Palghar Crime News : लाच म्हणून घेतला दारुचा खंबा! वनविभागाच्या दोन कर्मचाऱ्यांना अटक
Palghar Crime News : पालघरमध्ये लाच म्हणून दारूचा खंबा मागणाऱ्या वन विभागाच्या दोन कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.
Palghar Crime News : सरकारी कामात लाच म्हणून अनेकदा रोख रक्कमेची मागणी केली जाते. काही वेळेस रोख रक्कमेसोबत भेट वस्तूदेखील मागितली जाते. पालघरमध्ये लाच म्हणून रोख रक्कमेसोबत दारूचा खंबा मागणाऱ्या वनविभागाच्या दोन कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. विजय लक्ष्मण धुरी आणि विष्णू पोपट सांगळे असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पालघर लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.
एका बांधकाम व्यवसायिकाकडे मॅनेजर म्हणून काम करत असलेल्या व्यक्तीचे एक प्रकरण वनविभाग वाडा येथे एनए करिता 'ना हरकत' दाखला मिळण्याबाबत काम प्रलंबित होते. यासाठी पंचनामा झाला नव्हता. पंचनामा करण्यासाठी या आरोपींनी दहा हजार रुपये रोख आणि दारूचा खंबा लाच म्हणून मागितला होता. दारूचा खंबा तात्काळ स्वरुपात द्यावा, असेही आरोपींनी तक्रारदाराकडे मागणी केली. तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे धाव घेत याबाबत माहिती दिली. त्यानंतर लाचलुचपत अधिकाऱ्यांनी सापळा रचला. त्यावेळी आरोपी लक्ष्मण धुरी यांनी वाडा येथील वनविभागाच्या शासकीय कार्यालयात एक दारुचा खंबा स्विकारताना रंगेहात पकडले. लाचलुचपत अधिकाऱ्याने दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन अटक केली.
लाचेची मागणी, या ठिकाणी करा तक्रार
कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट) कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ लाचलुचपत विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. लाचलूचपत प्रतिबंधक विभाग पालघर (दूरध्वनी-02525-297297), पोलीस उपअधीक्षक नवनाथ जगताप (मोबाईल क्रमांक 9923346810/ 9850158810), पोलीस निरीक्षक स्वपन बिश्वास ( मोबाईल क्रमांक 8007290944/ 9405722011) या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शिपायाने ग्रामसेविकेसह सरपंचाला शिकवला धडा..
नाशिक इगतपुरी (Igatpuri) तालुक्यातील बलायदुरी येथील ग्रामसेविकेसह महिला सरपंच एसीबीच्या जाळ्यात सापडली. काही दिवसांपूर्वी ही कारवाई करण्यात आली. ग्रामपंचायत शिपायाकडून 50 हजारांची लाच घेताना या दोघींसह एकास अटक करण्यात आली आहे. इगतपुरी तालुक्यातील बलायदुरी येथील ग्रामपंचायतीच्या निवृत शिपायाचा रहिवास भत्ता मंजूर करण्यासाठी 50 हजारांची लाच घेणाऱ्या सरपंचासह ग्रामसेविकेला व एका नागरिकाला रंगेहाथ पकडण्यात आले. आशा देवराम गोडसे या ग्रामसेविकेसह हिरामण पांडुरंग दुभाषे या सरपंचाला व मल्हारी पंढरीनाथ गटकळ या नागरिकाला लाच स्वीकारताना ताब्यात घेण्यात आले.
इतर महत्त्वाच्या बातम्या: