युती होणार, मात्र शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता कमी : सूत्र
आदित्य ठाकरे यावेळी विधानसभेची निवडणूक लढवणार आहेत. ठाकरे घराण्यातली व्यक्ती पहिल्यांदाच विधानसभेच्या रिंगणात उतरत आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री असणार का? याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या पण तशी शक्यता नसल्याचं दिसत आहे.
नवी दिल्ली : शिवसेना आणि भाजप युतीची घोषणा मुंबईत उद्या म्हणजे 1 ऑक्टोबरला होऊ शकते. दिल्लीत भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत महाराष्ट्रातल्या तिकीट वाटपासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या उपस्थितीत खलबतं झाली, त्यानंतर युतीचे संकेत मिळत आहेत. मात्र सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद देण्याच्या बाबत कुठलीही चर्चा झाली नसून तशी काही शक्यता नसल्याचं खात्रीलायक सूत्रांनी सांगितले.
आदित्य ठाकरे यावेळी विधानसभेची निवडणूक लढवणार आहेत. ठाकरे घराण्यातली व्यक्ती पहिल्यांदाच विधानसभेच्या रिंगणात उतरत आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री असणार का? याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या पण तशी शक्यता नसल्याचं दिसत आहे. आदित्य ठाकरे यांच्या संभाव्य उपमुख्यमंत्रीपदाबाबत आत्ताच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील निवडणुकीच्या रिंगणात
मागच्या दारातून येणाऱ्या आपल्या अनेक दिग्गजांना थेट मैदानात उतरवण्याचा भाजपाचा राष्ट्रीय फॉर्मुला राज्यस्तरावरही पाहायला मिळणार आहे. त्यानुसार आतापर्यंत कधीही विधानसभेचे निवडणूक न लढलेले चंद्रकांत दादा पाटील हे यावेळी विधानसभेच्या रिंगणात उतरणार आहेत. चंद्रकांतदादा हे आत्तापर्यंत विधानपरिषदेवर पदवीधर मतदारसंघातून आमदार राहिले आहेत. भाजपची राज्यात शक्ती वाढलेली असताना आता ते विधानसभेच्या मैदानात आपलं नशीब आजमावतील. आता चंद्रकांत पाटील कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढणार याबद्दलची निश्चित माहिती मिळू शकलेली नाही. मात्र ते कोथरुडमधून लढणार अशा पद्धतीच्या काही चर्चा सुरू झाल्या आहेत. कोथरूड हा भाजपसाठी सुरक्षित मतदारसंघ मानला जातो.
चंद्रकांत पाटील हे कोल्हापूरचे असले तरी कोल्हापूर पट्ट्यात त्यांच्यासाठी सुरक्षित मतदारसंघ शोधणं भाजपला थोडंसं कठीण जातंय. शिवाय राजू शेट्टी यांनी चंद्रकांतदादा लढल्यास त्यांच्या विरोधात लढण्याची घोषणा याआधीच केली आहे.
भाजपची पहिली यादी आज?
घटस्थापनेच्या मुहूर्तावर काँग्रेसने आपली 51 उमेदवारांची यादी जाहीर केली तर शिवसेनेने काही उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप केले. या पार्श्वभूमीवर भाजपची पहिली यादी कधी येते याकडे सगळ्यांचे लक्ष होतं. भाजपची पहिली यादी सोमवारी जाहीर होईल, असं सूत्रांनी सांगितले आहे. ज्या जागांवर शिवसेनेचा दावा नाही, त्याच जागांवरचे उमेदवार या पहिल्या यादीत जाहीर होतील.