एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Loksabha Election 2019 : लोकसभा निवडणुकीचा राज्यातील शेवटचा टप्पा, 17 मतदारसंघात कसे आहे चित्र
चौथ्या टप्प्यात उत्तर मुंबई, उत्तर-पश्चिम मुंबई, ईशान्य मुंबई, उत्तर-मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, दक्षिण मुंबई, ठाणे, भिवंडी, पालघर, कल्याण, मावळ, शिरुर, नाशिक, शिर्डी, नंदुरबार, धुळे, दिंडोरी या मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे.
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदानाला आज सुरुवात झाली आहे. या टप्प्यात राज्यातील 17 लोकसभा मतदारसंघासाठी मतदान पार पडणार आहे. चौथ्या टप्प्यात मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांसह उपनगर आणि अन्य लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. चौथ्या टप्प्यात उत्तर मुंबई, उत्तर-पश्चिम मुंबई, ईशान्य मुंबई, उत्तर-मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, दक्षिण मुंबई, ठाणे, भिवंडी, पालघर, कल्याण, मावळ, शिरुर, नाशिक, शिर्डी, नंदुरबार, धुळे, दिंडोरी या मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे.
चौथ्या टप्प्यातील प्रमुख लढती
उत्तर-मुंबईत भाजपचे गोपाळ शेट्टी यांच्याविरोधात अभिनेत्री आणि काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनी आव्हान उभं केलं आहे. ईशान्य मुंबईत भाजपने विद्यमान खासदार किरीट सोमय्यांना डावलून मनोज कोटक यांना तिकीट दिलं आहे. त्यामुळे मनोज कोटक विरुद्ध संजय दिना पाटील अशी लढत होणार आहे. त्यामुळे ईशान्य मुंबईत भाजप आपली जागा राखतं का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
उत्तर-मध्य मुंबईत पुनम महाजन विरुद्ध प्रिया दत्त, दक्षिण मुंबईत अरविंद सावंत विरुद्ध मिलिंद देवरा या लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर उत्तर-पश्चिममध्ये शिवसेनेच्या गजानन किर्तीकर विरुद्ध काँग्रेसच्या संजय निरुपम यांच्यात सामना होणार आहे.
मावळमध्ये पवार कुटुंबातील तिसरी पिढी अर्थात अजित पवार यांने पुत्र पार्थ पवार रिंगणात आहे. त्यांच्याविरुद्ध शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांचं आव्हान आहे. या लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. शिरुर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या आढळराव पाटलांविरोधात अभिनेते आणि शिवसेनेतून राष्ट्रवादीत आलेल्या अमोल कोल्हेंनी आव्हान उभं केलं आहे. तर नाशिकमध्ये पुन्हा एकदा हेमंत गोडसे आणि समीर भुजबळ यांच्यात तडगी फाईट होण्याची शक्यता आहे.
दक्षिण मुंबई : उच्चभ्रू परिसरातील हायप्रोफाईल लढत
मुंबईतील उच्चभ्रू परिसर म्हणून दक्षिण मुंबईची ओळख. खरंतर दक्षिण मुंबई या मतदारसंघावर काँग्रेसचच वर्चस्व होतं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. मिलिंद देवरा सलग दोन टर्म (2004 ते 2009 आणि 2009 ते 2014) म्हणजेच सलग दहा वर्ष दक्षिण मुंबईचे खासदार होते. पण मागच्या निवडणुकीत शिवसेनेच्या अरविंद सावंत यांनी देवरांना पराभूत केलं होतं.
1952 पासून 1967 पर्यंत ही जागा काँग्रेसच्या ताब्यात होती. जनता दलतर्फे (संयुक्त) लढून जॉर्ज फर्नांडिस यांनी काँग्रेसचा विजयाची साखळी तोडली आणि 1967 च्या निवडणुकीत विजय मिळवला. 1971 मध्ये ही जागा पुन्हा काँग्रेसकडे गेली. 1977 पासून 1984 पर्यंत ही जागा भारतीय लोक दल आणि जनता पक्षाकडे होती. यानंतर 1984 पासून 1996 पर्यंत इथे काँग्रेसच्या मुरली देवरा यांचं वर्चस्व होतं. मग 1996 मध्ये भाजपच्या जयवंतीबेन इथे निवडून आल्या. मात्र 1998 मध्ये मुरली देवरा विजयी झाले. मग 1999 मध्ये पुन्हा जयवंतीबेन मेहतांनी विजय मिळवला. 2004 मध्ये मुरली देवरा यांचे पुत्र मिलिंद देवरा काँग्रेसच्या तिकीटावर लढले आणि 2014 पर्यंत ही जागा काँग्रेसकडे राहिली. मात्र 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत मिलिंद देवरा यांचा पराभव झाला आणि शिवसेनेचे अरविंद सावंत लोकसभेत खासदार म्हणून निवडून गेले. अरविंद सावंत यांनी सुमारे सव्वा लाखांपेक्षा जास्त मतांनी मिलिंद देवरांचा पराभव केला.
