सोलापूरच्या अकलूज येथील पंतप्रधान नरेंद्र मोदींची नियोजित सभा रद्द करा, काँग्रेसची मागणी
निवडणूक आयोगाने काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या तक्रारीची अद्याप कोणतीही दखल घेतलेली नाही.
सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदींची पुढील सभा माढा मतदारसंघातील अकलूज 17 एप्रिल होणार आहे. भाजपकडून या सभेसाठी जोरदार तयारी सुरु आहे. मात्र नियमबाह्य असल्याने ही सभा रद्द करण्यात यावी, अशी तक्रार काँग्रेसने जिल्हाधिकारी आणि निवडणूक आयोगाकडे केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अकलूज मध्ये 17 एप्रिलाला सकाळी 9 वाजता जाहीर सभा होणार आहे. तर सोलापूर मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिलला मतदान होणार आहे आणि माढा मतदार संघात तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला मतदान होणार आहे. सोलापूर आणि मोदींच्या सभेचे स्थान असलेल्या अकलूजमध्ये 100 किमी पेक्षा कमी अंतर असल्याने नियमाप्रमाणे मतदानाच्या 24 तास आधी कोणतीच सभा घेता येत नाही, अशी तक्रार काँग्रेस कमिटीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांनी केली आहे.
निवडणूक आयोगाने प्रकाश पाटील यांच्या तक्रारीची अद्याप कोणतीही दखल घेतलेली नाही. मात्र याबाबतचा पाठपुरावा आपण करत असल्याचं काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांनी सांगितलं.