Bollywood Celebs Corona Positive : बॉलिवूड पुन्हा कोरोनाच्या विळख्यात! शाहरुख ते कार्तिक आर्यनसह ‘या’ कलाकारांना झाली लागण
Bollywood Celebs Corona Positive : दिग्दर्शक-निर्माता करण जोहर (Karan Johar) याच्या वाढदिवसाच्या पार्टीनंतर अनेक बॉलिवूड कलाकार कोरोना पॉझिटिव्ह झाल्याचे समोर आले आहे.
Bollywood Celebs Corona Positive : बॉलिवूड विश्व पुन्हा एकदा कोरोनाच्या (Corona) विळख्यात अडकले आहे. दिग्दर्शक-निर्माता करण जोहर (Karan Johar) याच्या वाढदिवसाच्या पार्टीनंतर अनेक बॉलिवूड कलाकार कोरोना पॉझिटिव्ह झाल्याचे समोर आले आहे. आता अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) यालाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ट्विट करत त्याला लवकर बरे वाटावे म्हणून शुभेच्छा दिल्या, तेव्हा ही गोष्ट समोर आली.
मात्र, अद्याप मुंबई महानगर पालिका किंवा शाहरुख खान यांनी स्वतः या विषयी कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. शाहरुखचा मुलगा अबराम याला देखील कोरोनाची लागण झाली असल्याचे बोलले जात आहे. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात यशराज स्टुडिओच्या 'पठाण' चित्रपटाच्या मुंबईत सुरू असलेल्या शूटिंगदरम्यान सेटवर अनेक जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. अशा परिस्थितीत चित्रपटाचे शूटिंग थांबवावे लागले होते.
कतरिना कैफलाही कोरोनाची लागण
शाहरुख खान व्यतिरिक्त अभिनेत्री कतरिना कैफ हिला देखील कोरोनाची लागण झाली होती. कतरिना कैफ कोरोनाच्या विळख्यात अडकण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2021मध्येही कतरिना कैफ कोरोना पॉझिटिव्ह झाली होती. आयफा सोहळ्यात पुरस्कार स्वीकारण्यासाठी पोहोचलेल्या विकी कौशलसोबत कतरिना देखील अबुधाबीला जाणार होती. पण, कोरोनामुळे ती विकीसोबत अबुधाबीला जाऊ शकली नसल्याचे म्हटले जात आहे. आता कतरिनाचा 7 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी संपला असून, ती पुन्हा कोरोना निगेटिव्ह झाली आहे.
कार्तिक आर्यनही अडकला कोरोनाच्या विळख्यात
शाहरुख खान आणि कतरिना कैफ व्यतिरिक्त, बॉलिवूड स्टार कार्तिक आर्यन याला देखील कोरोनाची लागण झाली आहे. शुक्रवारी स्वतः कार्तिक आर्यनने ट्विट करून तोही कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली. त्याने ट्विट करत लिहिले, ‘सर्व काही इतके पॉझिटिव्ह होत होते की, कोरोनालाही राहावले नाही...’ कार्तिक आर्यनने आयफामध्ये डान्स परफॉर्मन्स देण्यासाठी पूर्ण तयारी केली होती, पण कोरोनामुळे त्याला आयफामधील परफॉर्मन्स रद्द करावा लागला.
आदित्य रॉय कपूरही कोरोना पॉझिटिव्ह
बॉलिवूड अभिनेता आदित्य रॉय कपूरलाही सध्या कोरोनाची लागण झाली आहे. लवकरच त्याचा अॅक्शनपॅक्ड चित्रपट 'ओम' प्रदर्शित होणार आहे, ज्याचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पण आता कोरोनामुळे त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशन प्लॅनमध्येही बदल झाला आहे.
अक्षय कुमारलाही झाली लागण
बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने स्वतः गेल्या महिन्यात कान्स फिल्म फेस्टिव्हल सुरू होण्यापूर्वी ट्विट करून माहिती दिली होती की, तो कोरोना पॉझिटिव्ह झाला आहे आणि अशा परिस्थितीत तो कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होऊ शकणार नाही. गेल्या वर्षीही अक्षय कुमारला कोरोनाची लागण झाली होती आणि त्यानंतर त्याला मुंबईतील पवई परिसरात असलेल्या हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.