विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, भाजपकडून पहिला पलटवार; म्हणाले, महाराष्ट्रातले वातावरण...
Vinod Tawde in Virar : भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर बहुजन विकास आघाडीने पैसे वाटप केल्याचा गंभीर आरोप केलाय.
मुंबई : भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawde) यांच्यावर बहुजन विकास आघाडीने पैसे वाटपाचा गंभीर आरोप केलाय. विनोद तावडे विरारमधील एका हॉटेलात 5 कोटी रुपये घेऊन आले होते. ही बाब बविआच्या (BVA) कार्यकर्त्यांना समजल्यानंतर त्यांनी हॉटेलवर धाव घेतली. यानंतर हॉटेलमध्ये बविआ आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाला. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. आता यावर भाजप नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
प्रवीण दरेकर म्हणाले की, राष्ट्रीय सरचिटणीस एका विधानसभेमध्ये जाऊन पैसे वाटू शकतो, हा आरोप हास्यास्पद वाटतो. कालपासून निवडणूक आपल्या हातातून गेली हे महाविकास आघाडीचा वागण्यातून दिसून येत आहे. उद्याच्या होणाऱ्या निवडणुकीत आपला पराभव त्यांना स्पष्ट दिसत आहे. लोकसभा निवडणुकीत खोटा नरेटीव्ह सेट करून त्यांनी विजय मिळवला. आता या निवडणुकीत त्यांनी सभा आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून काही नरेटीव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला. पण ते अपयशी ठरले. आम्ही सत्ताधारी पक्ष म्हणून किंवा महायुती म्हणून त्यांचे सगळे नरेटीव्ह चुकीचे आहेत हे सांगण्यात यशस्वी ठरलो. विकासाच्या मुद्द्यावर केंद्र आणि राज्य सरकारने काय केले हे आम्ही जनतेला सांगितले. भविष्यात आमचं सरकार आल्यावर आम्ही काय करणार? महाराष्ट्राची प्रगती काशी होणार? हे देखील आम्ही सांगितले आहे.
हा केविलवाणा प्रयत्न
महाराष्ट्रात आम्ही आणलेल्या योजनांनी मतदारांना प्रभावित केले. त्यामुळे या योजनांना विरोधकांनी विरोध केला. देवेंद्रजींच्या सरकारच्या काळात सुरु केलेले प्रकल्प स्थगिती करण्याचे काम उद्धव ठाकरेंच्या सरकारने केले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने प्रगती केली. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात महायुतीचे सरकार आपल्याला हवे, असे आहे. त्यामुळे काल अनिल देशमुख यांच्या गाडीवर दगडफेक केली, तसाच आजचा प्रकार आहे. त्यांच्या पायाखालची वाळू घसरत आहे. त्यामुळे उरलेल्या एक-दोन दिवसात आपल्याला काही करता येत आहे का? महाराष्ट्रातले वातावरण संभ्रमित करून निवडणुकीच्या दृष्टीने वातावरण वळवता येते का? याचे प्रयत्न करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न असल्याचा पलटवार प्रवीण दरेकर यांनी केलाय.
इतर महत्त्वाच्या बातम्या