Chandgad Vidhan Sabha : चंदगडमध्ये शिवाजी पाटलांच्या बंडखोरीने महायुतीत उभी फूट; हातकणंगले आणि शिरोळमध्येही तिढा
Chandgad Vidhan Sabha : शिवाजी पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला त्यावेळी त्यांच्यासोबत माजी राज्यमंत्री भरमू पाटील आणि त्यांच्या कन्या शिवानी शिंगाडे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
Chandgad Vidhan Sabha : कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगेल विधानसभा मतदारसंघ आणि शिरोळ विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचा तिढा अजूनही कायम असताना चंदगडमध्ये महायुतीमध्ये उभी फूट पडली आहे. भाजप नेते शिवाजी पाटील यांनी आज प्रचंड शक्तीप्रदर्शन करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे अजित पवार गटाकडून रिंगणात असलेल्या आमदार राजेश पाटील यांच्या अडचणी वाढल्या आहेत. राजेश पाटील यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून नंदाताई बाभुळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नंदाताई बाभुळकर यांच्या उमेदवारीने सुद्धा महाविकास आघाडीमध्ये यापूर्वीच वादाची ठिणगी पडली आहे. त्यामुळे आता या वादामध्ये आता कोण बाजी मारणार याचे उत्तर 23 नोव्हेंबर रोजीच मिळणार आहे.
नंदाताई बाभुळकर आणि राजेश पाटील यांच्यासमोर आव्हान
गेल्या काही दिवसांपासून शिवाजी पाटील हे तुतारी फुंकणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, शिवाजी पाटील यांनी तसा कोणताही निर्णय न घेता अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शिवाजी पाटील यांच्या उमेदवारीने बाभुळकर आणि राजेश पाटील यांच्यासमोर आव्हान उभा राहिलं आहे. आज शिवाजी पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला त्यावेळी त्यांच्यासोबत माजी राज्यमंत्री भरमू पाटील आणि त्यांच्या कन्या शिवानी शिंगाडे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. त्यामुळे चंदगडमध्ये बहुरंगी लढत अटळ आहे.
हातकणंगले आणि शिरोळ मतदारसंघांमध्ये सुद्धा तिढा
दुसरीकडे चंदगडमध्ये महायुतीमध्ये उभी फूट पडली असतानाच हातकणंगले आणि शिरोळ मतदारसंघांमध्ये सुद्धा अजून महायुतीला निर्णय घेता आलेला नाही. जनसुराज्यकडून अशोकराव माने यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे हा मतदारसंघ जनसुराज्य पक्षाचे आमदार विनय कोरे यांना सोडला जाणार की त्या ठिकाणी महायुतीचा उमेदवार दिला जाणार याकडे लक्ष आहे. दुसरीकडे शिरोळमध्ये राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी स्वतंत्र अर्ज भरल्याने त्या ठिकाणी सुद्धा शिंदे गट काय भूमिका घेणार याकडे लक्ष आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीमध्ये तीन ठिकाणी आता डोकेदुखी वाढली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या