विधानसभा मतदारसंघ : मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात. इथे कोणत्याही पक्षाचं वर्चस्व राहिलेलं नाही. वरळी, शिवडीमध्ये शिवसेना, मलाबार हिल, कुलाबामध्ये भाजप, मुंबादेवीमधून काँग्रेस तर भायखळामधून असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएम पक्षाचा आमदार आहे.
लढत : यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसने पुन्हा एकदा मिलिंद देवरा आणि शिवसेनेने अरविंद सावंत यांनाच उमेदवारी दिली आहे. वंचित बहुजन आघाडीने दक्षिण मुंबईत डॉ. अनिल कुमार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. मात्र खरी लढत ही मिलिंद देवरा आणि अरविंद सावंत यांच्यातच होणार आहे.
दक्षिण मध्य मुंबई : पारंपरिक गड शिवसेनेने परत मिळवला!
आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी ही दक्षिकण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात येते. इथे आमदार काँग्रेसचे आहेत, पण खासदार मात्र शिवसेनेचा आहे. इथे शिवसेनेचे राहुल शेवाळे हे विद्यमान खासदार आहेत. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी दोन वेळा खासदार असलेल्या काँग्रेसच्या एकनाथ गायकवाड यांना पराभूत केलं होतं.
1952 पासून 1989 पर्यंत या जागेवर कधी काँग्रेस तर कधी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचं वर्चस्व होतं. विशेष म्हणजे 1984 मध्ये अपक्ष उमेदवाराचा विजय झाला होता. 1989 पासून 2009 पर्यंत म्हणजेच 20 वर्ष इथे शिवसेनेचा दबदबा होता. मोहन रावले यांनी सलग सहा निवडणुकीत शिवसेनेचा झेंडा रोवून ठेवला. 2009 मध्ये काँग्रेसने आपली गमावलेली जागा परत मिळवली. पण 2014 च्या मोदी लाटेत ही जागा पुन्हा शिवसेनेच्या खात्यात आली. राहुल शेवाळेंनी एकनाथ गायकवाड यांचा सव्वा लाखांपेक्षा जास्त मतांनी पराभव केला.
विधानसभा मतदारसंघ : दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात. अणुशक्ती नगर, चेंबूर आणि माहिममध्ये शिवसेनेचा दबदबा आहे तर सायन कोळीवाड्यात भाजपचा. धारावी आणि वडाळ्यात काँग्रेसचे आमदार आहेत.
लढत : यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे विद्यमान खासदार राहुल शेवाळे, काँग्रेसचे माजी खासदार एकनाथ गायकवाड आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. संजय भोसले यांच्या लढत होणार आहे. पण काँटे की टक्कर शेवाळे आणि गायकवाड यांच्यातच पाहायला मिळत आहे.
उत्तर-मध्य मुंबई : पूनम महाजन आणि प्रिया दत्त यांची रंजक लढत
उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात यंदा कोण बाजी मारणार हे सांगणं सध्या कठीण आहे. प्रिया दत्त यांनी वैयक्तिक कारणं देत निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता. परंतु नंतर त्यांनी तो निर्णय बदलला आणि सध्या त्या काँग्रेसच्या उमेदवार आहेत. तर या जागेवर भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांनी मुलगी पूनम महाजन खासदार आहेत.
सुनील दत्त यांच्या निधनानंतर उत्तर मध्य मुंबईमध्ये प्रिया दत्त यांचा विजय झाला होता. परंतु 2014 च्या लोकसभा निवडणुकीच मोदी लाटेत भाजपच्या पूनम महाजन यांच्याकडून त्यांना पराभूत व्हावं लागलं. पूनम महाजन यांनी प्रिया दत्त यांचा जवळपास 1 लाख 86 हजार मतांना पराभव केला. त्याआधी 2009 मध्ये प्रिाया दत्त यांनी भाजपच्या महेश राम जेठमलानी यांना पराभूत केलं होतं.
या जागेवर कोणत्याही पक्षाचा दबदबा राहिलेला नाही. कधी इथे काँग्रेसचा विजय झाला तर कधी भाजपचा, विशेष म्हणजे आरपीआयचा उमेदवारही इथे विजयी झाला होता. 1999 मध्ये शिवसेनेच्या मनोहर जोशी तर 1998 मध्ये आरपीआयच्या रामदास आठवलेंनी ही जागा जिंकली होती. त्याआधी 1980 मध्ये जनता पक्षाच्या प्रमिला मधु दंडवते यांनी काँग्रेसच्या उमेदवारावर मात केली होती. तर 1977 मध्ये या जागेवर सीपीआय (एम) यांनी अहिल्या रांगेकर यांना विजय मिळाला होता.
