HSC Result : बारावीचा निकाल रखडणार? कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा बारावी उत्तर पत्रिका तपासणीवर बहिष्कार
HSC Result : शिक्षकांच्या आंदोलनामुळे यंदा बारावीचे निकाल रखडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
HSC Result : राज्यात महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाच्या (Maharashtra Board) बारावीच्या परीक्षा (HSC Examination) सुरू झाल्या आहेत. आता, या परीक्षेचे निकाल रखडणार असल्याची भीती शैक्षणिक वर्तुळात व्यक्त केली जात आहे. राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी आंदोलन पुकारले आहे. त्यांनी बारावीच्या परिक्षेतील उत्तरपत्रिका तपासण्यास नकार दिला आहे. त्यामुळे या उत्तरपत्रिकांचे गठ्ठे तसेच पडून आहेत. कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे आंदोलन चिघळल्यास त्याचा थेट परिणाम बारावीच्या निकालावर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर, बोर्डाने निकाल वेळेवर जाहीर होतील असे म्हटले आहे.
राज्यात 21 फेब्रुवारीपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे. परीक्षा पार पडली की लगेच आदर्श उत्तरपत्रिका तयार करुन उत्तरपत्रिका तपासण्यास सुरुवात होते. साधारणपणे मे महिन्याच्या अखेरीस अथवा जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात बारावीचा निकाल लागतो. यावर्षी 14 लाख 75 हजार विद्यार्थी बारावीची परीक्षा देत आहेत. मात्र, आतापर्यंत ज्या विषयांची परीक्षा झाली आहे, त्या विषयांच्या उत्तरपत्रिका तपासण्यास सुरुवात झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. या उत्तरपत्रिका महाविद्यालयात तपासण्यासाठी पोहचल्या आहेत. मात्र, शिक्षकांकडून त्या तपासण्यास नकार देण्यात आला आहे. काही उत्तरपत्रिका बोर्डाच्या कार्यालयात असून काही पोस्ट ऑफीसमधे पडून आहेत.
बारावी परीक्षा सुरु झालीय आणि विद्यार्थी पेपर देत आहेत. पण त्यांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी करायला कुणीच नाही. महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघासोबत झालेल्या शिक्षणमंत्र्यांच्या बैठकीत त्यांच्या मागण्यांसंदर्भात योग्य तो निर्णय घेतला जाईल असं आश्वासन दिलं होतं. मात्र, बैठकीचे इतिवृत्त महासंघाला अजून मिळालेले नाही. त्यांच्या मागण्या प्रलंबित आहेत, त्यामुळे इतिवृत्त मिळाल्यानंतरच महासंघाच्या कार्यकारिणीची बैठक होईल आणि आंदोलनाबाबतचा पुढील निर्णय घेण्यात येईल असं सांगण्यात येत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक त्यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात म्हणून लढतायत. अनेकदा निवेदन देऊन, आंदोलन करूनही त्यांना सरकारकडून प्रतिसाद न मिळाल्याने शिक्षकांनी पेपर तपासणीवर परीक्षा सुरु होण्याचा काही काळ आधी बहिष्कार टाकला. परिक्षा पार पडली की लगेच आदर्श उत्तरपत्रिका तयार करुन उत्तरपत्रिका तपासण्यास सुरुवात होते मात्र नियामकांची बैठक होत नसल्याने उत्तरपत्रिकांचे पाकिटे पडून आहेत
आधीच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा संप, त्यात शिक्षकांचे आंदोलन
बारावीची परीक्षा सुरु झाली आणि पहिल्याच दिवशी इंग्रजीच्या पेपरमध्ये गोंधळ असल्याचं समोर आले. त्याचदरम्यान शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी संप केल्यामुळे परीक्षेच्या आयोजनाचा भार शिक्षकांवर पडला आहे. काही ठिकाणी बारावी प्रात्यक्षिक परीक्षांवर त्याचा परिणाम झाल्याची माहिती आहे. आता बारावीच्या शिक्षकांनी पेपर तपासण्यास नकार दिल्याने बारावी निकाल जाहीर होण्यास उशीर होऊ शकतो. सरकारने जर आमच्या मागण्या मान्य केल्या तर आम्ही उत्तरपत्रिका तपासण्यास लगेच सुरुवात करु असं शिक्षकांनी म्हटले आहे.
निकाल वेळेवर जाहीर होतील; बोर्डाचे आश्वासन
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी निकाल वेळेवर जाहीर होतील असे स्पष्ट केले आहे. कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकांनी पेपर तपासण्यावर बहिष्कार टाकला आहे ही बाब खरी असल्याचे त्यांनी म्हटले. बारावी परीक्षा सुरू होण्यापूर्वी कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांनी त्यांच्या दीर्घकाळापासून असलेल्या मागण्या पूर्ण व्हाव्यात म्हणून बहिष्कार टाकला होता. शिक्षण मंत्र्यांनी त्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला होता. आजारी असून देखील त्यांनी दोन तास वेळ देऊन बैठक घेतली होती. अजूनही त्यांची प्रकृती बरी नसल्याने इतिवृत्त देण्यात वेळ लागला आहे. पण पुढील एक-दोन दिवसात इतिवृत्त येईल आणि उत्तर पत्रिका तपासणीला सुरुवात होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI