Suresh Dhas Son Car Accident: सुरेश धस यांच्या पुत्राने दुचाकीस्वाराला उडवले, एकाचा मृत्यू; जातेगाव फाट्यावर नेमकं काय घडलं?
Suresh Dhas Son Car Accident: नगर-पुणे रस्ता ओलांडताना, भरधाव वेगातील धस यांच्या कारची शेळके यांच्या दुचाकीस जोरदार धडक बसली. त्यात कारखाली चिरडल्याने नितीन यांचा जागीच मृत्यू झाला.

Suresh Dhas Son Car Accident: पुणे महामार्गावर जातेगाव फाटा शिवारात आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांच्या मुलाच्या (सागर धस) कारची धडक बसून, दुचाकीवरील हॉटेल व्यावसायिकाचा मृत्यू झाला. सोमवारी (7 जुलै) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. नितीन प्रकाश शेळके (34, रा. पळवे खुर्द, ता. पारनेर) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे.
सुरेश धस यांचा मुलगा सागर धस (Sagar Dhas) सोमवारी (7 जुलै) रात्री पुण्याहून नगरकडे आपल्या आलिशान कारने (एमएच 23, 2929) येत होता. नितीन शेळके यांचे जातेगाव फाट्यावर हॉटेल सह्याद्री असून हॉटेलवरून रात्री साडेदहाच्या सुमारास दुचाकीवर (एमएच 16 डीजे 3765) ते पळवे खुर्द येथील घरी जात होते.
नेमकं काय घडलं?
नगर-पुणे रस्ता ओलांडताना, भरधाव वेगातील धस यांच्या कारची शेळके यांच्या दुचाकीस जोरदार धडक बसली. त्यात कारखाली चिरडल्याने नितीन यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, नितीन यांचा चुलतभाऊ स्वप्निल पोपट शेळके हे जोशी वडेवाले यांच्या दुकानाजवळ नितीन यांची वाट पाहत होते. अपघाताची माहिती मिळताच, ते घटनास्थळी पोहोचले असता, नितीन गंभीर जखमी अवस्थेत आढळून आले. त्यांनी तात्काळ जखमी नितीन यांना रस्त्याच्या बाजूला घेतले. चुलतभाऊ अमोल शेळके, सतीश शेळके, नीलेश शेळके यांच्याशी संपर्क करून अपघाताची माहिती दिली. घटनास्थळी सर्वजण आल्यानंतर त्यांनी जखमी नितीन यांना सुपा येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. नितीन यांचा मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी पारनेर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. उत्तरिय तपासणीनंतर मंगळवारी (८ जुलै) दुपारी एक वाजेच्या सुमारास नितीन यांच्यावर गावी पळवे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
पोलिसांच्या फिर्यादीत काय म्हटलंय?