विधानसभा मतदारसंघ : उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात विले पार्ले, चांदिवली कुर्ला, वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम आणि कलिना हे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. कुर्ला, कलिना आणि वांद्रे पूर्वमध्ये शिवसेनेचे आमदार आहेत. तर वांद्रे पश्चिम आणि विलेपार्लेमध्ये भाजपचे. चांदिवली जागा काँग्रेसच्या खात्यात आहे.
लढत : उत्तर मध्य मुंबईत भाजपच्या पूनम महाजन आणि काँग्रेसच्या प्रिया दत्त या दोन महिला उमेदवारांमध्ये महत्त्वपूर्ण लढत होणार आहे.
ईशान्य मुंबई : 35 वर्षांपासून उलटफेरचा साक्षीदार असलेला मतदारसंघ
जागावाटपात सर्वात हायव्होल्टेज ड्रामा झालेला मतदारसंघ म्हणजे ईशान्य मुंबई. 1967 पासून 1980 पर्यंत इथे सलग तीन वेळा, काँग्रेसचे दोन वेळा जनता पक्षाचे खासदार होते. यानंतर सत्ताधाऱ्यांना बदलण्याचा जो सिलसिला सुरु झाला, तो अद्यापही कायम आहे.
1980 मध्ये या जागेवर जनता पक्षाचे सुब्रमण्यम स्वामी खासदार होते. यानंतर 1984 मध्ये काँग्रेसचे गुरुदास कामत, 1989 मध्ये भाजपच्या जयवंतीबेन मेहता, 1991 मध्ये काँग्रेसचे गुरुदास कामत, 1996 मध्ये भाजपचे प्रमोद महाजन, 1998 मध्ये काँग्रेसचे गुरुदास कामत, 1999 मध्ये भाजपचे किरीट सोमय्या, 2004 मध्ये काँग्रेसचे गुरुदास कामत, 2009 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे संजयदिना पाटील आणि 2014 मध्ये भाजपचे किरीट सोमय्या खासदार होते. अशाप्रकारे 35 वर्षांमध्ये हा मतदारसंघ सातत्याने परिवर्तनाचा साक्षीदार राहिला होता.
विधानसभा मतदारसंघ : उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात. या लोकसभा मतदारसंघातील विधानसभा जागांवर भाजप-शिवसेना पक्षांचं वर्चस्व आहे. मुलुंड, घाटकोपर पश्चिम, घाटकोपर पूर्वमध्ये भाजपचे आमदार आहेत तर विक्रोळी आणि भांडुप पश्चिममध्ये शिवसेनेचे. मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघात समाजवादी पक्षाचे अबु आझमी आमदार आहेत.
लढत : 2014 च्या निवडणुकीत किरीट सोमय्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संजयदिना पाटील यांना सुमारे सव्वा तीन लाख मतांनी पराभव केला होता. मात्र यंदा किरीट सोमय्यांना उमेदवारी मिळालेली नाही. किरीट सोमय्यांना उमेदवारी द्यायची की नाही यावरुन इथे वाद रंगला होता. शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या वैयक्तिक टीकेमुळे शिवसेनेने त्यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. अखेर भाजपने सोमय्यांचा पत्ता कापून मनोज कोटक यांना इथे उमेदवारी दिली. यंदा इथे राष्ट्रवादीच्या संजयदिना पाटील आणि मनोज कोटक यांच्यात लढत होणार आहे.
उत्तर पश्चिम मुंबई : एकेकाळी सिनेसृष्टीचा दबदबा असलेला मतदारसंघ
एकेकीळी देशातील सर्वात चर्चेत असलेला मतदारसंघ. अभिनेत्यापासून नेते बनलेले सुनील दत्त यांच्यामुळे हा मतदारसंघ प्रसिद्ध झाला होता. सुनील दत्त यांनी काँग्रेसच्या तिकीटावर इथे 18 वर्ष खासदार होते. या जागेवर अनेक रोमांचक लढतीही झाल्या. या मतदारसंघावर सिनेसृष्टीतील लोकांचाच दबदबा राहिला. पण शिवसेनेने हा दबदबा मोडून काढला आणि 2014 मध्ये इथे विजय मिळवाला. 2014 मध्ये शिवसेनेचे गजानन किर्तीकर इथे विजयी झाले.
1967 पासून 1977 पर्यंत ही जागा काँग्रेसकडे होती आणि त्यानंतर ख्यातनाम वकील राम जेठमलानी आधी जनता पक्ष मग भाजपचे खासदार बनले. यानंतर1984 पासून 1996 पर्यंत काँग्रेसचे खासदार आणि अभिनेते सुनील दत्त यांचं मतदारसंघावर वर्चस्व राहिलं. मात्र 1996 आणि 1998 मध्ये शिवसेनेलाही इथे विजय मिळाल. मग 1999 मध्ये ही जागा पुन्हा सुनील दत्त यांच्याकडे आली. 2005 मध्ये सुनील दत्त यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत सुनील दत्त यांची मुलगी प्रिया दत्त इथून खासदार झाल्य. 2009 मध्येही ही जागा काँग्रेसकडेच होती. पण 2014 मध्ये शिवसेनेच्या गजानन किर्तीकर यांनी या जागेवर विजय मिळवला.
