Narendra Modi : नरेंद्र मोदींना शुभेच्छा देणार का? मल्लिकार्जून खरगे यांचं तीन शब्दात उत्तर
Narendra Modi : नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीसाठी उपस्थित राहिलेल्या राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदाची शपथ दिली. नरेंद्र मोदी (Narendra Modi)यांनी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शपथविधीसाठी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खरगे (Mallikarjun Kharge) उपस्थित राहिले. यावेळी खरगे यांना नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा देणार का असा प्रश्न खरगे यांना विचारण्यात आला होता.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी संविधानिक कर्तव्य असल्यानं शपथविधी सोहळ्यात सहभागी होत असल्याचं म्हटलं. शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणं कर्तव्य आहे कारण राज्यसभेचा विरोधी पक्षनेता आहे, असं खरगे म्हणाले. मोदींना शुभेच्छा देणार का या प्रश्नावर जर भेट झाली तर पाहू, असं खरगे म्हणाले.
मल्लिकार्जून खरगे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण मिळालं होतं. इंडिया आघाडीच्या इतर पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करुन मल्लिकार्जून खरगे यांनी या सोहळ्याला उपस्थित राहण्याचा निर्णय घेतला.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांना शपधविधी सोहळ्याचं निमंत्रण मिळालं नसल्याचं म्हटलं होतं. जरी शपथविधीचं निमंत्रण मिळालं तरी या सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याचं म्हटलं.
नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून कोण?
महाराष्ट्रातून नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात भाजपच्या चार, शिवसेना शिंदे गटाच्या एक आणि आरपीएला एक अशा सहा जणांना स्थान मिळालं आहे. भाजपकडून नितीन गडकरी, पियूष गोयल, मुरलीधर मोहोळ, रक्षा खडसे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळाली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या प्रतापराव जाधव आणि रामदास आठवले यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळालं आहे.
नरेंद्र मोदींच्या शपथविधीसाठी दिग्गजांची उपस्थिती
नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. यावेळी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्यासह इतर देशांच्या प्रमुख उपस्थित होते. याशिवाय देशातील विविध मान्यवरांनी देखील या सोहळ्याला उपस्थिती लावली. एनडीएतील घटक पक्षांचे प्रमुख बिहारचे मुख्यमंत्री जदयूचे प्रमुख नितीश कुमार, आंध्र प्रदेशचे टीडीपीचे प्रमुख चंद्राबाबू नायडू आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. उद्योगपती मुकेश अंबानी, गौतम अदानी यांनी देखील हजेरी लावली.
संबंधित बातम्या :