साडेतीन वर्षांनी नवाब मलिक मैदानात, पहिला हल्ला फडणवीसांवर, म्हणाले, काहींनी बोंबाबोंब केली, तरी अजितदादा माझ्या पाठिशी उभे राहिले! निवडणूक आयोगाच्या कारभारावर सडकून प्रहार
आमच्या पक्षाबाबत 14 पेक्षा जास्त उमेदवार आमचे निवडणून येत नाहीत, असा आभास निर्माण केला जात आहे. मात्र, यंदा आमचे जास्त उमेदवार निवडून येतील, असे नवाब मलिक म्हणाले.

Nawab Malik on BMC Election: बरेच जण उत्तर भारतीयांना आपले हक्काचे मतदार समजत आहेत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जास्त उत्तर भारतीय उमेदवार दिले आहे. आमच्या पक्षाबाबत 14 पेक्षा जास्त उमेदवार आमचे निवडणून येत नाहीत, असा आभास निर्माण केला जात आहे. मात्र, यंदा आमचे जास्त उमेदवार निवडून येतील. काही लोक बोंबाबोंब करत होते, नवाब मलिक असतील तर आम्ही युती करणार नाही. मात्र, अजित पवार यांनी ठाम भूमिका घेतली आणि माझ्या पाठीशी उभे राहिले, अशा शब्दात तब्बल साडे तीन वर्षांनी मैदानात उतरलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते नवाब मलिक यांनी भाजपवर हल्ला चढवला. नवाब मलिक यांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावरही ताशेरे ओढले.
आमच्या उमेदवारीमधे सगळ्यात जास्त महिला
मलिक यांनी सांगितले की, मुंबईत 94 जागी आमचे उमेदवार आहेत. 95 जागी नामांकन भरण्यात आलं होतं. मात्र, किरकोळ कारणास्तव रद्द झाला आहे. रमाबाई आंबेडकरमध्ये आणि धारावीमधे पुरस्कृत उमेदवार दिला आहे. आमच्या उमेदवारीमधे सगळ्यात जास्त महिला आहेत. मराठी भाषिक या राज्यातील भूमिपुत्रांना आम्ही जास्त संधी दिली आहे. सर्वधर्मीयांना सोबत घेऊन आम्ही निवडणूक लढत असल्याचे ते म्हणाले.
30 जागांमुळे महापौर नक्की बसेल
येत्या16 तारखेला आमचा महापौर होणार आहे. हसू नका हे होऊ शकतं कारण झारखंडमधे एका जागेमुळे मुख्यमंत्री झाला आहे. 30 जागांमुळे महापौर नक्की बसेल, असा दावा मलिक यांनी केला. माझ्या परिवारातील एकही उमेदवार नाही. माझी बहिणीचा वेगळा परिवार आहे. माझा भवाचा वेगळा परिवार आहे. माझा भाऊ आणि बहीण हे आधीचे नगरसेवक आहेत, असा खुलासा मलिक यांनी केला आहे. मलिक यांच्यावर घराणेशाहीत तीन उमेदवाऱ्या दिल्याचा आरोप आहे.
निवडणूक आयोगाच्या कारभारावर हल्लाबोल
नवाब मलिक म्हणाले की, निवडणूक निर्णय अधिकारी योग्य काम करत नाहीत. एक उमेदवार असा आहे की जो कोर्टात गेला. बेकायदेशीर बांधकाम भाजप उमेदवारानं केलं आहे. त्याचे पुरावे सादर केले, तरी देखील निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिवसभर निर्णय दिला नाही. आमची नगरसेविका मनीषा रहाटे यांच्या विरोधात जो उमेदवार आहे तो महापालिकेचा व्हेंडर आहे, त्याला निवडणूक लढता येत नाही तरीदेखील त्याचा अर्ज स्वीकारण्यात आला. एक उमेदवार असा आहे ज्यानं राजस्थानचे जात प्रमाणपत्र जोडलं आहे. त्याचा देखील उमेदवारी अर्ज दाखल करून घेतला आहे मुळात अशा व्यक्तीला निवडणूक लढता येत नाही, असे नवाब मलिक म्हणाले. माझा गंभीर आरोप निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यावर आहे. निवडणूक निर्णय अधिकारी यांना कळायला हवे. उद्या आम्ही कोर्टात जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, आमचे आक्षेप हे 87, 119 आणि 151 या प्रभागांबाबत आमचे आक्षेप आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या





