विधानसभा मतदारसंघ : उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा येतात. इथे पूर्णत: शिवसेना आणि भाजपचं वर्चस्व आहे. गोरेगाव, वर्सोवा, अंधेरी पश्चिममध्ये भाजपचे आमदार आहेत. जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी आणि अंधेरी पूर्वमध्ये शिवसेनेचे आमदार आहेत.
लढत : 2014 च्या निवडणुकीत गजानन किर्तीकर यांनी गुरुदास कामत यांचा सुमारे 1 लाख 80 हजार मतांनी पराभव केला होता. यंदाच्या निवडणुकीत विद्यमान खासदार गजानन किर्तीकर आणि काँग्रेसचे उमेदवार संजय निरुपम यांच्यात प्रमुख लढत आहे.
उत्तर मुंबई : भाजपच्या पारंपरिक मतदारसंघात काँग्रेसचं आव्हान
उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचा मूड आता परिवर्तन झाला आहे. एकेकाळी इथे भाजपचे राम नाईक पाच वेळा खासदार होते. मग त्यांना अभिनेता गोविंदाकडून आव्हान मिळालं. गोविंदाने इथे काँग्रेसचा झेंडा फडकावला. नंतर काँग्रेसकडूनच संजय निरुपम इथे जिंकले. मग 2014 मध्ये मोदी लाटेत केवळ संजय निरुपम यांचाच पराभव झाला नाही तर गोपाळ शेट्टी यांनी काँग्रेसला रसातळाला पाठवलं. काँग्रेसचा इथे दारुण पराभव झाला. यंदाही गोपाळ शेट्टीच भाजपचे उमेदवार असून काँग्रेसने अभिनेत्री उर्मिला मातोंडकरला उमेदवारी दिली आहे.
1952 मध्ये या जागी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्या श्रीपाद अमृत डांगे यांनी जिंकली होती. त्यानंतर वेगवेगळ्या पक्षाच्या खासदारांनी इथे विजय मिळवला. तर एकदा ही जागा भाजपच्या खात्यात गेली होती. 1989 पासून 2004 पर्यंत सलग तीन लोकसभा निवडणुकीत राम नाईक यांचा इथे विजय झाला होता. 2004 मध्ये त्यांना काँग्रेसच्या तिकीटावर लढलेला अभिनेता गोविंदाकडून आव्हान मिळालं, ज्यात गोविंदाने त्यांच्यावर मात केली. यानंतर शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेले संजय निरुपम 2009 मध्ये इथून खासदार बनले. त्यांनीही भाजपच्या राम नाईक यांना कमी फरकाने पराभूत केलं. 2014 मध्ये मोदी लाटेत ही जागा पुन्हा एकदा भाजपकडे आली. इथे गोपाळ शेट्टींना तब्बल साडे चार लाख मतांनी विजय मिळाला.
विधानसभा मतदारसंघ : उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात बोरीवली, दहिसर, मागाठणे, कांदिवली पूर्व, चारकोप आणि मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंघ येतात. या लोकसभा मतदारसंघावर भाजपचा दबदबा आहे. इथे बोरीवली, दहिसर, कांदिवली पूर्व आणि चारकोपमध्ये भाजप, मागाठणेमध्ये शिवसेना तर मालाड पश्चिम मतदारसंघ काँग्रेसच्या खात्यात आहे.
लढत : यंदाच्या निवडणुकीत इथे काँग्रेस विरुद्ध भाजप सामना पाहायला मिळणार आहे. बऱ्याच वर्षांनी या मतदारसंघात काँग्रेसने उर्मिला मातोंडकर यांच्या रुपाने इथे मराठी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवला आहे. त्यामुळे भाजपच्या गोपाळ शेट्टी यांना उर्मिला मातोंडकरचं आव्हान आहे.
कल्याण लोकसभा मतदारसंघात शिंदेंचं पारडं जड
शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि विद्यमान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे पुन्हा एकदा कल्याण लोकसभा मतदारसंघातून रिंगणात आहेत. राष्ट्रवादीने बाबाजी पाटील यांना श्रीकांत शिंदेंविरुद्ध उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार बाबाजी पाटील यांच्या तुलनेने श्रीकांत शिंदे यांचं पारडं जड आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघातून 28 उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात आहेत. कल्याण लोकसभा मतदारसंघात 2009 पासून शिवसेनेने विजय मिळवला आहे. 2014 मध्ये श्रीकांत शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या आनंद परांजपे यांना पराभवाची धुळ चारली होती.
