Eknath Shinde: गृहमंत्रिपदाऐवजी भाजपने एकनाथ शिंदेंसमोर दोन पर्याय ठेवले; उपमुख्यमंत्रिपदही घेणार?, आज पुन्हा बैठक
Maharashtra CM: एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीत मंत्रिपदावर देखील अंतिम तोडगा निघाला नसल्याचं कळतंय.
Eknath Shinde Devendra Fadnavis मुंबई: शपथविधीचं काऊंटडाऊन सुरू झालंय आणि महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. काल संध्याकाळी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी वर्षा बंगला गाठत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतली. या बैठकीत दोन्ही नेत्यांशिवाय इतर कुणीच नव्हतं. जवळपास 40 ते 45 मिनिटं ही बैठक चालली. या बैठकीनंतर गृह खात्यासाठी एकनाथ शिंदे आग्रही असले तरी हे खातं देवेंद्र फडणवीसांकडेच राहणार असल्याचं सूत्रांच्या माहितीनूसार समोर आलं आहे.
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या काल झालेल्या बैठकीत देखील मंत्रिपदावर देखील अंतिम तोडगा निघाला नसल्याचं कळतंय. त्यामुळे आज पुन्हा एकदा बैठक होण्याची शक्यता आहे. गृहमंत्रिपद देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच राहावे, यासाठी भाजपचा आग्रह आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्रिपदासह नगरविकास खात्यासह अजून एक कोणतं तरी खातं घ्यावं, असा प्रस्वात भाजपकडून ठेवण्यात आल्याचं कळतंय. आज पुन्हा यावर एक बैठक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्या शपथविधी असताना आजतरी मंत्रिपदाचा प्रश्न सुटणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, मुख्यमंत्रिपदाच्या नावावर आज होणार शिक्कामोर्तब आहे. भाजप केंद्रीय निरीक्षकांच्या उपस्थितीत विधिमंडळ पक्षाची बैठक होईल. त्यानंतर भाजपकडून मुख्यमंत्रिपदाच्या नावावर शिक्कामोर्तब होईल.
मुख्यमंत्रिपदी पुन्हा देवेंद्र फडणवीस विराजमान होतील हे जवळपास निश्चित-
अखेर मुख्यमंत्री कोण होणार याचा फैसला आज होणार आहे. भाजप विधिमंडळ पक्षनेत्याची आज मुंबईत निवड होईल. आज भाजपच्या विधिमंडळ पक्षाची सकाळी 10 वाजता मुंबईत बैठक होणार आहे. या बैठकीत केंद्रीय निरीक्षकांच्या उपस्थितीत भाजप आमदार आपला विधिमंडळ पक्षनेत्याच्या नावावर मोहोर उमटवतील. देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरच शिक्कामोर्तब होईल अशीच चर्चा आहे. त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्रिपदी पुन्हा देवेंद्र फडणवीस विराजमान होतील हे जवळपास निश्चित आहे.
उद्धव ठाकरेंनाही शपथविधीसाठी निमंत्रण
नव्या सरकारच्या शपथविधीसाठी अनेक राज्यासह देशभरातील दिग्गज नेत्यांना निमंत्रण पाठवण्यात आलंय. यात राज्यातील नेत्यांमध्ये उद्धव ठाकरेंसह अनेक महत्त्वाच्या नेत्यांना बोलवण्यात आलंय. तर भाजपशासित राज्याच्या मुख्यमंत्र्यांना देखील शपथविधीचं निमंत्रण दिलंय...योगी आदित्यनाथ, नितीशकुमार, प्रमोद सावंत, भूपेंद्र पटेलांसह अनेक राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा यात समावेश आहे.