Himesh Reshammiya Father Death : हिमेश रेशमियावर कोसळला दु:खाचा डोंगर, वडील संगीतकार-निर्माते विपिन रेशमियांचे निधन
Himesh Reshammiya Father Death : पार्श्वगायक आणि संगीतकार हिमेश रेशमिया याचे वडील संगीत दिग्दर्शक विपिन रेशमिया यांचे निधन झाले आहे.
Himesh Reshammiya Father Death : पार्श्वगायक आणि संगीतकार हिमेश रेशमिया (Himesh Reshammiya) याचे वडील संगीत दिग्दर्शक विपिन रेशमिया (Vipin Reshammiya) यांचे निधन झाले आहे. ते 87 वर्षांचे होते. विपिन रेशमिया हे संगीत दिग्दर्शक आणि निर्माते होते. विपिन रेशमिया यांनी 18 सप्टेंबर (बुधवार) रात्री 8.30 वाजता अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात उपचार सुरू होते. श्वासोच्छवासाचा त्रास आणि वयोमानानुसार आरोग्याच्या समस्या सुरू असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
श्वास घेण्याचा होता त्रास...
'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिलेल्या वृत्तानुसार, हिमेश रेशमिया यांची फॅमिली फ्रेंड फॅशन डिझायनर वनिता थापर यांनी विपिन रेशमिया यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. वनिता यांनी 'ETimes' ला सांगितले की, ''दिवंगत संगीत दिग्दर्शक, विपिन रेशमिया यांच्यासोबत माझे वडिल-मुलीचे नाते होते. ते टीव्ही मालिकेची निर्मिती करत असताना मी त्यांना पापा म्हणून हाक मारायची. त्यानंतर ते संगीत दिग्दर्शक झाले आणि हिमेशनेही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवले.
हिमेशचे वडील विपिन यांच्या पार्थिवावर 19 सप्टेंबर रोजी मुंबईतील जुहू येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. हिमेशने आपल्या वडिलांना आपले गुरू मानले होते. माझे वडील हे माझ्यासाठी देवच असल्याचे हिमेशने एकदा म्हटले होते. आता, वडिलांचे छत्र हरपल्याने हिमेशवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
View this post on Instagram
कोण होते विपिन रेशमिया?
विपिन रेशमिया यांनी द एक्सपोज (2014) आणि तेरा सुरूर (2016) ची निर्मिती केली होती. विपिन यांनी इन्साफ का सूरज (1990) नावाच्या रिलीज न झालेल्या चित्रपटासाठी संगीत दिले. विपिन रेशमिया आणि सलमान खान एका चित्रपटात एकत्र काम करणार होते. त्याच वेळी हिमेश आणि सलमानची ओळख झाली. हिमेशने 1998 मध्ये रिलीज झालेल्या सलमान आणि काजोलची भूमिका असलेल्या 'जब प्यार किया तो डरना क्या' या चित्रपटाला संगीत दिले होते. त्यानंतर हिमेशने सलमानच्या अनेक चित्रपटांना संगीत दिले. हिमेशची अनेक गाणी चांगलीच लोकप्रिय ठरली.