Mirzapur 2 | प्रतिक्षा संपली, 'मिर्झापूर 2' या दिवशी होणार रिलीज!
मिर्झापूरचा दुसरा सीझन पाहण्यासाठी प्रत्येक जण उत्सुक आहे. पहिल्या सीझनमध्ये उपस्थित झालेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं मिर्झापूरच्या दुसऱ्या सीझनमध्ये मिळणार आहेत.
मुंबई : मिर्झापूर सीझन 2 केव्हा येणार? हा प्रश्न गेले अनेक दिवस चाहत्यांच्या मनात घर करून आहे. परंतु, आता सर्वांची प्रतिक्षा संपली असून लवकरच मिर्झापूर 2 आता चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. 23 ऑक्टोबर रोजी अॅमेझॉन प्राइमवर मिर्झापूर या वेब सीरिजचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मिर्झापूर उत्तर प्रेदशातील मिर्झापूरवर आधारित आहे. वेब सीरिजमधील प्रत्येक एपिसोड रोमांचक होता. मिर्झापूरच्या पहिल्या सीझनमध्ये अली फजल, पंकज त्रिपाठी, देव्यंदू शर्मा आणि विक्रांत मेसी या स्टार कास्टच्या अभिनयासोबत डायलॉग्सनी लोकांना अक्षरशः वेड लावलं होतं.
उत्तर भारतातील मिर्झापूर या भागात होणारे गुन्हे आणि गुन्हेजगतातील भयानक सत्य या सीरिजच्या पहिल्या भागात दाखविण्यात आले होते. उत्तम पटकथा, संवाद आणि विषयाच्या उत्तम मांडणीमुळे प्रेक्षकांनी पहिल्या सिरीजला उत्तम प्रतिसाद दिला आणि त्याच विषयाला पुढे नेणारे 'मिर्झापूर'चे दुसरे पर्व अधिक रोमांचक आणि उत्तम बनले आहे. यात पंकज त्रिपाठी, अली फझल, दिव्येंदु, श्वेता त्रिपाठी शर्मा, रसिका दुगल, हर्षिता शेखर गौर, अमित सियाल, अंजुम शर्मा , शिबा चड्डा, मनू ऋषी चड्डा आणि राजेश तेलंग यांसारख्या कलाकारांसोबतचा हा ऍक्शन पॅक प्रेक्षकांना आता ड्रग्स, ऍक्शन आणि जगण्यासाठीचा थरारक लढा याचा अनुभव देणार आहे. 'मिर्झापुर'च्या दुसऱ्या सिरीजमध्ये विजय वर्मा, प्रियांशु पेंयुली आणि ईशा तलवार दिसणार आहेत.
"एक्सेल एंटरटेनमेंटला उदंड प्रतिसाद आणि प्रेम मिळाले आहे. जेव्हाही आम्ही आपल्या सीमा आणि कक्षा रुंदावून एक उत्तम निर्मिती दिली आहे तेव्हा तेव्हा आम्हाला उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे." या प्रसंगी रितेश साधवानी, एक्सेल एंटरटेनमेंटचे निर्माते या सीरिजबद्दल बोलताना म्हणाले. "मिर्झापूर हा आमच्या कामाचा पुढचा टप्पा होता. भारतीय प्रेक्षकांना आम्ही अशा काही कथा दिल्यात ज्या खूप वेगळ्या आणि नवीन होत्या. भारतातील लहान सहान गावांमधून कधीही समोर न येणाऱ्या कथांना लोकांपर्यंत त्याचा अस्सलपणा टिकवून पोहचवणे हे आमच्यासाठी आव्हान होते मात्र आम्ही ते यशस्वीरीत्या पार पाडले. या सीरिजला भारतातच नव्हे जगभरात उत्तम प्रतिसाद मिळाल्यामुळेच आम्हाला आणखी उत्तम काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे."
निर्माते पुनीत कृष्णा म्हणाले कि, "आम्हाला मिळालेल्या उत्तम प्रतिसादाने आम्हाला खूप आनंद होत आहे. लोकांनी आपली पसंती दर्शवून दुसऱ्या सिरीसबद्दलची उत्कंठा खरंच बघण्यासारखी आहे आणि म्हणूनच आम्हाला आता दुसऱ्या सिझनला सुद्धा त्याच पातळीवर नेऊन ठेवायचे आहे. आम्हाला प्रेक्षकांची उत्कंठा बघून खूप चांगले वाटत आहे."
या सीरीजचे निर्माते एक्सेल एंटरटेनमेंट असून पुनीत कृष्णा यांनी ही सीरिज बनवली असून गुरमीत सिंग आणि मिहीर देसाई यांनी या सीरिजचे दिग्दर्शन केले आहे. प्रेक्षकांची ही आवडती अमेझॉन ओरिजिनल सीरिज अमेझॉन प्राईम व्हिडीओवर 200 पेक्षा जास्त देशात आणि प्रदेशात प्रदर्शित होणार आहे.
मिर्झापूरचा दुसरा सीझन पाहण्यासाठी प्रत्येक जण उत्सुक आहे. पहिल्या सीझनमध्ये उपस्थित झालेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं मिर्झापूरच्या दुसऱ्या सीझनमध्ये मिळणार आहेत. मिर्झापूर सीरीज 2 वेब सीरीजमध्ये गुड्डू पंडितचा पुन्हा नवा अंदाज पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. मिर्झापूर 2 चा नवा सीझन 25 नोव्हेंबर रोजी येणार असल्याचं सांगण्यात येत होतं. परंतु, आता हा सीझन 23 ऑक्टोबर रोजी अॅमेझॉन प्राइमवर रिलीज करण्यात येणार आहे. या सीरिजचा पहिला सीझन 16 नोव्हेंबर 2018 रोजी रिलीज करण्यात आला आहे.
मिर्झापूर 2 ची शुटिंग खूप आधीच पूर्ण झाली होती. परंतु, लॉकडाऊनमध्ये पोस्ट प्रोडक्शनचं काम थांबलं होतं. यामध्येच बॉलिवूड अभिनेता अली फजल याच्या आईचं निधन झालं होतं. त्यामुळे तो आपल्या डबिंगचं काम करू शकला नाही. आता सीरीजमधील सर्व कलाकारांनी डबिंगचं काम सुरु केलं आहे.
रसिका दुग्गल नव्या अंदाजात
मिर्झापूरमध्ये बीना त्रिपाठी हे पात्र साकारणाऱ्या रसिका दुग्गलने आपल्या अभिनयाच्या जोरावर फिल्मी जगतात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. मिर्झापूरच्या दुसऱ्या सीझनबाबत बोलताना रसिका म्हणाली की, 'ज्यांनी मिर्झापूरचा पहिला सीझन पाहिला आहे, त्यांना सीझन 2 नक्कीच आवडेल. यामध्ये नवे कॅरेक्टर्स लिहिले गेले आहेत. अनेक चांगले अॅक्टर्स हे कॅरेक्टर्स साकारणार आहेत. बीना त्रिपाठीचा एक वेगळा अँगल सीझन 2 मध्ये पाहता येणार आहे. सीझन 1 मध्ये त्या कॅरेक्टरसोबत अनेक गोष्टी घडल्या आहेत. त्यामुळे त्या गोष्टींच्या प्रभावही या कॅरेक्टरवर पडला आहे.' त्यामुळे बीना त्रिपाठी कोणत्या अंदाजात दिसणार हे पाहण्याची चाहत्यांना उत्सुकता आहे.