मित्राच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशन दरम्यान गाडीला कट लागल्याचा वाद, रस्त्यावर चाकूने भोकसून तरुणाची हत्या
मित्राच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशन दरम्यान वर्ध्यात ही घटना घडली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
वर्धा : गाडीचा कट लागल्याच्या कारणातून युवकाची धारदार शस्त्राने भोकसून हत्या करण्यात आली आहे. वर्ध्यातील जुना आरटीओ परिसरात ही घटना घडली. रात्री साडेबारा वाजता मित्राच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशन दरम्यान ही घटना घडली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
23 वर्षीय तरुण आपल्या मित्राचा वाढदिवस साजरा करत होता. दरम्यान केक कापल्यानंतर सर्व मित्रांनी ऐकमेकांच्या तोंडाला केक लावत असतांना केक लावायचा नाही म्हणून बाहेर रोडवर उभा होता. तेवढयात दोन मोपेड गाडी व एका मोटर सायकलने आलेल्या आरोपींनी तरुणाला कट मारला यावरून त्यांच्यात चांगलीच बाचाबाची झाली आणि वाद विकोपाला गेल्यावर आरोपीने तरुणाच्या पोटात चाकूने भोसकून खून केला आहे. अक्षय सोनटक्के असं मृत तरुणाचं नाव आहे. वर्धा जिल्ह्यात गुन्हेगारी आणि हत्येच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. तसेच तरुण युवक जवळ धारदार शस्त्र बाळगत असल्याने नागरिकांच्या मनात दहशत निर्माण झाली आहे. तसेच घटना घडली त्या परिसरात ट्युशन क्लास असल्याने विद्यार्थ्यांमध्ये देखील मोठी दहशत निर्माण झाली आहे.
सेलिब्रेशन दरम्यान नेमकं काय घडलं?
रामनगर येथील रहिवासी मृत 23 वर्षीय तरुण अक्षय सोनटक्के आणि काही तरुण मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी जुना आरटीओ ग्राउंड येथे जमले होते. दरम्यान मित्र एकमेकांच्या तोंडाला केक लावत असताना मृतक अक्षय सोनटक्के याने केक लावायचा नाही असे म्हणून तो ग्राऊंडमधून निघून बाहेर खो-खो ग्राऊंडच्या बाहेरील कॉर्नरजवळ असलेल्या नगरपालिकेच्या लाईट खाली जाऊन डांबरी रोडवर उभा राहिला. तेवढयात तुकडोजी ग्राऊंडवरून आरोपी दोन मोपेड गाडी व एका मोटर सायकलने आले आणि त्यांनी मृतक अक्षय सोनटक्के याला कट मारला. यावरुन त्यांच्यात चांगलीच बाचाबाची झाली. त्यावरून आरोपी मयुर गिरी, सुजल श्रीवास (परदेशी) तसेच इतर चार आरोपींनी मृतक अक्षय सोनटक्के याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. रात्री साडे बाराच्या दरम्यान हा वाद इतका उफाळला की त्यातील एक आरोपी मयुर गिरी याने "मारा रे याला जास्त शहाणा झाला" असे म्हणत जवळील " धारदार चाकू काढला आणि अतिशय निर्देयतेने मृतकाच्या पोटाखाली भोकसला. रक्ताने माखलेल्या अवस्थेत वेदनेने विव्हळत असलेला तरुण हा वाचवा वाचवा असे म्हणू लागला. तेव्हा त्याचे मित्र त्याच्याकडे धावून गेले तेवढ्यात आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
आरोपीने केला पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न :
मृतक तरुण अक्षयला गंभीर जखमी अवस्थेत बघून त्याचे मित्र पंकज मिश्रा व पवन मते हे दवाखान्यात घेऊन गेले. रामनगर पोलिसांत मृतक अक्षयचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार मित्र याने तक्रार दाखल केली असून घटनेतील सहा आरोपीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले. वरिष्ठ पोलीस अधिकारीही घटनास्थळी दाखल होते. पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहेत.