Happy Birthday Johny Lever : कधीकाळी घरोघरी विकायचे पेन, आता जगभरातील चाहत्यांचे मनोरंजन करतायत जॉनी लीव्हर!
Johnny Lever Birthday : प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेते जॉनी लीव्हर (Johny Lever) आज (14 ऑगस्ट) आपला वाढदिवस साजरा करत आहेत.
Johnny Lever Birthday : प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेते जॉनी लीव्हर (Johny Lever) आज (14 ऑगस्ट) आपला वाढदिवस साजरा करत आहेत. जॉनी यांनी बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. जॉनी लीव्हर यांचा जन्म 14 ऑगस्ट 1967 रोजी आंध्र प्रदेशातील कानिगिरी येथे झाला. त्यांनी 90च्या दशकांत अनेक चित्रपटांमध्ये आपल्या कॉमेडीने लोकांना खूप हसवले. शाहरुख खान, आमिर खान आणि अनिल कपूर यांसारख्या बड्या स्टार्ससोबत त्यांनी स्क्रीन शेअर केली. जॉनी लीव्हर यांनी आपल्या दमदार कॉमिक टायमिंगने लोकांना नेहमी हसवत ठेवले.
जॉनी लीव्हर यांचे खरे नाव जॉन प्रकाशराव जानुमाला आहे. त्यांचे वडील प्रकाश राव जानुमाला हे हिंदुस्थान लीव्हरमध्ये ऑपरेटर म्हणून काम करायचे. जॉनी तीन बहिणी आणि दोन भावांमध्ये सर्वात मोठे होते. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खराब असल्यामुळे ते शाळेची फी देखील भरू शकत नव्हते. त्यामुळे त्यांना शाळेतून काढून टाकण्यात आले होते. यानंतर काही दिवसांनी जॉनी लीव्हर कामानिमित्ताने हैदराबादला गेले. मुंबईला परतल्यावर ते किंग सर्कल धारावीमध्ये आपल्या कुटुंबासह राहू लागले, तिथे त्यांना छोटीशी नोकरीही मिळाली.
... आणि जॉनी लीव्हर म्हणून ओळख मिळाली!
सुरुवातीच्या काळात जॉनी कलाकारांची नक्कल करून रस्त्यावर फिरून पेन विकायचे. त्यानंतर त्यांना हिंदुस्थान लीव्हर कंपनीमध्ये नोकरी मिळाली. हिंदुस्थान लीव्हरच्या एका कार्यक्रमात त्यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची नक्कल करून त्यांनी सगळ्यांना खूप हसवलं. त्या कार्यक्रमात जॉनी यांनी आपल्या स्टँड-अप कॉमेडीने हशा पिकवला. या कार्यक्रमानंतर कंपनीच्या सहकाऱ्यांनी त्याचे नाव जॉनी लीव्हर ठेवले. यानंतर जॉनी लीव्हर अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ लागले. 1981मध्ये जॉनी लीव्हर यांनी हिंदुस्थान लीव्हरमधील नोकरी सोडली आणि पूर्णपणे आपल्या आवडीवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली.
बॉलिवूडमध्ये एन्ट्री
यादरम्यान अभिनेता आणि चित्रपट निर्माता-दिग्दर्शक सुनील दत्त यांची नजर जॉनी लीव्हरवर पडली. सुनील दत्त यांनी जॉनी लीव्हरला त्यांच्या आगामी 'दर्द का रिश्ता' या चित्रपटात काम करण्याची ऑफर दिली होती. 1982मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटातून जॉनी लीव्हर यांनी बॉलिवूडमध्ये धमाकेदार एन्ट्री केली. पण, 1993मध्ये प्रदर्शित झालेल्या अब्बास मस्तान दिग्दर्शित ‘बाजीगर’ या चित्रपटातून त्यांना बॉलिवूडमध्ये खरी ओळख मिळाली. या चित्रपटात जॉनी लीव्हर यांनी साकारलेल्या ‘बाबूलाल’च्या भूमिकेने त्यांना प्रेक्षकांच्या मनात जागा मिळवून दिली.
यानंतर जॉनी लीव्हर यांनी ‘राजा हिंदुस्तानी’, ‘जीत’, ‘जुदाई’, ‘कोयला’, ‘इश्क’, ‘एंटरटेनमेंट’, ‘गोल माल’ आणि ‘गोल माल रिटर्न्स’, ‘धमाल’, ‘टोटल धमाल’, ‘हाऊसफुल’ आणि ‘नवरा माझा नवसाचा’ अशा अनेक धमाकेदार चित्रपटांमध्ये काम केले.
हेही वाचा :
TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या