दि. 08/07/2025 मी स्वप्नील पोपट शेळके वय 29 वर्ष धंदा-शेती व्यवसाय रा. जातेगाव फाटा पळवे खु।। ता. पारनेर जि. अहिल्यानगर, समक्ष पोलीस ठाण्यात हजर राहुन फिर्याद लिहुन देतो की, मी वरील ठिकाणी आई अलका, भाऊ रामदास असे एकत्र राहतो व शेती व्यवसाय करुन कुटुंबाची उपजीवीका चालवितो. माझा चुलत भाऊ नितीन प्रकाश शेळके याचे हॉटेल सह्याद्री हे पुणे नगर जाणारे हायवे रोडवर पळवे शिवारात आहे व तो ते चालवितो.दि.07/07/2025 रोजी रात्री 10/30 वा.चे सुमारास मी जातेगाव फाटा ता. पारनेर जि. अहिल्यानगर येथे हॉटेल जोशी वडेवाले समोर माझा चुलत भाऊ नितीन याची कामानिम्मीत वाट पाहत असताना माझा चुलत भाऊ नितीन त्याचे हिरो कंपनीच्या स्पेडर मोटार सायकल नं. MH 16DJ 3765 हिचेवरुन जातेगाव फाटा येथे नगर पुणे रोड क्रॉस करत असताना अहिल्यानगर ते पुणे जाणाऱ्या रोडवर अहिल्यानगरकडुन येणाऱ्या एम.जी. कंपनीची ग्लोस्टर गाडी - क्र.MH 23 BG2929 या वरील चालकाने भरधाव वेगाने माझ्या भावाच्या हिरो कंपनीच्या स्पेडर मोटार सायकल नं. MH 16DJ 3765 च्या डावे बाजुला जोराची धडक देवुन अपघात केला होता. त्यानंतर मी व तेथील इतर जमा झालेल्या लोकांच्या मदतीने गाडी व चुलत भावाला नितीन प्रकाश शेळके याला रोडच्या बाजुला घेवुन मी माझा चुलत भाऊ अमोल अशोक शेळके, सतिष प्रकाश शेळके व निलेश अशोक शेळके यांना फोन करुन सदर अपघाता बाबत मी त्यांना कळविले व निलेश याने स्वताहाची चारचाकी गाडी घेवुन आला व आम्ही त्याला घेवुन निरामय हॉस्पीटल सुपा येथे उपचाराकामी घेवुन आलो असता तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी त्याला तपासुन तो औषधउपचारापुर्वीच मयत झाले बाबत सांगितले त्यानंतर आम्ही सदर अपघाताबाबत सुपा पोलीस स्टेशनला आलो असता मला आमचे नातेवाईक प्रसाद भास्कर तरटे रा. पळवे खु॥ ता. पारनेर जि. अहिल्यानगर यांनी अपघात करणारे 1) सागर सुरेश धस रा. आष्टी ता. आष्टी जि.बिड 2) सचिन दादासाहेब कोकणे रा. तवलेवाडी ता. आष्टी जि.बिड असे एम.जी. कंपनीची ग्लोस्टर गाडी - क्र.MH 23 BG2929 यांनी केला आहे असे समजले. त्यानंतर सुपा पोस्टेला निरामय हॉस्पिटल येथुन अपघात झालेबाबत खबर देण्यात आली त्यावरुन सुपा पोलीस स्टेशन येथे आमृ 44/2025 BNSS कलम 194 प्रमाणे दि.08/07/2025 रोजी 01/04 वा. दाखल करुन पोलीस अंमलदार यांनी माझे चुलत भावाच्या प्रेतावर पंचनामा करुन पारनेर ग्रामीण रुग्णालय येथे पोस्टमार्टम करुन दि.08/07/2025 रोजी 11/00वा. चे सुमारास प्रेत अंतविधीसाठी आमचे ताब्यात देण्यात आले आहे. अंतविधी केल्यानंतर मी समक्ष पोलीस स्टेशन येथे हजर होवुन माझ्या भावाचा भरधाव वेगाने व रस्त्याच्या परिस्थितीचा विचार न करता गाडी चालवुन माझ्या भावाचा अपघात करुन त्याच्या मृत्युस व दोन्हीही वाहनांच्या नुकसाणीस कारणीभुत होणाऱ्या एम. जी. कंपनीची ग्लोस्टर गाडी क्र.MH 23 BG2929 या गाडीवरील चालक 1) सागर सुरेश धस रा. आष्टी ता. आष्टी जि.बिड यांचे विरुद्ध माझी फिर्याद आहे.माझी संगणकावरील टंकलिखीत केलेली फिर्याद मी वाचुन पाहिली ती माझे सांगणेप्रमाणे बरोबर आहे.
सुरेश धस यांच्या मुलाच्या गाडीने नितिन शेळकेंचा मृत्यू, VIDEO:
संबंधित बातमी:
मोठी बातमी : सुरेश धस यांच्या मुलाच्या कारची धडक, दुचाकीस्वाराचा मृत्यू, सागर धसांवर गुन्हा दाखल!























