Sangli Crime : सांगली जिल्ह्यात हत्यांची मालिका; एका आठवड्यात 5 हत्यांच्या घटनांनी खळबळ
Sangli Crime News : सांगली जिल्ह्यात गेल्या आठ दिवसात हत्येची मालिका सुरु असल्याचं पाहायला मिळालं आहे.
Sangli Crime News : सांगली जिल्ह्यात गेल्या आठ दिवसात हत्येची मालिका सुरु असल्याचं पाहायला मिळालं आहे. यातील काही हत्या अगदी किरकोळ कारणातून झाल्याचं समोर आलं आहे तर काही पूर्ववैमनस्यातून होत आहेत. मागील आठवड्यात सांगली शहरात 2 हत्या हे किरकोळ कारणातून झाल्या. तर दोन दिवसांपूर्वी वाळवा तालुक्यात एकाच दिवशी वेगवेगळ्या घटनेत दोन हत्येच्या घटना घडल्या. काल कवठेमहांकाळ तालुक्यातील विठुरायाचीवाडी येथील तरुणाचा वैयक्तिक कारणातून हत्या झाल्या आहेत.
25 मे रोजी सांगलीतील संजयनगर येथील रेकाॅर्डवरील गुंड तुकाराम सुभाष मोटे (27) याची चाकूने भोसकून हत्या झाली. पाठोपाठ 29 मे रोजी सांगलीत बुर्जी चालकाचा निर्घृण खून करत त्याच्या गाडीचीही तुफान तोडफोड करण्यात आली. तर 1 जून रोजी वाळवा तालुक्यात एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या घटनेत दोघांच्या हत्या झाल्यात. एका घटनेत व्यसनाधीन वडिलांच्या सततच्या त्रासामुळे मुलानेच वडिलांचा कोयत्याने भर चौकात खून केला तर दुसऱ्या घटनेत युवकाचा दारू पिऊन शिव्या दिल्याच्या कारणावरून खून झाला.
आता कवठेमहाकाळ तालुक्यातील विठुरायाचीवाडी येथील तरुणाचा वैयक्तिक कारणातून तीक्ष्ण हत्याराने भोसकून, डोक्यात दगड घालून खून करण्यात आलाय. बन्नाप्पा बाळू म्हारनूर वय.21 (रा. विठुरायाचीवाडी) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी कवठेमहांकाळ पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले असून, हा खून वैयक्तिक कारणातून झाला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्याच्या मृतदेहाजवळ एक गुलाबाचे फूलही आढळून आले आहे.
कवठेमहांकाळ -जत रस्त्यालगत असणार्या हॉटेल श्रीकांतच्या पाठीमागे विठुरायाचीवाडी रस्त्यावर बंद शेडजवळ हा प्रकार घडला असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. घटनास्थळी बन्नाप्पा यांच्या मृतदेहाशेजारी हत्येसाठी वापरलेला मोठा दगड, मोटरसायकल मिळून आली आहे. बन्नाप्पा यांचा खून वैयक्तिक कारणातून झाला असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून, कवठेमहांकाळ पोलिसांनी अवघ्या काही तासात दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे, त्यांची चौकशी करण्याचे काम सुरु आहे. घटनास्थळी कवठेमहांकाळ जतचे उपविभागीय पोलिस अधिकारी रत्नाकर नवले पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.