कल्याण लोकसभा मतदारसंघ 2008 च्या मतदारसंघ पुनर्रचनेनंतर अस्तित्वात आला. याआधी ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत हा भाग येत होता. कल्याण मतदारसंघ भाजप-शिवसेनेचा गड मानला जातो. भाजपचे राम कापसे 1989 पासून 1996 पर्यंत याठिकाणी खासदार होते. राज्यात शिवसेना-भाजपच्या युतीनंतर ही जागा शिवसेनेच्या वाट्याला आली. शिवसेनेचे प्रकाश परांजपचे याठिकाणी 1996 पासून 2008 पर्यंत खासदार राहिले. मात्र त्यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र आनंद परांजपे यांना शिवसेनेनं तिकीट दिलं आणि ते येथून निवडूनही आले. मात्र काही दिवसातच आनंद परांजपे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादीत प्रवेश केला. मात्र राष्ट्रवादीकडून लढलेल्या 2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.
विधानसभा मतदारसंघ
अंबरनाथ
उल्हासनगर
कल्याण पूर्व
कल्याण ग्रामीण
डोंबिवली
मुंब्रा-कळवा
ठाण्यात शिवसेना-राष्ट्रवादीत मुख्य लढत
लोकसभा निवडणुकीत ठाणे मतदारसंघातून 23 उमेदवार यंदा आपलं नशीब आजमावत आहेत. युतीकडून शिवसेनेचे विद्यमान खासदार राजन विचारे यांना येथून तिकीट देण्यात आलं आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा एकदा आनंद परांजपे यांना उमेदवारी दिली आहे. ठाण्यात राजन विचारे यांचा जनसंपर्क चांगला असल्याचा फायदा त्यांना होऊ शकतो.
ठाणे लोकसभा मतदारसंघाची निर्मिती झाली त्यावेळी काँग्रेसचा याठिकाणी दबदबा होता. मात्र गेल्या अनेक वर्षापासून हा शिवसेना-भाजपचा बालेकिल्ला आहे. 1984 मध्ये काँग्रेसच्या शांताराम घोलप, 1989 आणि 1991 मध्ये भाजपचे राम कापसे त्यानंतर 1996 पासून 2004 पर्यंत सलग चार वेळा शिवसेनेचे दिवंगत नेते प्रकाश परांजपे याठिकाणी खासदार होते. 2009 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या संजीव नाईक यांनी प्रकाश परांजपे याचे पुत्र आनंद परांजपे यांचा पराभव केला होता.
त्यानंतर 2014 मध्ये पुन्हा शिवसेनेनी ही जागा जिंकली. राजन विचारे यांनी संजीव नाईक यांचा पराभव केला. 2014 च्या निवडणुकीत राजन विचारे यांना 5,95,364 मते मिळाली होती. तर संजीव नाईक यांना 3,14,065 मते मिळाली होती. तिसऱ्या स्थानावरील मनसेचे उमेदवार अभिजीत पानसे यांना 48,863 मते मिळाली होती.
विधानसभा मतदारसंघ
ठाणे
कोपरी-पाचपाखाडी
मीरा भाईंदर
ओवळा-माजीवडा
बेलापूर
ऐरोली
भिवंडी लोकसभा मतदारसंघात कोण मारणार बाजी
भिवंडी लोकसभा मतदारसंघ 2008 मध्ये अस्तित्वात आला आहे. त्यानंतर 2009 मध्ये भिवंडी मतदारसंघात पहिल्यांदा निवडणूक पार पडली. भिंवडीमध्ये काँग्रेस, भाजप आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या तीन पक्षांमध्ये प्रामुख्याने लढत पाहायला मिळते. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांनी बाजी मारत संसदेत एन्ट्री मिळवली होती. कपिल पाटील यांना 4,11,070 मते मिळाली होती, तर काँग्रेसच्या विश्वनाथ पाटील यांना 3,01,620 मते मिळाली होती. तर तिसऱ्या स्थानावर मनसेच्या सुरेश म्हात्रे यांना 93,647 मते मिळाली होती.
ठाण्यातील भिवंडी मतदारसंघ आधी डहाणू लोकसभा मतदारसंघाचा भाग होता. मात्र मतदारसंघ पुनर्रचनेनंतर डहाणूपासून वेगळा झाल्यानंतर भिंवडीत ज्या तीन विधानसभा मतदारसंघाचा समावेश झाला, तिथे भाजपचा दबदबा आहे. हेच मुख्य कारण आहे की युतीचा उमेदवार याठिकाणी विजयी ठरला. 1999 मध्ये भाजपच्या चिंतामन वनगा यांनी डहाणू लोकसभेच्या जागेवर काँग्रेसच्या केडीएम शिंगडा यांचा पराभव केला होता.
भिवंडी लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघात गेल्या निवडणुकीत भिवंडी ग्रामीण आणि भिवंडी पूर्व विधानसभा जागेवर शिवसेनेनं बाजी मारली होती. तर भिवंडी पश्चिम, कल्याण पश्चिम आणि मुरबाड विधानसभा क्षेत्रात भाजपचे उमेदवार विजयी ठरले होते. त्यामुळे याठिकाणी शिवसेना-भाजपचं वर्चस्व आहे.
विधानसभा मतदारसंघ
भिवंडी ग्रामीण
शहापूर
भिवंडी पश्चिम
भिवंडी पूर्व
कल्याण पश्चिम
मुरबाड
पालघरमध्ये शिवसेनेपुढे बविआचे तगडे आव्हान
पालघर लोकसभा मतदारसंघात युतीचे उमेदवार राजेंद्र गावित आणि बहुजन विकास आघाडीचे उमेदवार, माजी खासदार बळीराम जाधव यांच्यात प्रमुख लढत आहे. राजेंद्र गावित यांच्यासाठी युतीने सगळी ताकद पणाला लावली आहे. शिवसेना-भाजपची युती झाली त्यावेळी पालघर मतदारसंघ आम्हाला सोडण्याची अट शिवसेनेने ठेवल्याचं बोललं जातं. त्यामुळे उद्धव ठाकरेंसाठी ही लढत प्रतिष्ठेची बनली आहे.
शिवसेनेनं श्रीनिवास वनगा यांना तिकीट देण्याचे आश्वासन दिलं होतं. मात्र ऐन वेळी पोटनिवडणुकीत विजयी ठरलेले भाजपाचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि शिवसेनेनं त्यांना तिकीटही दिले.
काही महिन्यांपूर्वी झालेल्या पोटनिवडणुकीत याठिकाणी भाजपच्या राजेंद्र गावित हे विजयी झाले होते. त्यांनी शिवसेनेच्या श्रीनिवास वनगा यांचा पराभव केला. या पोटनिवडणुकीतील महत्त्वाची बाब म्हणजे 2014 मध्ये शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार चिंतामण वनगा याठिकाणी विजयी झाले होते, मात्र पोटनिवडणुकीत शिवसेना-भाजप यांच्या प्रमुख लढत याठिकाणी पाहायला मिळाली होती.
2009 लोकसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडीच्या बळीराम जाधव यांनी भाजपच्या चिंतामन वनगा यांचा पराभव केला होता. मात्र 2014 च्या निवडणुकीत 2009 च्या पराभवाचा वचपा काढत, चिंतामण वनगा याठिकाणी विजयी झाले होते. या निवडणुकीत चिंतामन वनगा यांना 5,33,201 मतं पडली होती. तर बळीराम जाधव यांना 2,93,681 मतं मिळाली होती.
विधानसभा मतदारसंघ
डहाणू
विक्रमगड
पालघर
बोईसर
नालासोपारा
वसई
शिर्डीत तिहेरी लढतीमुळे रंगत
पूर्वाश्रमीचा कोपरगाव म्हणजेच आताचा शिर्डी लोकसभा मतदारसंघ. 2009 सालच्या पुनर्रचनेत हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला. मतदारसंघ राखीव झाल्यानंतर साईबाबा संस्थानचे तत्कालीन सेवानिवृत्त अधिकारी भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवत रिपाई नेते रामदास आठवले यांचा मोठ्या फरकाने पराभव करून राज्याचं लक्ष वेधून घेतलं होतं.
2014 च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत भाऊसाहेब वाघचौरे यांनी शिवसेनेला ऐनवेळी जय महाराष्ट्र करत काँग्रेसकडून निवडणूक लढवली आणि त्यांना मतदारांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. अवघ्या 15 दिवसांच्या प्रचारात शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे हे सव्वा लाखांच्या मताधिक्क्याने निवडून आले. आता येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेना, भाजप महायुतीचे सदाशिव लोखंडे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी चे भाऊसाहेब कांबळे आणि अपक्ष भाजप बंडखोर उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे अशी तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.
मतदारसंघातील विधानसभा क्षेत्र
अकोले
संगमनेर
शिर्डी
कोपरगाव
श्रीरामपूर
नेवासा
शिरूर लोकसभा मतदारसंघ : शिवाजीराव आढळरावांसमोर अमोल कोल्हे यांचं आव्हान
शिरुर लोकसभा मतदारसंघात यंदा शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अमोल कोल्हे यांचं आव्हान आहे. 2008 साली हा मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून आढळराव पाटील शिरूरचं नेतृत्व करत आहेत. 2009 आणि 2014 या दोनही निवडणुकांत त्यांनी विजय मिळवला आहे. परंतु यावेळी अमोल कोल्हे यांच्या एंट्रीमुळे शिरूरमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळेल असं बोललं जात आहे.
अभिनेते अमोल कोल्हे यांनी निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सुरवातीला शिवाजी महाराज आणि नंतर 'स्वराज्यसरक्षक संभाजी' या भूमिकेतून अमोल कोल्हे घराघरात पोहोचलेले आहेत. त्यांच्या या लोकप्रियतेचा निवडणुकीत किती फायदा होतो हे येत्या काळात समजेल. निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानंतर "स्वराज्यरक्षक संभाजी ही मालिका संपल्यावर अभिनय करणार नसून लोकांसाठीच पूर्ण वेळ देईन, असं आश्वासन अमोल कोल्हे यांनी दिलं आहे.
विधानसभा क्षेत्र :
जुन्नर
आंबेगाव
शिरूर
भोसरी
खेड आळंदी
हडपसर
मावळ लोकसभा मतदारसंघ : श्रीरंग बारणे विरुद्ध पार्थ पवार
मावळ मतदारसंघातून यावेळी अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना लोकसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने ही लढाई यंदा प्रतिष्ठेची केली आहे.
2014 साली लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे श्रीरंग बारणे हे तब्बल 5 लाख 12 हजार 226 मतांनी विजयी झाले होते. शेकाप आणि मनसेच्या पाठिंब्यावर उभे राहिलेले अपक्ष उमेदवार लक्ष्मण जगताप यांना 3 लाख 54 हजार 829 मते मिळाली होती. तर राष्ट्रवादीचे उमेदवार राहुल नार्वेकर यांना तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती.
लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच मावळ मतदार लोकसभा मतदार संघात पार्थ पवार यांनी संपर्क दौरे सुरू केले होते. पार्थ यांना मावळमधून उमेदवारी देण्यात यावी अशी कार्यकर्त्यांकडून मागणी देखील करण्यात येत होती. त्यानुसार शेवटी पार्थ यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले.
मावळ लोकसभा मतदार संघातील सहा विधान सभांपैकी पाच विधानसभा शिवसेना-भाजपच्या ताब्यात आहेत. त्यामध्ये भाजपाचे तीन आणि शिवसेनेचे दोन आमदार आहेत. केवळ कर्जत विधानसभेत राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातील उरण, पनवेल, कर्जत या विधानसभा मतदारसंघात शेकापचा प्रभाव आहे. शेकापकडून पार्थ यांना उमेदवारी देण्यासाठी आग्रह धरण्यात आला होता.
मतदारसंघातील विधानसभा क्षेत्र
पनवेल
कर्जत
उरण
मावळ
चिंचवड
पिंपरी
धुळ्यात अनिल गोटेंच्या बंडाने भाजपचं नुकसान होणार?
धुळे लोकसभा मतदारसंघ, उत्तर महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाचा मतदारसंघ आहे. धुळे मतदारसंघातून 28 उमेदवारांचे भवितव्य आज मतदान यंत्रात बंद होईल. मात्र काँग्रेसचे उमेदवार कुणाल पाटील आणि भाजपतर्फे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्यात खरी लढत असेल. असं असलं तरी भाजपचे बंडखोर आमदार अनिल गोटे हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात असल्याने धुळे मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे. गेले काही दिवस भाजपमधील अंतर्गत गटबाजीमुळे नाराज असलेले गोटे थेट भाजपच्या विरोधात निवडणूक रिंगणात उतरले आहेत. मात्र गोटेंच्या बडखोरीमुळे नेमका भाजपला किती मतांचा फटका बसतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 1996 ते 2014 पर्यंत सलग 18 वर्ष भाजपचे वर्चस्व धुळे लोकसभा मतदारसंघात आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीवेळी धुळे लोकसभा मतदारसंघातून शिवेसेनेतून भाजपात गेलेले डॉ. सुभाष भामरे यांनी शिरपूरच्या अमरीश पटेल यांचा पराभव करत विजयी झाले होते. यावेळी भामरेंना 5 लाख 29 हजार 450 मतं मिळाली होती.
मतदारसंघातील विधानसभा क्षेत्र
धुळे ग्रामीण
धुळे शहर
शिंदखेडा
मालेगाव मध्य
मालेगाव बाह्य
बागलाण
बंडखोरीमुळे नंदुरबारमध्ये हीना गावितांसमोर कडवे आव्हान
दुर्गम व अति दुर्गम भागाचा समावेश असलेल्या नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून यावेळी 11 उमेदवार रिंगणात आहेत. ह्या मतदारसंघामध्ये सध्या नंदुरबार जिल्ह्यामधील 4 व धुळे जिल्ह्यातील 2 असे एकूण 6 विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत. नंदुरबार लोकसभा मतदारसंघात 18 लाख 70 हजार 117 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. प्रत्यक्षात मात्र भाजपच्या उमेदवार डॉ. हीना गावित, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार के सी पाडवी यांच्यातच खरी लढत आहे.
