्याचे प्रयत्न सुरु असताना चक्क अभिनेता सलमान खान मदतीला धावून आला. सलमानने तिच्या संपूर्ण उपचाराचा खर्च केल्याने ओवीला जीवदान तर मिळालंच, शिवाय त्यांची शेतीसुद्धा शाबूत राहिली आहे.
जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर तालुक्यातील मुडी गावच्या प्रमोद सूर्यवंशी कुटुंबासाठी सलमान खान देवदूत ठरला आहे.
प्रमोद सूर्यवंशी या शेतकऱ्याला सहा महिन्यांपूर्वी कन्यारत्न झालं. मुलीच्या जन्माचा आनंदोत्सव सुरु असताना अवघ्या चारच दिवसात बाळाला रक्तवाहिन्यांचा गंभीर आजार असल्याचं निदान डॉक्टरांनी केलं. यावर उपचार करायचे असतील, तर ते फक्त मुंबईतच होऊ शकतील आणि त्यासाठी जवळपास सात लाख रुपये खर्च येईल, असं डॉक्टरांनी सांगताच सुर्यवंशी कुटुंबाच्या पायाखालची जमीनच सरकली.
शेती करताना दोन वेळची उपजीविका कशी भागवायची, असा प्रश्न असताना सात लाख रुपये आणायचे कसे, असा प्रश्न सुर्यवंशींना पडला. ओवीच्या उपचारासाठी त्यांनी थेट शेत विक्रीला काढलं, पण ग्राहक मिळेना.
एकीकडे ओवीची मृत्यूशी झुंज सुरु होती, तर दुसरीकडे तिच्या पालकांची पैशांची जुळवाजुळव करण्यासाठी धडपड सुरु होती. अशातच ओवीचे काका कमलेश यांना एका मित्राने सलमान खानची 'बिईंग ह्यूमन' संस्था अडचणीत असलेल्या लोकांना मदत करते असं सांगितलं.
सुर्यवंशींनी मुंबई गाठली आणि दैवी चमत्कार घडावा तसा अनुभव परिवाराला आला. ओवीला तातडीने मुलुंडच्या फोर्टीज इस्पितळात उपचार करण्यास सांगण्यात आलं. संस्था संपूर्ण खर्च करेल आपल्याला काळजी करण्याचं कारण नाही, असं आश्वासन मिळाल्यावर सुर्यवंशी परिवाराचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.
28 मार्च रोजी ओवीवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर ओवी हसत-खेळत आपल्या मूळगावी परतली आहे. केवळ पैसे देऊनच सलमान थांबला नाही, तर शस्त्रक्रियेनंतर त्याने ओवीची प्रत्यक्ष भेट घेऊन तिच्या तब्येतीची विचारपूस केली. सलमान खानचे आभार व्यक्त करण्यासाठी आपल्याकडे शब्द नसल्याच्या भावना सुर्यवंशी कुटुंबाने व्यक्त केल्या आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
गोंदिया
कोल्हापूर
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
