Ram Setu Vs Thank God : ऐन दिवाळीत बॉक्स ऑफिसवर होणार मोठी टक्कर! अक्षयचा ‘राम सेतू’ आणि अजयचा ‘थँक गॉड’ आमने सामने!
Ram Setu Vs Thank God : 25 ऑक्टोबरला अक्षय कुमारचा (Akshay Kumar) राम सेतू (Ram Setu) आणि अजय देवगणचा (Ajay Devgn) थँक गॉड (Thank God) रिलीज होणार आहे.
Ram Setu Vs Thank God : यंदा दिवाळीच्या मुहूर्तावर सिनेप्रेमींसाठी भरपूर मोठी मनोरंजनाची मेजवानी असणार आहे. एकीकडे, काही चित्रपट आणि सीरिज ओटीटीवर प्रदर्शित होणार असताना, दुसरीकडे निर्मात्यांनी प्रेक्षकांना थिएटरपर्यंत खेचून आणण्याची योजना देखील केली आहे. 25 ऑक्टोबरला अक्षय कुमारचा (Akshay Kumar) राम सेतू (Ram Setu) आणि अजय देवगणचा (Ajay Devgn) थँक गॉड (Thank God) रिलीज होणार आहे. या दोन्ही चित्रपटांच्या बॉक्स ऑफिस क्लॅशची चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे.
अशा परिस्थितीत ऐन दिवाळीत बॉक्स ऑफिसवर मोठी टक्कर पाहायला मिळणार आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणारे हे चित्रपट मोठ्या प्रमाणावर गल्ला जमवतील आणि जास्तीत जास्त प्रेक्षकांना थिएटरपर्यंत खेचून आणतील, अशी आशा उद्योग तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
थँक गॉड
बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांचा कॉमेडी कथेवर आधारित चित्रपट 'थँक गॉड' दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज होत आहे. या चित्रपटात अजय देवगण ‘चित्रगुप्ता’च्या भूमिकेत दिसणार असून, जो सिद्धार्थ मल्होत्राच्या कर्तृत्वाचा हिशेब मांडताना दिसणार आहे. त्याचबरोबर रकुल प्रीत सिंहही या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 25 ऑक्टोबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.
राम सेतू
या दिवाळीत बॉक्स ऑफिसवर अक्षय कुमार आणि अजय देवगण यांच्यात थेट स्पर्धा होणार आहे. अक्षय कुमारचा 'राम सेतू' हा पौराणिक चित्रपटही 25 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. काही काळापूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला होता, ज्यावर लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत. या चित्रपटात अक्षय कुमार व्यतिरिक्त नुसरत भरुचा आणि जॅकलिन फर्नांडिस देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
प्रेक्षकांना चित्रपटांकडून मोठ्या अपेक्षा
दिवाळी, होळी, ईद आणि ख्रिसमस या सणांच्या निमित्ताने चित्रपट प्रदर्शित करण्याची घोषणा आधीच केली जाते. सलमान खानने ईदला आणि आमिर खानने ख्रिसमसला चित्रपट प्रदर्शित करण्याची परंपरा बनली होती. यावेळी अक्षय कुमारचा 'राम सेतू' आणि अजय देवगणचा 'थँक गॉड' हे चित्रपट दिवाळीला प्रदर्शित होणार आहेत. गेल्या दोन वर्षांत कोरोनाने देशातील सर्व लहान-मोठ्या उद्योगांप्रमाणेच बॉलिवूडचेही मोठे आर्थिक नुकसान केले आहे. या क्षेत्राशी संबंधित अनेक लोकांवर उपासमारीची वेळ आली होती. थिएटर मालक, चित्रपट वितरक, प्रदर्शक आणि लहान-मोठे कर्मचारी यांना देखील कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला. पण, गेल्या दिवाळीनंतर हळूहळू चित्रपटसृष्टीची स्थिती सुधारू लागली. सध्या सगळेच सण निर्बंधमुक्त साजरे केले जात आहेत. त्यामुळे आता प्रेक्षक देखील पुन्हा सक्रिय झाला आहे. अशावेळी सगळ्यांनाच या दोन्ही चित्रपटांकडून मोठी आशा आहे.
हेही वाचा :