भाजपा महायुतीमध्ये दगाफटका करू पाहणाऱ्यांचे चाललेले प्रयत्न पाहता भाजपला पुन्हा ही जागा मिळवता येईल का? काँग्रेसचे के सी पाडवी यांचा शांततेत चाललेला प्रचार मागील वेळी हातून गेलेला हा बालेकिल्ला पुन्हा मिळवून देण्याला पुरेसा ठरेल काय? असा सवाल आहे. यामध्ये भाजपचे बंडखोर अपक्ष डॉ. सुहास नटावदकर यांचे आव्हान असल्याने गावितांचा मार्ग खडतर झाला आहे. भाजपातून बंडखोरी केलेल्या डॉ. सुहास नटावदकर यांना भाजपने पक्षातून काढून टाकले आहे. ते आरएसएसच्या खास गटातले मानले जातात. माजी आमदार डॉक्टर नरेंद्र पाडवी माजी जिल्हाध्यक्ष कुवरसिंग वळवी अशी भाजपातील आणि आर एस एस मधील नाराज मंडळी त्यांच्या समवेत आहेत डॉक्टर हिना गावित यांची मत विभागणी करणे हा एकमेव उद्देश त्यांचा आहे. याव्यतिरिक्त वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पार्टीचे उमदेवारही रिंगणात आहेत.
मतदारसंघातील विधानसभा क्षेत्र
अक्कलकुवा
शहादा
नंदुरबार
नवापूर
साक्री
शिरपूर
दिंडोरीच्या तिहेरी लढतीकडे सर्वांचे लक्ष
दिंडोरी लोकसभा मतदारसंघात नाशिक जिल्ह्यातील 6 विधानसभा मतदारसंघांचा समावेश करण्यात आला आहे. दिंडोरीत महायुतीच्या डॉ. भारती पवार, महाआघाडीचे धनराज महाले आणि माकपचे जिवा पांडू गावित यांच्यात मुख्य लढत होत आहे. आकाराने मोठ्या असणाऱ्या मतदारसंघात मतदारांपर्यंत पोहोचणे उमेदवारांसाठी जिकिरीचे ठरले आहे. मोठ्या प्रमाणावर अदिवासी लोकसंख्या असलेल्या या मतदारसंघावर या वेळी कोणाचा झेंडा फडकणार याबाबत उत्सुकता आहे. लोकसभा निवडणूक 2019 चा निकाल पाहता भाजप उमेदवार हरिश्चंद्र चव्हाण यांनी येथून बाजी मारली होती. त्यावेळी हरिश्चंद्र चव्हाण (भाजप) 542784, भारती पवार (राष्ट्रवादी) 295165, हेमंत वाघेरे (कम्युनिस्ट पक्ष) 72599, शरद माळी (बसपा) यांना 17724 इतकी मते मिळाली होती. निवडणुकीच्या आधी डॉ. भारती पवार यांनी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश करत उमेदवारी मिळवली. यामुळे विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण नाराज झाले होते. गेल्या वेळेस दुसऱ्या स्थानावर राहिलेल्या पवारांपुढे यावेळी तगडे आव्हान आहे.
मतदारसंघातील विधानसभा क्षेत्र
नांदगाव
कळवण
चांदवड
येवला
निफाड
दिंडोरी
नाशिकमध्ये छगन भुजबळांची प्रतिष्ठा पणाला
निवडणुकीत नाशिक लोकसभा मतदारसंघातून 18 उमेदवार नशीब आजमावत असून, त्यात शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे आणि राष्ट्रवादीचे माजी खासदार समीर भुजबळ यांच्यात मुख्य लढत आहे. तरीही बंडखोर अपक्ष माणिकराव कोकाटे, वंचित बहुजन आघाडीचे पवन पवार, बहुजन समाज पार्टीचे वैभव आहिरे हे किती मतं घेतात यावर लढतीचा निकाल अवलंबून असेल. नाशिक लोकसभा मतदारसंघ हा तसा राष्ट्रवादीचा गड. 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत या गडाला शिवसेना-भाजपने सुरुंग लावला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच तगडे नेते छगन भुजबळ हे येथून नेतृत्व करतात. 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या हेमंत गोडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार समीर भुजबळ यांना पराभूत केले होते. नाशिक शहरातील मतदान हे निर्णायक भूमिका बजावेल असा अंदाज आहे. एकूण मतदारांपैकी तब्बल 60 ते 65 टक्के मतदार हे नाशिक महानगरातील असल्याने येथे जो जादू करील तोच सिकंदर राहणार आहे.
मतदारसंघातील विधानसभा क्षेत्र
सिन्नर
इगतपुरी
नाशिक पूर्व
नाशिक पश्चिम
नाशिक मध्य
देवळाली
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement