एक्स्प्लोर
'इफ्फी'त ‘120 बिट्स पर मिनिट’ला गोल्डन पिकॉक पुरस्कार
1990 च्या दशकात फ्रान्समधील समलैंगिकता आणि एड्स या विषयावर हा चित्रपट भाष्य करतो.
पणजी : मोरोक्कोत जन्मलेले फ्रेंच दिग्दर्शक रॉबिन कॅम्पिलो यांच्या ‘120 बिट्स पर मिनिट’ या चित्रपटाने 48 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ‘गोल्डन पिकॉक’ म्हणजेच सुवर्ण मयुर पुरस्कार पटकावला. इफ्फीच्या समारोपाच्या दिवशी या पुरस्काराची घोषणा करण्यात आली.
1990 च्या दशकात फ्रान्समधील समलैंगिकता आणि एड्स या विषयावर हा चित्रपट भाष्य करतो. नहुएल पेरेझ बिस्कायार्ट यांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात अर्नाल्ड व्हॅलोयस आणि अॅडेल हेनेल यांच्याही भूमिका आहेत. यंदाच्या ‘कान्स’ चित्रपट महोत्सवात हा चित्रपट पहिल्यांदा दाखवला गेला होता, तर भारतात इफ्फीमध्ये त्याचा प्रिमियर शो झाला.
40 लाख रुपये, सुवर्ण मयुराची प्रतिमा आणि सन्मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.
ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना यंदाच्या इफ्फीमध्ये चित्रपटसृष्टीतील ‘पर्सन ऑफ द इयर’ या पुरस्काराने गौरवण्यात आले.
याच महोत्सवात चीनचे दिग्दर्शक व्हीव्हीयन क्यू यांच्या ‘अँजल्स वेअर व्हाईट’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. चीनमधल्या एका छोट्या गावात राहणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचारांची कहाणी सांगणारा हा चित्रपट आहे. महिलांवर होणाऱ्या अत्याचारांना वाचा फोडणाऱ्या या सामाजिक चित्रपटातून ही समस्या प्रभावीपणे मांडली आहे. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार म्हणून रजत मयुर आणि 15 लाख रुपये दिले जातील.
नहुएल पेरेझ बिस्कायार्ट यांना ‘वन ट्वेंटी बिट्स पर मिनिट’ या चित्रपटातल्या भूमिकेबद्दल सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. एड्सविरोधात लढणाऱ्या कार्यकर्त्याची भूमिका त्यांनी बजावली आहे. एक प्रेमळ साथीदार आणि आपल्या विचारांवर ठाम असलेला कार्यकर्ता त्यांनी ठळकपणे रंगवला आहे.
महेश नारायणन यांच्या ‘टेक ऑफ’ या मल्ल्याळम चित्रपटातल्या भूमिकेसाठी पार्वती टी.के यांनी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावला आहे. या चित्रपटात युद्धभूमीत बंडखोरांकडून ओलीस ठेवलेल्या पतीच्या सुटकेसाठी संघर्ष करणाऱ्या परिचारिकेची भूमिका त्यांनी साकारली आहे. केरळच्या कोझीकोडे इथल्या या अभिनेत्रीने दाक्षिणात्य चित्रपटांमधे अनेक भूमिकांसाठी पुरस्कार जिंकले आहेत.
सर्वोत्कृष्ट अभिनयाच्या पुरस्कारासाठी रजत मयुर आणि 10 लाख रुपये दिले जातात. महेश नारायणन् यांना त्यांच्या पहिल्याच चित्रपटासाठी उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून विशेष ज्यूरी पुरस्कारही देण्यात आला. तिक्रीट इथे अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेचं नाट्य त्यांनी ‘टेक ऑफ’ चित्रपटातून मांडले आहे. विशेष ज्यूरी पुरस्कार म्हणून 15 लाख रुपये, रजत मयुर आणि सन्मानपत्र प्रदान केले जाते.
सर्वोत्कृष्ट फिचर फिल्मचा (कथापट) पुरस्कार बोलिवियाचे दिग्दर्शक किरो रुसो यांच्या ‘डार्क स्कल’ या चित्रपटाने मिळवला. रजत मयुर सन्मान मिळवणारा हा रुसो यांचा पहिलाच चित्रपट आहे.
मनोज कदम यांच्या ‘क्षितिज’ या मराठी चित्रपटाने आयसीएफटी – युनेस्को गांधी पदकाचा पुरस्कार मिळवला. महात्मा गांधींचे शांतता आणि मानवी अधिकार, दोन संस्कृतींमधला संवाद, सांस्कृतिक अभिव्यक्तींमध्ये विविधता जपणे आणि वृद्धिंगत करणे, या युनेस्को तत्वांच्या आशयाचा अविष्कार करणाऱ्या चित्रपटांना हा पुरस्कार दिला जातो.
या महोत्सवात कॅनडाचे कला दिग्दर्शक ॲटम इगोयान यांना जीवन गौरव पुरस्काराने गौरवण्यात आले. 10 लाख रुपये, सन्मानपत्र, शाल आणि श्रीफळ असे या प्रतिष्ठेच्या पुरस्काराचे स्वरुप आहे. चित्रपट क्षेत्रात अतुलनीय काम करणाऱ्या नामवंतांना या पुरस्काराने सन्मानित केले जाते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्रिकेट
रायगड
Advertisement