रत्नागिरी जिल्ह्यात विधानसभेच्या निवडणुकीला गालबोट, वंचितच्या उमेदवारावर प्राणघातक हल्ला
गुहागर तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली आहे. अण्णा जाधव असं उमेदवाराचं नाव आहे.
Attack on Vanchit Bahujan Aghadi candidate : सध्या विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरु आहे. सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार प्रचार सुरु केला आहे. मात्र, अशातच रत्नागिरी जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गुहागर तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली आहे. विकास (अण्णा ) जाधव असं उमेदवाराचं नाव आहे. हा हल्ला गुहागर तालुक्यात नरवण गावात झालाय.
अण्णा जाधव यांच्या हातावर चाकू हल्ला झाला, गंभीर जखम
वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार अण्णा जाधव यांच्यावर हल्ला झाल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे. यामुळं रत्नागिरी जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीला गालबोट लागले आहे. दरम्यान, या घटनंतर उमेदवार जाधव यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालय दाखल करण्यात आले आहेत. अण्णा जाधव यांच्या हातावर चाकू हल्ला झाला, यात त्यांच्या हातावर खोल जखम झाली आहे. त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान, याप्रकरणाची दखल पोलिसांनी घेतली आहे, पोलीस अधिकचा तपास करत आहेत.
अण्णा जाधव यांच्या चारचाकी वाहनाची देखील केली तोडफोड
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना गुहागर तालुक्यातील नरवण फाटा येथील एका हॉटेलमध्ये घडली आहे. अण्णा जाधव हे या हॉटेलमध्ये जेवण करत होते. यावेळी दुचाकीवर आलेल्या तिघांनी अण्णा जाधव यांच्यावर धारधार शस्त्राने वार केले आहेत. यानंतर हल्लेखोरांनी हॉटेलबाहेर अण्णा जाधव यांच्या उभ्या असलेल्या चारचाकी वाहनाची देखील तोडफोड केली आहे. आरोपींनी अण्णा जाधव यांच्या गाडीच्या काचा फोडल्या आहेत. त्यानंतर ते तिथून पळून गेले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तत्काळ पोलिस प्रशासनाने या घटनेची दखल घेतली आहे. हल्लेखोरांचा शोध घेण्याचे काम सुरु आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीचं वातावरण चांगलच तापलं
दरम्यान, सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीचं वातावरण चांगलच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवाराचा जोरदार प्रचार सुरु आहे. हा प्रचार आता अंतिम टप्प्यात आहे. कारण दोन दिवसांनंतर विधानसभेसाठी मतदान होणार आहे. अशा परिस्थितीत गुहागरमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्षांवर जीवघेणा हल्ला झाल्यानं परिसरात तणावाचे वातावरण आहे. दरम्यान, विधानसभा निवडमुकीसाठी येत्या 20 नोव्हेंबरला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर 23 नोव्हेंबरला विधानसभेचा निकाल लागणार आहे.
महत्वाच्या बातम्या: