Goa News : लग्नाआधी 'जीवाचा गोवा' करणे प्राणावर बेतले; दोन सख्ख्या भावांचा समुद्रात बुडून मृत्यू
Goa Crime News : लग्न ठरल्यानंतर बॅचलर पार्टीसाठी मित्रांसह आलेले दोन भाऊ समुद्रात बुडाल्याची घटना घडली.
हरमल, गोवा : लग्नाआधीच्या बॅचलर पार्टीसाठी गोव्यात आलेल्या दोन सख्खा भावांना प्राण गमवावे लागले असल्याची दुर्देवी घटना घडली आहे.. गोव्यातील हरमल येथील समुद्र किनाऱ्याजवळ ही दुर्देवी घटना घडली आहे. दोन्ही मृत भाऊ हे जम्मू-काश्मीरमधील असल्याची माहिती आहे. अमन आणि अभिषेक अशी मृतांची नावे आहेत.
गोव्यातील हरमल येथील ‘स्वीट लेक’जवळ समुद्रात दोघेजण बुडल्याची माहिती पेडणे अग्निशामक दलाला मिळाली. त्यानुसार अग्निशामक दलाचे जवान आणि पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी लगेच शोध सुरू करून दोघांचे मृतदेह बाहेर काढले.
जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशचे चार पर्यटक रविवारी गोव्यात आले होते. यातील अभिषेक याचे लग्न ठरले होते. त्याच्या लग्नाआधीच्या पार्टीसाठी हे मित्र गोव्यात आले होते. ते कळंगुटमध्ये उतरले होते. मात्र समुद्रात आंघोळीसाठी हे दोघे भाऊ उतरले. तेथेच अभिषेक आणि अमन हे दोन्ही भाऊ समुद्रात बुडाले. त्यांना बुडताना पाहून इतरांच्या हृदयाचे ठोके चुकले. त्यांनी लगेच पोलीस आणि अग्निशामक दलाला माहिती दिली.
ही माहिती मिळताच बचावपथक तत्काळ घटनास्थळी पोहोचून शोध जारी केला. साधारण दोन तास शोधकार्य करून दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. पोलिसांनी पंचनामा केला असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला आहे. पुढील तपास गोवा पोलीस करत आहेत.
पोहायला गेले आणि घात झाला, भिवंडीत पाण्यात बुडून चिमुरड्यांचा मृत्यू
मित्रांसोबत पाण्यात पोहायला गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना भिवंडीत घडली आहे. मयत मुलांमध्ये एक सात वर्षांचा मुलगा तर एक बारा वर्षांच्या मुलीचा समावेश आहे. याप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून तालुका पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. वसीम मलिक (वय 7 वर्षे) रा. फातिमा नगर आणि अंजुम फत्ते मो. रफिक (वय 12 वर्ष) रा.धामणगाव धापशी पाडा असे मयत मुलांची नावं आहेत.
वसीम हा तालुक्यातील वडपा धामणगाव धापशीपाडा येथे आपल्या नातेवाईकांकडे गेला होता. यावेळी हा मुलगा आपली नातेवाईक असलेली बारा वर्षांची मुलगी अंजुम आणि इतर दोन साथीदारांसह वडपा धामणगाव येथे साचलेल्या ओव्हळाच्या पाण्यात पोहायला गेले होते. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडाले.