'पार्थ पवार लंबी रेस का घोडा है... याद रखना', नितेश राणेंकडून पाठराखण
पार्थ पवारांच्या रुपाने पवार घराण्याची तिसरी पीढी राजकारणात येत आहे. पहिलं राजकीय भाषण करताना पार्थ पवार काहीसे गोंधळलेले दिसत होते. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांच्यावर टीका करण्यात येत होती. या टीकाकारांना नितेश राणेंनी उत्तर दिलं आहे.
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना मावळमधून उमेदवारी देण्यात आली आहे. शरद पवारांच्या उपस्थितीत पार्थ पवारांच्या प्रचाराचा शुभारंभ झाला. यावेळी पहिल्यांदाच पार्थ पवारांनी जाहीर सभेत राजकीय भाषण केलं. मात्र पहिल्यांदा भाषण करत असल्याचे पार्थ पवार काहीसे भांबावल्यासारखे दिसले. भाषणानंतर सोशल मीडियावर त्यांच्या थेट राजकीय कारकिर्दीवरच अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. मात्र काँग्रेसचे आमदार नितेश राणेंनी पार्थ पवारांची पाठराखण केली आहे.
"पार्थ पवारांच्या पहिल्या भाषणवार खिल्ली उडवण्यापेक्षा त्याला प्रोत्साहन दिले पाहिजे. पहिले भाषण आणि मोठी गर्दी.. धाडस लागते! लंबे रेस का घोडा है.. याद रखना!!" असं ट्वीट नितेश राणेंनी केलं आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा हवा आहे. त्यासाठी नितेश राणेंकडून पार्थ पवारांचं कौतुक सुरु असल्याची राजकीय चर्चा रंगू लागली आहे.
पार्थ पवार च्या पहिल्या भाषणवार खिल्ली उडवण्यापेक्षा त्याला प्रोत्साहन दिले पाहिजे.. पहिले भाषण आणि मोठी गर्दी.. धाडस लागतो! लंबे रेस का घोडा है..याद रखना!!
— nitesh rane (@NiteshNRane) March 19, 2019
पार्थ पवारांच्या रुपाने पवार घराण्याची तिसरी पीढी राजकारणात येत आहे. याआधी शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांची अनेक भाषणं लोकांनी ऐकली आणि ती गाजली आहेत. त्यामुळे पार्थ पवार पहिल्या भाषणात लोकांची मनं जिंकण्यात कमी पडल्याची चर्चा होत आहे.
मात्र पार्थ पवारांचं हे पहिलं राजकीय भाषण आहे, हे टीकाकारांनी जाणून घेणे गरजेचं आहे. तसेच कमी बोलून आपल्या कामाने लोकांमध्ये छाप पाडलेले अनेक नेते महाराष्ट्राने आणि देशाने पाहिले आहेत. त्यामुळे पार्थ पवारांबद्दल मत बनवण्याची घाई करु नये, असं जाणकारांचं मत आहे.
व्हिडीओ- पार्थ पवारांचं पहिलं भाषण