एक्स्प्लोर
बडनेरा मतदारसंघ | शिवसेना-भाजप युती रवी राणांच्या साम्राज्याला खिंडार पाडणार?
येणाऱ्या काही दिवसात बडनेरा मतदार संघात निवडणुकीचे वारे वाहायला लागतील, तसे अनेक नवे बदल समोर येण्याची चिन्हं आहेत. राणा यांच्या पराभवासाठी भाजप-सेना युती हीच महत्त्वाची ठरणार आहे.
अमरावती : एकेकाळी शिवसेनेचा गड असणारा बडनेरा मतदार संघ मागील 15 वर्षांपासून शिवसेनेपासून दूर गेला आहे. 2004 च्या निवडणुकीत शिवसेनेचे आमदार ज्ञानेश्वर धाने यांचा पराभव करुन राष्ट्रवादी-काँग्रेसच्या सुलभा खोडके विजयी झाल्या. बडनेरा मतदार संघावर आता बराच काळ खोडके यांचे साम्राज्य राहील, अशी सर्व परिस्थिती असताना 2009 च्या निवडणुकीती कोणतही राजकीय पर्शवभूमी नसणारे रवी राणा यांची राजकारणात एन्ट्री झाली आणि बडनेरा मतदार संघातील मतदारांनी रवी राणा यांना आपला लोकप्रतिनिधी म्हणून संधी दिली.
रवी राणा यांच्या लोकप्रियतेची जादू 2014 च्या विधानसभा निवडणुकीतही कायम राहिली. भाजप आणि शिवसेनेची युती असती तर कदाचित राणा 2014 मध्ये निवडून आले नसते, असा अनेकांचा अंदाज असला तरी अतिशय अटीतटीच्या लढ्यात अवघ्या 6 हजार मतांनी राणांनी बडनेरा मतदार संघात त्यांनी बाजी मारली.
राणा यांच्या विरोधात शिवसेनेचे दिवंगत संजय बंड, भाजपचे तुषार भारतीय आणि राष्ट्रवादी सोडून गत निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर मैदानात उतरलेल्या सुलभा खोडके यांचे तगडे आवाहन रवी राणा यांच्यासमोर होते. मतमोजणीच्या अखेरच्या क्षणापर्यंत संजय बंड आणि रवी राणा यांच्यात काट्याचा सामना असल्याचे पाहायला मिळाले. मात्र अखेरच्या क्षणाला रवी राणा यांचा विजय झाला.
खरंतर 2019 च्या निवडणुकीची परिस्थिती पूर्वीपेक्षा पूर्णतः भिन्न आहे. यावेळी भाजप आणि शिवसेनेची युती झाली आणि संजय बंड यांच्या पत्नी प्रीती बंड या युतीच्या उमेदवार असल्या तर रवी राणा यांना येणारी निवडणूक अजिबात सोपी नसणार. आता रवी राणा यांच्या पत्नी नवणीत राणा या अमरावतीच्या खासदार असल्याने त्यांचे वजन वाढले आहे. परंतु एकाच घरात खासदार आणि आमदार अनेकांना खटकटत आहेत.
यावेळी शिवसेनेतील सुनील खराटे, प्रशांत वानखडे अशा मंडळींनी आपल्या महत्त्वकांक्षा गुंडाळून प्रिती बंड यांना प्रामाणिक साथ दिली तर बडनेरा मतदार संघात परिवर्तन होण्याची शक्यता आहे. यावेळी सुलभा खोडके या बडनेराऐवजी अमरावतीतून निवडणूक लढविण्याची तयारी करीत असल्याने बडनेऱ्यात खोडके-राणा सामना यावेळी नसणार हे जवळपास निश्चित आहे.
भाजप-शिवसेनेची युती राणांसाठी अतिशय घातक ठरणारी आहे. बडनेरा मतदारसंघ अर्धा शहरी भागात मोडतो तर अर्धा ग्रामीण भागात येतो. ग्रामीण भाग आणि झोपडपट्टी परिसरात रवी राणा यांचे वर्चस्व असून बडनेरा मतदारसंघात मोठ्या प्रमाणत असणारा सिंधी समाज, हिंदी भाषिक आणि दलित हे राणा यांची ताकद आहेत.
यावेळी बसपाकडून नगरसेवक चेतन पवार हेसुद्धा बडनेरा मतदार संघात तयारी करीत असून काँग्रेसचे विलास इंगोले हे काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे तिकीट मिळविण्याच्या प्रयत्नात आहेत. एकूण बडनेरा मतदार संघात रवी राणा यांच्या विरोधात अनेक दिग्गज निवडणूक रिंगणात उतरणार असताना राणा यांच्या साम्राज्याला केवळ प्रीती बंड याच खिंडार पाडू शकणार आहेत, असे चित्र आहे.
लोकसभा निवडणुकीच्या निकालामुळे बडनेरा मतदार संघात आमदारकीचे स्वप्न पाहणारे अनेक शिवसैनिक थंडावले आहेत. आनंदराव अडसूळ यांनी बडनेरा मतदार संघातून उमेदवारी देण्याचे आमिष अनेकांना देऊन आपल्यासाठी प्रचार कामात गुंतवले. ज्ञानेश्वर धने, प्रशांत वानखडे, सुनील खराटे, प्रशांत जाधव अशा अनेकांना उमेदवारीची स्वप्न पडली. तर दुसरीकडे भाजपचे तुषार भारतीय, श्रीकांत राठी, शिवराय कुलकर्णी हेसुद्धा बडनेरा मतदार संघातून दंड थोपटण्यास सज्ज आहेत.
येणाऱ्या काही दिवसात बडनेरा मतदार संघात निवडणुकीचे वारे वाहायला लागतील, तसे अनेक नवे बदल समोर येण्याची चिन्हं आहेत. राणा यांच्या पराभवासाठी भाजप-सेना युती हीच महत्त्वाची ठरणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement