Nawab Malik: नवाब मलिकांनी वातावरण 'गुलाबी' केलं, पण कॅमेऱ्यासमोर तोंडातून चकार शब्द काढला नाही, एबी फॉर्मचा सस्पेन्स कायम
Nawab Malik: नवाब मलिक हे शिवाजीनगर मानखुर्द विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्यांना अजित पवारांनी हिरवा कंदील दिल्याची चर्चा आहे.
मुंबई: अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक हे मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने अजितदादा गटाकडून (Ajit Pawar Camp) उमेदवारी अर्ज जाहीर न होऊनही नवाब मलिक आपला उमेदवारी अर्ज भरायला निघाले आहेत. मात्र, ते अजित पवार गटाकडून अर्ज दाखल करणार की अपक्ष रिंगणात उतरणार, याकडे सर्वांच्या लागल्या आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी नवाब मलिक (Nawab Malik) यांनी मुंबई उपनगरातील शिवाजीनगर-मानखुर्द मतदारसंघात रॅली काढून जोरदार शक्तीप्रदर्शन केले. यावेळी नवाब मलिक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या गळ्यात गुलाबी रंगाचे उपरणे होते. नवाब मलिकांच्या रॅलीतील ही गुलाबी हवा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, अजित पवार यांनी अगोदरच नवाब मलिक यांना एबी फॉर्म देऊन ठेवला होता. मात्र, हा एबी फॉर्म उमेदवारी अर्जाला जोडायचा की नाही, याबाबत अजित पवार गटाकडून त्यांना सूचना देण्यात आल्या नव्हत्या. त्यामुळे मंगळवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीही नवाब मलिक यांना अजितदादा गटाकडून उमेदवारी मिळणार की नाही, याबाबतचा सस्पेन्स कायम होता.
मात्र, नवाब मलिक यांच्या रॅलीतील गुलाबी वातावरण पाहता त्यांना अजित पवार यांचा पडद्यामागून पाठिंबा आहे का, अशी शंका निर्माण झाली आहे. या रॅलीत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींकडून नवाब मलिक यांना प्रश्न विचारण्यात आले. तुम्ही अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार की राष्ट्रवादी काँग्रेसकडून रिंगणात उतरणार, असे मलिक यांना विचारण्यात आले. मात्र, नवाब मलिक यांनी या प्रश्नावर उत्तर देणे टाळले, ते केवळ सूचकपणे हसत राहिले. त्यामुळे आता नवाब मलिक हे निवडणूक आयोगाच्या कार्यालयात उमेदवारी अर्ज भरणार तेव्हा ते राष्ट्रवादीचा एबी फॉर्म सोबत जोडतात का अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करतात, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
भाजप आणि शिंदे गटाचा नवाब मलिक यांना विरोध
नवाब मलिक यांना अजित पवार गटाने एबी फॉर्म दिल्याची माहिती समोर आली तेव्हा भाजपच्या प्रवीण दरेकर यांनी 'एबीपी माझा'शी संवाद साधला. अजित पवार यांनी नवाब मलिक यांना उमेदवारी दिली तरी आमचा त्याला विरोध राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. तर शिंदे गटाने नवाब मलिक निवडणूक लढवत असलेल्या मानखुर्द-शिवाजीनगर या विधानसभा मतदारसंघातून सुरेश (बुलेट) पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. काल मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी सुरेश (बुलेट) पाटील यांना एबी फॉर्म देण्यात आला होता.
आणखी वाचा
भाजपाची चौथी उमेदवार यादी जाहीर, अखेर नरेंद्र मेहतांनी मीरा-भाईंदरमधून बाजी मारलीच