Shraddha Murder Case : श्रद्धाचं डोकं अद्यापही सापडलं नाही, आफताबच्या मित्रांचा शोध सुरु; पोलिसांच्या तपासाला वेग
Shraddha Murder Case : श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे केल्यानंतर आफताबने सोडियम हायपो क्लोराईडने संपूर्ण घर धुतलं. पोलिसांना कोणताही पुरावा सापडू नये म्हणून त्यानं असं केलं.
Delhi Murder Case : दिल्लीतील ( Delhi ) ह्रदय पिळवटून टाकणाऱ्या श्रद्धा हत्याकांडामुळे ( Shraddha Murder Case ) संपूर्ण देश हादरला आहे. आरोपी आफताबने प्रेयसी श्रद्धाची हत्या करून क्रूरपणे तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले. श्रद्धाचं डोकं अद्यापही सापडलेलं नाही. श्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताबने आपणच हत्या केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. पोलिसांनी आरोपी आफताबला पाच दिवसांची कोठडी सुनावली आहे. पोलिसांच्या चौकशीदरम्यान आफताब सतत इंग्रजीत बोलत होता.
मृतदेहाचे तब्बल 35 तुकडे
दिल्लीतील मेहरौली भागात श्रद्धा वालकर नावाची तरुणी आफताब या तरुणासोबत लिव्ह-इनमध्ये राहत होती. दोघांमध्ये काही कारणावरून भांडण झालं आणि आफताबनं श्रद्धाची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर श्रद्धाच्या शरीराचे तब्बल 35 तुकडे करुन ते घरातच फ्रिजमध्ये ठेवले. काही दिवसांपासून आफताब मृतदेहाच्या तुकड्यांची विल्हेवाट लावत होता. त्याने वेगवेगळ्या ठिकाणी हे तुकडे फेकले.
आफताबच्या सोशल मीडियाचा पोलिसांकडून तपास
दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस आफताबच्या इतर मित्रांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. याशिवाय पोलीस आफताबचे सोशल मीडिया अकाउंट स्कॅन करून अधिक माहिती गोळा करत आहेत. श्रद्धासोबत प्रेमसंबंध ठेवण्यापूर्वी आफताबचे कोणत्या मुलींशी संबंध होते का याचीही माहिती पोलीस गोळा करत आहेत. श्रद्धा आणि आफताबच्या मित्रांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.
आफताबचे शूज तपासणीसाठी पाठवले
हत्या झाली त्याआधी आफताब आणि श्रद्धाने घातलेल्या कपड्यांचा पोलिसांकडून शोध घेत आहेत. यासोबतच पोलीस आफताबला घेऊन जंगलात जाणार आहेत, जिथे त्याने मृतदेहाचे तुकडे फेकले होते. पोलिसांनी आफताबच्या घरातील सर्व शूज आणि चप्पल ताब्यात घेतले आहेत. शूज आणि चप्पल एफएसएल तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. चपलांवरील माती आणि जंगलातील माती यांची चाचणी केली जाईल, यावरून आफताब जंगलात गेला होता, हे सिद्ध होईल.
श्रद्धाचं डोकं अद्यापही सापडलं नाही
श्रद्धा हत्याकांड प्रकरणात एबीपी न्यूजच्या सूत्रांकडून मोठी माहिती समोर आली आहे. दिल्ली पोलिसांना अद्याप श्रद्धाच्या मृतदेहाचं डोकं सापडलेलं नाही. पोलिसांचे पथक श्रद्घाचं डोकं शोधत आहेत. श्रद्धा खून प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांना महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत. मेहरौलीच्या जंगलातून श्रद्धाच्या मृतदेहाची काही हाडे सापडली आहेत. आफताबने श्रद्धाचे तुकडे करून येथे फेकल्याचा आरोप आहे. आफताबने श्रद्धाच्या शरीराचे तुकडे केले आणि श्रद्धाचे रक्ताने माखलेले कपडे डस्टबिनमध्ये फेकले होते. हे कपडे अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.