(Source: ECI/ABP News/ABP Majha)
गरजू रंगकर्मींसाठी धावला कुंचला! अभिनेते वैभव मांगले यांचे स्तुत्य पाऊल
लॉकडाऊनमुळे मागील पाच महिन्यांपासून नाट्यगृह बंद आहेत. परिणामी काम बंद झाल्याने कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. या कलाकारांसाठी आता अभिनेते वैभव मांगले यांनी पुढाकार घेतला आहे.
लॉकडाऊनमुळे सगळ्यात मोठी आर्थिक अडचण उद्भवली आहे ती नाट्यवर्तुळाभवती. मालिका, सिनेमे यांची चित्रकरणं एव्हाना सुरू झाली आहेत. पण नाटक कधी सुरु होणार याची काही कल्पना नाट्यकर्मींना नाहीय. गेले पाच महिने कलाकारापासून रंगमंच कामगारांपर्यंत प्रत्येकजण नाट्यगृह सुरू होण्याच्या आशेवर आहे. यामुळे अनेकांच्या कुटुंबाला आर्थिक फटका बसला आहे. अशावेळी अभिनेते वैभव मांगले यांचा कुंचला मदतीला धावून आला आहे.
अभिनेते वैभव मांगले हे उत्तम कलाकार आहेत, हे आपण सगळेच जाणतो. अलबत्या गलबत्या, फक्त लढ म्हणा, काकस्पर्श, बालक पालक, टाईमपास अशा अनेक सिनेमा नाटकातून त्यांनी आपलं मनोरंजन केलं आहे. अष्टपैलू अभिनेते असलेले वैभव यांनी आपल्या गाण्याचा छंदही जोपासला. गानसरस्वती किशोरी आमोणकर यांना गुरुस्थानी मानून वैभव यांनी आपली कला जोपासली. पण या लॉकडाऊनच्या काळात मात्र वैभव यांना नवा छंद जडला तो चित्र काढण्याचा. लॉकडाऊनच्या सुरूवातीला वैभव कोकणात आपल्या गावी होते. तिथे त्यांनी चित्रं काढायला सुरुवात केली. लाकूड, कागद, भिंत असं कुठेही ते चित्र काढू लागले. आणि बघता बघता त्यांना चित्रकलेचा छंद जडला.
Mirzapur 2 | प्रतिक्षा संपली, 'मिर्झापूर 2' या दिवशी होणार रिलीज!
छंदातून 100 चित्रांची निर्मिती
आता त्यांच्याकडे जवळपास 100 चित्रं आहे. याच चित्रांचा समाजासाठी वापर करायचं त्यांनी ठरवलं आहे. वैभव एबीपी माझाशी बोलताना म्हणाले, 'छंद म्हणून मी चित्रं काढू लागलो. आणि बघता बघता मला चित्र काढायला आवडू लागलं. रंग.. त्यांच्या छटा आवडू लागल्या. गेल्या पाचेक महिन्यात मी 100 चित्र काढली असतील. हीच चित्रं आता विकून त्यातून आलेली रक्कम ही रंगकर्मींसाठी द्यावी अशी कल्पना मला सुचली. म्हणूनच माझ्या फेसबुकवर मी तशी पोस्टही केली. आता याला कसा प्रतिसाद मिळतो ते पाहू.'
वैभव यांच्या या चित्रात व्यक्तिचित्रं, निसर्ग चित्र, एबस्ट्रॅक्ट, स्थिर चित्र आदी अनेक चित्रांचा समावेश आहे. या चित्रांची किंमत साधारण 5 ते 10 हजार या दरम्यान असणार आहे. ज्यांना चित्रं हवी आहेत ते वैभव यांना फेसबुकवर मेसज करू शकतात किंवा इमेलही करू शकतात. त्यांचा इमेल आहे, vaibhavmangale@gmail.com
SSR Suicide Case | रिया आणि तिच्या वडिलांना अद्याप सीबीआयचं समन्स नाही; रियाच्या वकीलांचं स्पष्टीकरण