(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अत्याचार करून विद्यार्थीनीची दगडाने ठेचून हत्या, मोलमजुरी करून चालवत होती कुटुंबाचा उदरनिर्वाह
Palghar News Update : मागील काही दिवसांपासून विद्यार्थिनी बेपत्ता होती. या तरुणीचा मृतदेह काल जव्हारमधील तांबडपाडा येथे आढळून आला असून तिच्यावर अत्याचार करून दगडाने ठेचून तिची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.
Palghar News Update : दहावीची परीक्षा दिलेल्या 16 वर्षीय विद्यार्थ्यांनीवर अत्याचार करून दगडाने ठेचून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना पालघर मधील जव्हार येथे घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. नुकताच दहावीचा निकाल लागला असून निकालाआधी या विद्यार्थीनीची हत्या करण्यात आली आहे. आज तिचा मृतदेह सापडल्यानंतर ही धक्कादायक घटना समोर आली आहे.
जव्हार तालुक्यातील वडपाडा येथील ही हृदय हेलावणारी घटना घडली असून मागील काही दिवसांपासून ही विद्यार्थिनी बेपत्ता होती. या तरुणीचा मृतदेह काल जव्हारमधील तांबडपाडा येथे आढळून आला होता. तिच्यावर अत्याचार करून दगडाने ठेचून तिची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या मुलीवर बलात्कार झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत असून शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर हत्येच्या तपासाला वेग येईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
मोलमजुरी करून चालवत होती कुटुंबाचा उदरनिर्वाह
मृत विद्यार्थिनी ही मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होती. मोलमजुरी करत करत तिने दहावीच्या परीक्षेचा अभ्यास केला होता. नुकत्याच जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात या विद्यार्थीनीला 67 टक्के गुण मिळाले आहेत. मात्र, निकाल बघण्याआधीच तिची निर्घृण हत्या करण्यात आली.
या घटनेबाबत भादवि कलम 302 , 301 , 341, तसेच पोस्को अंतर्गत जव्हार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत आहेत. जव्हार पोलीस ठाण्याचे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
दरम्यान, हे प्रकरण न्यायालयात फास्टट्रॅक पद्धतीने चालवून दोषी आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे. या घटनेबाबत परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या