(Source: ECI/ABP News/ABP Majha)
राज्यातील बोगस विद्यार्थी होणार उघड, परभणीत आढळले 14 हजार बोगस विद्यार्थी
परभणी जिल्ह्यात हे काम पूर्ण झाले असून जिल्ह्यात तब्बल 14, 694 विद्यार्थी बोगस आढळले आहेत.एकाच विद्यार्थ्यांचे नाव दोन दोन शाळांमध्ये किंवा वर्गांमध्ये नोंदवल्याचे उघड झाले आहे.
परभणी : राज्याच्या शिक्षण विभागाकडून तब्बल सात वर्षांनंतर पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांची आधारनुसार पडताळणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. ज्यामुळे राज्यभरात लाखो बोगस विद्यार्थी उघड होण्याची शक्यता आहे.या पडताळणीत एकट्या परभणी जिल्ह्यात तब्बल 14, 694 विद्यार्थी बोगस आढळले आहेत ज्यामुळे सर्वत्र अतिरिक्त शिक्षकांची संख्या वाढणार आहे.
राज्याच्या शिक्षण विभागाने पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या पटसंख्येतील उपस्थितीनुसार नोंद असलेल्या विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक सरल प्रणालीअंतर्गत स्टुईट पोर्टलमध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला. ही नोंद झाल्यानंतरच सर्व शाळांना संच मान्यता देण्यात येणार आहे.त्यामुळे राज्याच्या सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील पहिली ते बारावी विद्यार्थ्यांची आधार पडताळणी सुरू आहे.
परभणी जिल्ह्यात हे काम पूर्ण झाले असून जिल्ह्यात तब्बल 14, 694 विद्यार्थी बोगस आढळले आहेत.एकाच विद्यार्थ्यांचे नाव दोन दोन शाळांमध्ये किंवा वर्गांमध्ये नोंदवल्याचे उघड झाले आहे. ज्यामुळे शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे यांनी जिल्ह्यातील मुख्याध्यपकांची बैठक घेतली असून येत्या 15 दिवसात हे बोगस 14 हजार विद्यार्थी डिलीट केले जाणार आहेत. 30 विद्यार्थ्यांच्या मागे १ शिक्षक या शासन नियमाचा विचार केला तर एकट्या परभणी जिल्ह्यात उघड झालेल्या 14, 694 बोगस विद्यार्थ्यांमागे तब्बल 490 अतिरिक्त शिक्षक ठरणार आहेत.त्यामुळे या अतिरिक्त शिक्षणाच्या समायोजनाचा विषय समोर येऊ शकतो.
परभणी जिल्ह्यातील तालुकानिहाय बोगस विद्यार्थी संख्या
- परभणी शहर-5811
- परभणी ग्रामीण-900
- पालम-763
- गंगाखेड- 1140
- पाथरी-752
- मानवत- 581
- सेलु- 735
- पुर्णा-1451
- जिंतूर-1111
- सोनपेठ-1450
अशी होते विद्यार्थ्यांची पडताळणी
21 सप्टेंबर रोजी राज्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी सर्व शिक्षणाधिकाऱ्यांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेऊन सर्व जिल्ह्यासाठी याबाबतची माहिती असलेली एक्सेल शीट देण्यात आली. त्यानुसार ज्या शाळेत,वर्गात एकाच नावाचे दोन विद्यार्थी आहेत त्यांचे आधार कार्ड चेक करून त्याची पडताळणी करण्यात येते. शिवाय हे विद्यार्थी नेमके कोणत्या शाळेत,कोणत्या वर्गात शिकत आहेत याची शिक्षण विभागाच्या पथकामार्फत तपासणी केली गेली आणि ज्या अतिरिक्त वर्गात या विद्यार्थ्यांची नोंद केली गेली. ती दुबार नोंदणी जनरल रजिस्टर आणि स्टुडंट पोर्टलमधून रद्द करण्यात येणार आहेत. परभणी जिल्ह्यात अशा 14,694 विद्यार्थ्यांची दुबार नोंदणी रद्द करण्यात येणार आहेत..
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI