Amit Thackeray : राजसाहेबांच्या कुटुंबीयांचे पाय माहीमकरांच्या उंबऱ्याला लागल्याची भावना, लोकांच्या डोळ्यात पाणी; काय म्हणाले अमित ठाकरे?
Amit Thackeray : अमित ठाकरे यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये लोकांकडून मिळत असलेल्या प्रतिसादावर भाष्य केलं आहे.
Amit Thackeray : यंदाची विधानसभा निवडणूक (Maharashtra Assembly ) ही जितकी राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेची आहे, तितकीच ती नात्यांसाठीही महत्त्वाची झालीये. काका पुतण्या, भाऊ भाऊ अशा अनेक लढती यंदाच्याही निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. त्यातच हायवोल्टेज असणारी आणि संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेली माहिम मतदारसंघाची लढत ही यंदा ठाकरे घराण्यासाठी प्रतिष्ठेची झालीये. कारण राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) हे पहिल्यांदाच या मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.
अमित ठाकरेंची ही पहिलीच निवडणूक असल्यामुळे राज ठाकरेंसोबतच संपूर्ण ठाकरे कुटुंबिय प्रचारात व्यस्त आहे. अमित ठाकरेही माहिमचा मतदारसंघ पिंजून काढत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. नुकतच त्यांनी दिलेल्य एका मुलाखतीमध्ये त्यांनी लोकांकडून मिळत असलेल्या प्रतिसादावर भाष्य केलं आहे.
अमित ठाकरे काय म्हणाले?
अमित ठाकरे यांनी नुकतीच विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रिलस्टार अर्थव सुदामेला मुलाखत दिली. यावेळी लोकांमध्ये आता तुम्ही जाताय. तर लोकांचा प्रतिसाद कसा आहे, असा प्रश्न अमित ठाकरे यांना विचारण्यात आला. त्यावर अमित ठाकरे यांनी म्हटलं की, लोकांचा प्रतिसाद फार उत्तम आहे. डोळ्यात तुम्ही खोटं पाणी नाही काढू शकत. त्यामुळे लोकांच्या घरी गेल्यावरही राजसाहेबांच्या घरुन कुणीतरी आलंय. हे पाहूनच लोकांच्या डोळ्यात पाणी आलंय. फक्त आता या,तुमचे पाय फक्त घराला लागू द्या, अशा लोकांच्या भावना आहेत. ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी.ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये दुपारचं ऊन, तरीही प्रचार सुरु आहे. त्यामुळे कुठेतरी मी थकायला हवं होतं. पण जे घरी बोलावून माझं औक्षण केलं जातंय. मला खायला देतायत, प्यालला देतायत, कुठेतरी उर्जा देणारी ही गोष्ट आहे आणि मला हे खूप आवडतंय.
राजपुत्र मैदानात, आमदारकीची शर्यत जिंकणार?
अमित ठाकरे यांच्याविरोधात माहिम मतदारसंघात ठाकरे गटाकडून महेश सावंत आणि शिंदे गटाकडून सदा सरवणकर हे मैदानात उतरले आहेत. त्यामुळे माहिमच्या या मतदारसंघात तिहेरी लढत पाहायला मिळणार आहे. अमित ठाकरेंना उमेदवारी जाहीर झाल्यापासूनच महायुती आणि महाविकासआघाडीकडून उमेदवार दिला जाणार का? याची उत्सुकता होती. पण दोन्हीकडूनही उमेदवार मैदानात उतरवण्यात आले आहेत. त्यातच 2019च्या निवडणुकांमध्ये आदित्य ठाकरेंविरोधात माहिमच्या मतदारसंघातून राज ठाकरेंनी कोणताही उमेदवार दिला नव्हता. त्यामुळे उद्धव ठाकरेही अमित ठाकरेंविरोधात उमेदवार मैदानात उतरवणार का? असा प्रश्न होता. मात्र उद्धव ठाकरेंनी एकनिष्ठ राहिलेल्या महेश सावंतांना माहिममधून उतरवलं आणि पुन्हा एकदा मनसेकडून टीकेचं सत्र सुरु झालं. पण असं असलं तरीही माहीम मतदारसंघात उद्धव ठाकरे कोणतीही सभा घेणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
ही बातमी वाचा :
10 कोटींची संपत्ती, तरीही राम शिंदेंनी प्रचारासाठी जनतेकडे मागितले पैसे, रोहित पवार म्हणाले...