HSC Exam : बारावी अंतर्गत मुल्यमापन प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर; 23 जुलैपर्यंत निकाल तयार करण्याच्या शिक्षकांना सूचना
बारावी अंतर्गत मुल्यमापन प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलं असून शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली.
मुंबई : एकीकडे शिक्षकांचे दहावीचे अंतर्गत मूल्यमापनाचे काम पूर्ण होत असताना आता बारावीची परीक्षा रद्द झाल्यानंतर बारावी विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापनाचे काम सुरु होत आहे. याबाबतचे सविस्तर वेळापत्रक शिक्षण विभागाने जाहीर केले आहे. शिवाय या अंतर्गत मूल्यमापन कसे करावे? याबाबतच्या सूचना सुद्धा परिपत्रक काढून जाहीर केल्या आहेत. अंतर्गत मूल्यमापनाचे काम शिक्षकांना 7 जुलैपासून सुरु करायचे असून 23 जुलैपर्यंत शाळा, कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावर विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापनाचे काम पूर्ण करून निकाल तयार करून मंडळाकडे पाठवायचे आहेत.
बारावीची परीक्षा रद्द झाल्यानंतर बारावीचे निकाल जाहीर करताना दहावी, अकरावी आणि बारावी या तिन्ही वर्गाचे गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. त्यासाठी 30 :30 :40 असा निकष राज्य मंडळाने जाहीर केला आहे. यामध्ये इयत्ता दहावीच्या परीक्षेतील सर्वाधिक गुण मिळालेल्या 3 विषयांचे सरासरी गुण (30%),अकरावीच्या वार्षिक मूल्यमापनातील विषयनिहाय गुण (30%) आणि इयत्ता बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनातील प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा ,सराव चाचण्या, तत्सम मूल्यमापन गुण (40%) अशा प्रकारचे गुण एकत्र करून बारावीचे निकाल जाहीर केले जातील.
बारावी अंतर्गत मूल्यमापनाचे वेळापत्रक :
- मुख्याध्यापक, प्राचार्य आणि शिक्षक यांच्यासाठी मूल्यमापन कार्यपद्धती बाबत मंडळाच्या यूट्यूब चॅनलवर 7 जुलै रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 च्या दरम्यान ऑनलाईन प्रशिक्षण दिले जाणार आहे.
- सोबतच अपवादात्मक परिस्थितीत कोणत्याही प्रकारचे मूल्यमापन न झालेल्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करणे, विषय शिक्षकांनी गुण तक्ते वर्ग शिक्षकांकडे सादर करणे, वर्ग शिक्षकांनी संकलित निकाल अंतिम करून तो उच्च माध्यमिक शाळा ,कनिष्ठ महाविद्यालयाच्या निकाल समितीकडे सादर करणे हे काम 7 जुलै ते 14 जुलै दरम्यान शिक्षकांना करायचे आहेत
- मुख्याध्यापक, प्राचार्यांनी निकाल समितीने प्रमाणित केलेल्या निकालानुसार विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण मंडळाच्या संगणकीय प्रणाली मध्ये भरण्यासाठी 14 जुलै ते 21 जुलै दरम्यान वेळ देण्यात आला आहे
- त्यासोबतच समितीने प्रमाणित केलेले विद्यार्थ्यांचे निकाल सीलबंद पाकिटात विभागीय मंडळात 21 जुलै ते 23 जुलै दरम्यान जमा करायचे आहेत
- त्यानंतर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच बारावी परीक्षेचा निकाल विभागीय मंडळ व राज्य मंडळ स्तरावर पुढील प्रक्रिया केली जाणार असून लवकरात लवकर निकाल कसा जाहीर होईल त्यासाठी 23 जुलैपासून बोर्ड निकाल प्रक्रियेवर काम करेल. 31 जुलै पर्यत सर्व राज्यांनी बारावी बोर्डाचे निकाल जाहीर करावे असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले असताना हे काम शिक्षण विभाग वेळेत कसे पूर्ण करते ? हे पहावं लागेल.
"मंडळाकडून निकाल वेळेवर जाहीर करण्याकरिता सर्व उच्च माध्यमिक शाळांनी / कनिष्ठ महाविद्यालयांनी वेळापत्रकाचे काटेकोरपणे पालन करावे. निष्पक्ष आणि वस्तुनिष्ठ मूल्यांकन करण्यासाठी सर्व संबंधित घटकांनी सर्व प्रक्रियांचे काळजीपूर्वक वाचन करणे आणि त्या सुनिश्चित करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या स्पष्ट करणे देखील गरजेचे आहे. हे काम आव्हानात्मक आहे; पण मला खात्री आहे की, आमचे शिक्षक ही संपूर्ण प्रक्रिया उच्च गुणवत्तेसह उच्च दर्जा राखत पार पाडतील", अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करून दिली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- अतिक्रमण करणाऱ्यांना फुकटात घरं देणारं मुंबई एकमेव शहर : हायकोर्ट
- 'त्या' एका तासात विधानसभेत काय घडलं?, भाजपच्या 12 आमदारांवरील निलंबनाच्या कारवाईची ‘टाईमलाईन’
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI