एक्स्प्लोर
Advertisement
शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ : भाजप आपलं वर्चस्व कायम राखणार?
भाजपमध्ये शिवाजी नगर मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांची गर्दी झालीय. त्यामुळे पक्षाने दिलेला उमेदवार सर्वजण मान्य करतात का यावर भाजपचं वर्चस्व कायम राहणार का हे बऱ्यापैकी अवलंबून असेल.
पुणे : पुणे शहराच्या मध्यवर्ती असलेल्या या मतदारसंघात भाजपचे विजय काळे आमदार आहेत . भाजप- शिवसेनेची युती असताना 1990 ते 2004 पर्यंत हा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात होता. पहिल्या दोन टर्म शशिकांत सुतार आमदार होते, तर नंतरच्या दोन टर्म विनायक निम्हण शिवसेनेकडून आमदार होते. मात्र 2009 ला विनायक निम्हण यांनी शिवसेनेतून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि निवडणूकही जिंकली. शिवसेनेसोबतची युती तुटल्याने 2014ला पहिल्यांदाच भाजपला या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची संधी मिळाली. कुणाच्याही ध्यानी मनी नसताना मोदी लाटेमध्ये विजय काळे आमदार बनले.
आत्ता या मतदारसंघातून भाजपतर्फे विजय काळेंबरोबरच माजी खासदार अनिल शिरोळेंचा मुलगा सिद्धार्थ शिरोळे हा इच्छुक आहे. त्याचबरोबर भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे हे स्वतः साठी किंवा त्यांच्या मुलासाठी या मतदारसंघातून भाजपाची उमेदवारी मिळेल का याची चाचपणी करतायत . दुसरीकडे पुन्हा शिवसेनेत परतलेले विनायक निम्हण भाजप-सेनेची युती होऊन हा मतदारसंघ आपल्या वाट्याला येईल या आशेवर आहेत. 2014 ला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस वेगळे लढल्याने राष्ट्रवादीकडून अनिल भोसलेलेंनी इथून निवडणूक लढवली होती. त्यांचा या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर पक्षाने त्यांना विधान परिषदेवर निवडून पाठवलं. परंतु त्यानंतर झालेल्या महापालिका निवडणुकीवेळी भोसलेंच्या पत्नीला उमेदवारी देण्यावरुन त्यांचा पक्ष नेतृत्वाशी वाद झाला आणि ते पक्षापासून लांब गेले . त्यांच्या पत्नी रेश्मा भोसले या भाजपच्या सहयोगी नगरसेविका बनल्या . अनिल भोसले मात्र भाजपच्या व्यासपीठावर आतापर्यंत तरी दिसलेले नाहीत . भाजप आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांशी ते अंतर राखून आहेत . मात्र निवडुकीत ते काय करणार यावर बरच काही अवलंबून आहे . कारण अनिल भोसले आणि भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे हे दोघे एकमेकांचे व्याही आहेत . या दोघांची या मतदारसंघात बऱ्यापैकी ताकत आहे . त्यामुळे हे दोघे पहिला प्रयत्न स्वतःच्या घरातच उमेदवारी खेचून आणण्यासाठी करतील .
दुसरीकडे भाजपचे माही खासदार अनिल शिरोळे यांनी यावर्षी झालेली लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला तो मुलगा सिद्धार्थला विधानसभेची उमेदवारी मिळवून देण्यासाठी. मुलाच्या राजकीय कारकिर्दीसाठी वडिलांनी माघार घेतल्याचं त्यावेळी बोललं गेलं. काही दिवसांपूर्वी भाजपच्या राज्य पदाधिकाऱ्यांनी शिवाजी नगर मतदारसंघातील कार्यकर्त्यांसाठी आयोजित केलेल्या मेळाव्यात आमदार विजय काळे यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या . एवढंच नाही तर घोषणा देणारे कार्यकर्ते काळेंच्या निषेधाचे फलक घेऊन थेट स्टेजवर चढल्याने कार्यक्रम बंद करण्याची वेळ राज्य कार्यकारणीच्या पदाधिकाऱ्यांवर आली. शिवाजी नगरमधून उमेदवारी मिळवण्यासाठी भाजपमध्ये किती स्पर्धा आहे आणि त्यातून कशी अंतर्गत खदखद निर्माण होते आहे हे त्यातून स्पष्ट झालं. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागावाटपात हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला आलाय . काँग्रेसतर्फे इथून निवडणूक लढवण्यासाठी इथून खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष मनीष आंनद आणि माजी नगरसेवक दत्ता बहिरट इच्छुक आहेत.
पूर्णपणे शहरी मतदारसंघ असल्याने या मतदारसंघात एकाच कोणत्या जातीचं प्राबल्य नाही. आज इथं भाजप आणि त्याआधी शिवसेनेचं असलेलं प्राबल्य बघता कधीकाळी म्हणजे 1972 ला या मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षाचा आमदार निवडून आला होता हे ऐकल्यावर गंमत वाटते. या मतदारसंघातील दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ग . दि . माडगूळकर यांचा मुलगा श्रीधर माडगूळकर यांनी ऐंशीच्या दशकात इथून काँग्रेसच्या तिकिटावर लढवलेली निवडणूक. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार असलेल्या गिरीश बापट यांना या शिवाजीनगर मतदारसंघातून 77982 मतं मिळाली तर त्यांच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेसच्या मोहन जोशींना 48450 मतं मिळाली. हा फरक जवळपास तीस हजारांचा आहे.
या मतदारसंघात पुणे शहरातील डेक्कन, प्रभात रस्ता, शिवाजी नगर, खडकी, गोखले नगर, पाटील इस्टेट या भागांचा समावेश होतो . यातील बहुतांश भाग उच्चभ्रू सोसायट्यांच्या आहे. ठिकठिकाणी जुनी गावठाणं आहेत, तर काही ठिकाणी झोपडपट्ट्या. त्यामुळे भाजपच पारडं इथं जड दिसणं साहजिक आहे. परंतु भाजपमध्ये शिवाजी नगर मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांची गर्दी झालीय. त्यामुळे पक्षाने दिलेला उमेदवार सर्वजण मान्य करतात का यावर भाजपचं वर्चस्व कायम राहणार का हे बऱ्यापैकी अवलंबून असेल. दुसरीकडे काँग्रेसचीही या मतदारसंघात परंपरागत मतं आहेत. मनीष आंनद यांची खडकी - दापोडी भागात पकड आहे तर गोखले नगर भागात दत्ता बहिरट यांची. मात्र लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही वंचित विकास आघाडी स्वतंत्रपणे लढल्यास काँग्रेसच नुकसान होऊ शकतं . काँग्रेसची रणनीती ही भाजपमधील नाराजांना चुचकारून स्वतःकडे वळवण्यावर असेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
लातूर
निवडणूक
Advertisement